जालियनवाला बाग हत्याकांडाला १०० वर्ष पूर्ण, ब्रिटनने अद्याप मागितली नाही माफी !

१३ एप्रिल २०१९ रोजी अमृतसरच्या जालियनवाला बाग इथल्या अमानुष हत्याकांडाला १०० वर्ष पूर्ण होत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील ही अत्यंत वेदनादायक अशी घटना होती. आजही या घटनेच्या जळजळीत आठवणी जालियनवाला बागेत गेल्यावर पाहायला मिळतात.

पार्श्वभुमी

पहिल्या महायुद्धात भारताच्या १५ लाख जवानांनी ब्रिटिशांच्या बाजूने लष्करात भरती होऊन त्यांना विजय मिळवून दिला. त्यामुळे ब्रिटिश भारताच्या स्वातंत्र्याची मागणी मान्य करतील अशी त्यांना अपेक्षा होती. पण ब्रिटाशांनी भारतीयांना उलट वागणूक दिली. त्याविरोधात भारतीयांनी होमरूल लीग चळवळ सुरु केली. हि चळवळ दडपण्यासाठी ब्रिटिशांनी १९१९ च्या मार्चमध्ये जुलमी रौलट कायदा आणला. त्या कायद्यानुसार कुठल्याही भारतीयाला देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबण्याचा आणि शिक्षा सुनावण्याचा त्यांना अधिकार मिळाला. बेदरकारपणे कायद्याची अमलबजावणी होऊ लागली. त्याविरोधात गांधीजींनी सत्याग्रहाचे शस्त्र उगारले. पण गांधीजींनाही अटक करण्यात आली. त्यामुळे लोकांचा प्रक्षोभ उसळला.

जालियनवाला बाग हत्याकांड (१९१९)

पंजाबच्या अमृतसरमध्ये रौलट कायद्याविरोधात सत्याग्रहींचे नेतृत्व करणाऱ्या डॉ.सैफुद्दीन किचलु आणि डॉ.सत्यपाल यांना १० एप्रिलला अटक करुन अज्ञात स्थळी हलवण्यात आले. त्यामुळे जनतेत संतापाचे वातावरण निर्माण झाले. हा उद्रेक शमविण्यासाठी पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर याने ब्रिगेडियर जनरल डायर याला अमृतसरची परिस्थिती हाताळण्यासाठी नेमले. १२ एप्रिलला जनरल डायरने अमृतसरमध्ये जमावबंदी लागु केली. १३ एप्रिलची सकाळ उजडली ! त्यादिवशी शिखांचा बैसाखी हा सण होता. त्यादिवशी अमृतसर आणि परिसरातले हजारो लोक बैसाखीनिमित्त जालियनवाला बाग येथे जमले. जवळपस २०००० लोक होते. महिला, मुले, तरुण आणि वृद्धही ! जमलेल्या लोकांनी ब्रिटिशांच्या अन्यायकारक रौलट कायद्याविरोधात निषेध सभा घेतली.

असे घडले अमानुष हत्याकांड

हजारो लोक जालियनवाला बागेत जमलेले पाहून अचानक जनरल डायरने मशिनगन बसविलेल्या गाड्या आणून बागेचे प्रवेशद्वार रोखले. बागेत येण्याजाण्याचा तो एकमेव मार्ग होता. आपल्या सोबत असलेला शस्त्रधारी ताफा घेऊन डायर सरळ बागेत घुसला आणि काहीच पूर्वकल्पना न देता अचानक त्याने जमलेल्या लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. अंदाधुंद गोळीबार सुरु झाला. या अनपेक्षित हल्ल्याने लोक जीव वाचविण्यासाठी पळू लागले. पण जाणार कुठे ? एकच प्रवेशद्वार होते, ते हि रोखलेले. लोकांची चेंगराचेंगरी झाली. स्त्रिया, मुले वृद्धांचे प्रचंड हाल झाले. भीतीने लोकांनी विहिरीत उड्या मारल्या. पण काही उपयोग झाला नाही. जवळपास दहा मिनिटे अंदाधुंदपणे गोळ्या बरसल्या. आणि बघताबघता बागेत २०००० लोकांच्या प्रेतांचा खच साचला.

ब्रिटनने खेद व्यक्त केला, पण अद्याप माफी मागितली नाही !

नुकतेच ब्रिटनच्या संसदेत जालियनवाला बाग हत्याकांडाचा विषय चर्चेला आला होता. जालियनवाला बाग हत्याकांडाची घटना ब्रिटनच्या इतिहासाला लागलेला कलंक असल्याची भावना ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी व्यक्त केली. यावर विरोधी पक्षाचे नेते जेरेमी कॉर्बीन यांनी जालियनवाला बाग हत्याकांडात जीव गमावलेल्या लोकांप्रती आपण स्पष्ट शब्दात मागण्याचे प्रायश्चित्त घ्यायला हवे अशी मागणी केली. परंतु त्या प्रकरणाचा आम्हाला आज पश्चाताप होत आहे, आता भारताशी ब्रिटनचे संबंध चांगले सुधारले आहेत असे सांगून थेरेसा मी त्यावर माफी न मागता केवळ खंत व्यक्त केली.

पूर्वीही झाली होती माफी मागण्याची मागणी

ब्रिटनच्या द्वितीय एलिझाबेथ महाराणी १९९७ मध्ये भारताच्या दौऱ्यावर आल्या असताना त्यांनी जालियनवाला बागेला भेट दिली होती. त्यांनीही दोन देशाच्या इतिहासातील या कटू प्रसंगाबद्दल खेड व्यक्त केला होता. तसेच २०१७ मध्ये भारताच्या दौऱ्यावरती आलेल्या लंडन मेयर सादिकखान यांनीही ब्रिटनच्या सरकारने माफी मागण्याचे मत व्यक्त केले होते. माफी मागण्यासाठी हि अचूक वेळ असल्याचे मत भारतीय वंशाचे तिथले सांसद विरेंद्र शर्मांनी व्यक्त केले होते. ब्रिटनने या घटनेबद्दल आज खुलासा करण्याचे आव्हान सांसद प्रितकौर गील यांनीही केले होते.

परिणाम

या घटनेचे दूरगामी परिणाम झाले. संपूर्ण देश एकीच्या भावनेने पेटून उठला. रवींद्रनाथ टागोरांनी आपली सर ही पदवी ब्रिटिशांना परत केली. या हल्ल्यातील जखमी उधमसिंग याने ओडवायरचा वध करून बदला घेतला. या घटनेने देशात अनेक क्रांतिकारक जन्माला आले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *