क्रिकेटप्रेमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर : एक अपरिचित पैलू

शीर्षक वाचूनच बुचकळ्यात पडलात ना ? हा तसं शीर्षकही वाचकांना कोड्यात टाकणारंच आहे. पण गोंधळून जाऊ नका, कारण ही माहिती पूर्णपणे सत्य आहे. यात किंचितही काल्पनिकतेचा लवलेश नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते. त्यांचे शिक्षण, कायद्यांचा अभ्यास, अर्थशास्त्राचा अभ्यास, इत्यादी अनेक बाबींवर लिहले बोलले जाते. पण त्यांच्या आयुष्यातील अनेक अज्ञात पैलूवर अजून म्हणावा तितका प्रकाश पडायचा बाकी आहे. त्यासाठीच आमचा हा छोटासा प्रयत्न ! लेख आवडल्यास नक्की शेअर करा.

तीन वर्षांपूर्वी बारामती येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त त्यांच्या नावाने भव्य अशा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्या नावाने देशाच्या वेगवेगळ्या भागात साधारणपणे १०-१२ अशीच वेगवेगळ्या खेळाशी संबंधित मैदाने आहेत. क्रीडा क्षेत्राशी संबंधित मैदानांना सर्वसामान्यपणे खेळाडूंची नावे दिली जातात.

बाबासाहेब सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत होते. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते ? मग या क्रीडा मैदानांना बाबासाहेबांचे नाव कसे हा प्रश्न लोकांच्या मनात होता. तसं पाहता बाबासाहेबांचे वेगवेगळ्या क्षेत्रात असणारे योगदान इतके मोठे आहे की त्यांचे नाव विद्यापीठापासून ते उद्यानांना दिले जाते. पण क्रीडा क्षेत्राशी त्यांचा संदर्भ कसा आहे.

तर हा शोध घेताना खूपच आश्चर्यचकित करणारी माहिती समजली. ज्याद्वारे बाबासाहेब हे क्रिकेट खेळाचे चाहते होते ही बाब उजेडात आली. १८९६ मध्ये सातारच्या कॅम्प स्कुलमध्ये बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण झाले. ७ नोव्हेंबर १९०० रोजी सातारच्या गव्हर्नमेंट स्कुल (आताचे छत्रपती प्रतापसिंह हायस्कुल) मध्ये बाबासाहेबांचा पाचव्या वर्गात प्रवेश घेण्यात आला.

१९०४ नंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये त्यांचे मॅट्रिक झाले. या बालपणाच्या काळात बाबासाहेबांना वेगवेगळ्या खेळाची आवड निर्माण झाली. ज्यात हॉकी, फुटबॉल हे खेळ होते. पण यापेक्षाही क्रिकेट हा खेळ त्यांचा अत्यंत आवडीचा खेळ बना होता. त्यांच्या जन्माच्या साधारण १०० वर्षांपूर्वी क्रिकेट खेळ भारतात आला होता.

अशी वाढली बाबासाहेबांची क्रिकेट आवड

क्रिकेट हा जंटलमनचा खेळ मानला जात होता. त्या काळात मुंबईच्या बाळू पालवणकर आणि शिवराम पालवणकर या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या रोहिदास समाजातील बंधूंनी भारतीय क्रिकेट टीमला सुगीचे दिवस दाखवले होते. हा तो काळ होता जेव्हा बाबासाहेब शालेय जीवनात होते, या वयात मुलांना खेळांचे आकर्षण असते. त्यात मुंबई हे क्रिकेटचे माहेरघर होते. बस्स, इथेच बाबासाहेबांना क्रिकेट खेळ आवडायला लागला.

त्याकाळात वरळी, कोळीवाडा, सातरस्ता इत्यादि भागातील इतर जातीच्या क्रिकेट टीम असायच्या. त्यांच्यासोबत बाबासाहेब मॅच खेळायचे. तेव्हा ते आपल्या टीमचे कॅप्टनही होते. अनेकदा बाबासाहेब आपल्या टीमला विजय मिळवून देत असत. ते एक चांगले फलंदाज होते. त्यांना फलंदाजीमधील बारकावे माहित होते. आपल्या टीमच्या सहकाऱ्यांना ते बारकावे समजावून सांगत. कधीकधी खेळामध्ये भांडणेही व्हायची, मात्र त्यातही बाबासाहेब पुढे असायचे.
(संदर्भ – डॉ.भीमराव रामजी आंबेडकर खंड १, पान ६१, लेखक – चां.भ.खैरमोडे)

क्रिकेटबाबतचा असाही योगायोग

बाळू पालवणकर आणि शिवराम पालवणकर हे अस्पृश्य होते, त्यांचा खेळ चांगला असला तरी तेवढ्या कारणाने ते भारताचे कर्णधार होऊ शकले नव्हते.
आंबेडकर बाळू पानवलकरांचे उदाहरण खेडोपाडी द्यायचे. पालवणकर बंधूंसारख्या समाजानं वाळीत टाकलेल्या खेळाडूंनी उत्तमोत्तम यश मिळवून दाखवलं याचा बाबासाहेबांना अभिमान होता. म्हणूनच बाबासाहेबांनी पुढाकार घेऊन बाळू पालवणकरचा सत्कार मुंबईमध्ये आयोजित केला. त्यावेळी बाबासाहेबांनी स्वतः प्रमुख भाषण केले.

पुढे १९३७ मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये याच क्रिकेटपटू बाळू पालवणकर यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात उमेदवारी दिली, या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकरांनी पालवनकरांचा पराभव केला होता. आपल्या आवडत्या क्रिकेट खेळाडूविरोधात बाबासाहेबांना निवडणूक लढवावी लागली हा ही एक योगायोगच होता.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *