भाजपच्या प्रचार ताफ्यावर नक्षली हल्ला; भाजप आमदाराचा मृत्यू, 5 जवान शहीद

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मतदानाच्या दोन दिवस आधी नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या नक्षलग्रस्त जिल्ह्यात आयईडी स्फोट घडवला.

भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा आज दुपारी निवडणूक प्रचार करुन श्यामगिरीहून जात होता. नक्षलग्रस्त परिसर असल्यामुळे दंतेवाड्यातील प्रचार ३ वाजताच संपला. भीमा मंडावी बुलेटप्रूफ गाडीत होते. त्यांच्या ताफ्यात सुरक्षा दलाच्याही गाड्या होत्या. त्यावेळी नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट घडवला.

यात आमदार भीमा मंडावी यांना जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पाच जवानही शहीद झाले. भीमा मंडावी हे छत्तीसगड विधानसभेत भाजपचे उपनेते होते.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या छत्तीसगढ मधील विधानसभा निवडणुकीत भाजपचा दारुण पराभव झाला होता. भाजपला फक्त १५ जागा जिंकता आल्या. बस्तरमध्ये जेव्हा भाजपचा सुपडासाफ झाला होता, तेव्हा भीमा मंडावी यांनी बस्तर संभागच्या १२ जागांपैकी दंतेवाडा ही एकमेव जागा जिंकली होती.

भीमा मंडावी यांनी काँग्रेसच्या देवती कर्मा यांचा पराभव केला होता. मंडावी हे विधानसभेत भाजपच्या विधीमंडळ गटाचे उपनेतेही होते.

कोण होते भिमा मंडावी?

आमदार भीमा मंडावी हे अगोदर बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या मंडावी यांनी २००८ मध्ये महेंद्र कर्मा यांचा पराभव केला होता. दंतेवाडामधील हा हल्ला नकुलनार पोलीस स्टेशन हद्दीतील श्यामगिरी क्षेत्रात झाला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी बस्तर लोकसभा मतदारसंघासाठीही मतदान होणार आहे. याच प्रचारासाठी भीमा मंडावी बैठका घेत होते.

निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी बैठकांचा धडाका लावला होता. पण नक्षलींनी त्यांच्यावर पाळत ठेवली होती. आज नक्षलींनी अगोदर स्फोट घडवून आणला आणि त्यानंतर गोळीबारही केला.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *