या गावाने मिळवून दिली इंदिरा गांधींना परत एकदा देशाची सत्ता !

१९७५-७७ दरम्यानच्या २१ महिन्यांच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचे कारण देत प्रधानमंत्री इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली होती. २५ जून १९७५ ला लागू झालेली आणीबाणी पुढे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर २१ मार्च १९७७ रोजी उठवण्यात आली. या निवडणुकीत खुद्द इंदिरा गांधींसहित काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. पुढे आणिबाणी दरम्यानच्या अत्याचारांची चौकशी आणि संजय गांधींच्या काळजीने इंदिराजी राजकारणातून सन्यास घेण्याच्या निर्णयापर्यंत येऊन पोहोचल्या होत्या. पण…

बेलछी गाव ठरले निमित्त, इंदिरा गांधी परतल्या सत्तेत

१७ मे १९७७ रोजी बिहारच्या नालंदामधील बेलछी गावात ८ दलितांसमवेत ११ लोकांना जिवंत जाळून मारण्यात आल्याची घटना घडली. इंदिरा गांधींपर्यंत ही बातमी आली. त्यांनी त्वरित बेलछीला जाण्याचा निर्णय घेतला. १३ ऑगस्टला इंदिराजी विमानातून पटनाला आणि तिथून कारने बिहार शरीफ येथे आल्या. त्यावेळी तिथे मुसळधार पाऊस सुरु होता.

मुसळधार पावसामुळे काँग्रेस नेत्यांनी इंदिराजींना बेलछीला जाण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला. पण इंदिराजी हट्टाला पेटल्या. काँग्रेस नेत्यांनी त्यांना सांगितले की पुढे रस्ता कच्चा आणि चिखलाने भरलेला आहे, परंतु इंदिराजींनी ऐकले नाही. नाईलाजास्तव त्यांना जीपमध्ये बसवण्यात आले, पण जीप चिखलात रुतून बसली. ट्रॅक्टरमध्ये बसवले, तर तो हि चिखलात अडकून बसला. तेव्हा इंदिराजी खाली उतरल्या आणि जराशी साडी वर खोचून पायीच निघाल्या.

हत्तीवर स्वार होऊन बेलछीला पोहोचल्या ६० वर्षांच्या इंदिरा गांधी

सगळे उपाय करुन झाल्यावर शेवटी मोती नावाचा हत्ती मागवण्यात आला. हत्तीवर अंबारीदेखील नव्हती. त्या तशाच पाठीवर गोधडी टाकलेल्या हत्तीवर बसल्या. पाठीमागे प्रतिभा सिंह बसल्या. अशा खराब हवामानात सुद्धा केवळ माहूत आणि एक सहकारी यांच्यासोबत ६० वर्ष वय असणाऱ्या इंदिराजींनी हरनौत पासून बेलछी पर्यंतचा १५ किलोमीटरचा दुर्गम प्रवास तीन तासात पूर्ण केला.

इंदिराजी गावात पोहोचल्या त्यावेळी अंधार झाला होता. गावातील लोकांनी त्यांचे स्वागत केले. पावसात भिजलेल्या इंदिराजींना त्यांनी दुसरी साडी दिली. तिथे त्या नरसंहार पीडित लोकांना भेटल्या. त्यांना धीर दिला. गावकऱ्यांनी त्यांच्या विरोधात मतदान केल्याबद्दल क्षमा मागितली.

बेलछी मधून इंदिराजींचे राजकारणात पुनरागमन

इंदिराजींच्या बेलछी भेटीची बातमी वाऱ्यासारखी देशभर पोहोचली. दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रात इंदिराजींचा हत्तीवर बसलेला फोटो झळकला. या एका फोटोने त्यांची हरवलेली राजकीय प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास परत मिळवून देण्याचे काम केले. इथूनच इंदिरा गांधींचे राजकारणात पुनरागमन झाले.

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य उसळले. विरोधक इंदिराजींच्या बेलछी भेटीचा प्रतिकार करू शकले नाहीत. १९८० लोकसभा निवडणुकांमध्ये इंदिरा गांधींच्या हातात परत एकदा देशाने सत्ता दिली आणि त्या प्रधानमंत्री बनल्या. बेलछी गाव या सगळ्या घडामोडींना निमित्त ठरले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *