न्युड : पेंटिंगसाठी कपडे उतरवून पोज देणाऱ्या मॉडेलची कथा

चोरुन लपुन पॉर्न बघितलं जाणाऱ्या आपल्या समाजात नग्नतेबद्दल साधा उच्चार केला तरी लोकांना अवघडल्यासारखं होतं. चित्रपटही कलाकार जेव्हा शरीराच्या नग्नतेचं प्रदर्शन करतात, तेव्हा बहुतेक करुन ते प्रतीकात्मक असते. खरं तर कलाकाराला आपले शरीर नव्हे, आपले सौंदर्य दाखवायचे असते. ज्यांना हे समजतं, ते कलाकृतीचा आनंद घेतात. खाजगी आयुष्यात नग्नता शोधणारा समाज सार्वजनिक आयुष्यात मात्र नग्नतेपासून दूर पळतो. मानवी स्वभावाच्या याच दोन टोकांमधील जग म्हणजे रवी जाधव यांचा “न्युड” हा सिनेमा !

काय आहे न्यूडची कथा

आपल्या पतीच्या छळाला कंटाळून घर सोडणाऱ्या “यमुना”ची ही कहाणी आहे. आपल्या “लहाण्या” नावाच्या मुलाला शिकवून मोठे करावे या उद्देशाने ती मुंबईला चंद्राक्का मावशीकडे येते. मुंबईच्या झोपडपट्टीत राहणारी चंद्राक्का आपला चरितार्थ चालविण्यासाठी चित्रकारांसमोर कपडे काढून नग्न पोज देण्याचे काम करते हे ज्यावेळी यमुनाला समजते तेव्हा तीला त्याचा तिरस्कार वाटतो, राग येतो.

त्यातून चंद्राक्काशी तिचे भांडण होते आणि तिची लहाण्याला शिकवण्याच्या इच्छेवर संकट कोसळते. त्यातूनच “जे जे स्कुल ऑफ आर्ट”च्या चित्रकार विद्यार्थ्यांना मिळते यमुना नावाची एक नवी मॉडेल !

हा सिनेमा अनेक विषयांना स्पर्श करतो. मुलांचा सांभाळ करणाऱ्या एका असहाय्य आईपासून ते संस्कृतीरक्षकांच्या दुटप्पीपणा झेलणाऱ्या न्युड आर्टिस्टबाबतच्या जीवनापर्यंत ! चित्रकार विद्यार्थ्यांसमोर पहिल्यांदा आपले कपडे उतरवत असताना तिच्या तोंडी आलेले एक वाक्य सिनेमाचं सर्वात पावरफुल वाक्य आहे, “शिक्षण नाही थांबलं पाहिजे, ना माझ्या मुलाचं ना या चित्रकाराचं !” संपूर्ण सिनेमात एकाही सीनमध्ये तुम्हाला उपदेश केलेला दिसणार नाही. सिनेमा फक्त एक कथा सांगत आहे, त्यातला संदेश आपल्याला शोधायचा आहे.

सगळा सिनेमा लहाण्याच्या शिक्षणासाठी यमुनाने घेतलेल्या धडपडीवर आधारित आहे. आपल्या मुलाची चित्रकलेतील आवड पाहून यमुना त्याला मुंबईपासून दूर औरंगाबादला शिकण्यासाठी पाठवते. त्यामागे चित्रकलेच्या आवडीपायी आपला मुलगा त्याची आई जिथे कपडे उतरवून चित्रकारांना नग्न पोज देते, त्या कॉलेजात पोहोचू नये हे सुद्धा एक कारण दाखवले आहे. एका भावनिक प्रसंगात यमुना लहाण्याला म्हणते, “शिकलास तर माझ्या नग्न चित्रांना बघितल्यावरही माझी पूजा करशील, नाही शिकलास तर मला चपलेने मारशील !”

हा चित्रपट यमुनेच्या कथेचे हॅप्पी एंडिंग दाखवत नाही. उलट संघर्षाचा शेवट आनंदी असतोच असं नाही असा व्यावहारिक संदेश देतो. लेखक-दिग्दर्शकांनी चित्रपटाच्या माध्यमातून समाजाच्या स्वभावावर बोट ठेवले आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *