होय… वैशालीताई तुम्ही जिंकू शकता ..! शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी, वैशालीताई मैदानात..

गेल्या महिन्यातच “प्रहार जनशक्ती पक्षाला” केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी “यवतमाळ – वाशिम” मतदारसंघात लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सौ. वैशाली येडे यांना उमेदवारी दिली.. गेले महिनाभर या उमेदवारीची राज्यभर नव्हे तर देशभर चर्चा होत आहे…

अगदी सामान्य कुटुंबातील वैशालीताई यांनी 5 टर्म खासदार राहिलेल्या भावना गवळी यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले आहे. एकंदरीत मतदारसंघातील परिस्थिती आणि प्रहारचे अवतरलेले वादळ पहाता प्रस्थापितांची उलटी गिनती सुरु झाली आहे अशीच परिस्थिती आहे… त्यामुळेच या “जनशक्तीच्या” जोरावर वैशालीताई तुम्ही निवडणूक जिंकू शकता..!!

कोण आहेत वैशालीताई सुधाकर येडे..??

35 वर्षीय वैशालीताई या यवतमाळमधील कळंब तालुक्यातल्या राजूर गावातील अगदी सर्वसामान्य कुटुंबातील एक महिला असून अंगणवाडी सेविका म्हणून त्या कार्यरत आहेत. 5 वर्षांपुर्वी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतीसाठी बँकेचे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत म्हणून त्यांच्या पतीने आत्महत्या केली होती. मात्र पतीच्या निधनानंतरही त्यांनी खचून न जाता त्यांनी आपल्या दोन मुलांचे शिक्षण, घर आणि शेती सुरु ठेवली.

तसेच पतीने आत्महत्या केल्यानंतर वर्षभरात हे दुःख बाजूला ठेवून वैशालीताई यांनी “एकल महिला संघटन” उभे केले आणि आत्महत्या केलेल्या कुटुंबांना सावरत त्यांना आधार देण्याचे काम केले. एकल महिलांचे जिने काय असते हे यांनी पुन्हा पुन्हा अनुभवले आणि या एकल महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळ येथील साहित्य संमेलनाच्या उद्धाटक म्हणून मान

गेल्या वर्षीच यवतमाळ येथे झालेल्या साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्षपदावरुन वाद झाल्यानंतर वैशालीताई यांना संमेलनाच्या उद्धाटक म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने करत उद्धाटक म्हणून केलेल्या भाषणात शेतकरी आत्महत्येचा प्रश्न व त्यांचे दुःख अवघ्या देशासमोर मांडले. तेव्हापासून त्या चर्चेत आल्या होत्या. हे उद्धाटनपर भाषण नक्कीच ऐकावे असे आहे. सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे..!!

यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

मी 12 वी शिकलेली आहे.. पण मी बहिणाबाईची लेक हाय ..

मी माणसे वाचलेली आहेत. माणसे पुस्तकातून वाचून समजत नाहीत; त्यासाठी माणसात जावे लागते.

आम्हा बायांच्या जगण्याचा मर्दानी संघर्ष नाही दिसत..

तुम्हाला बोलणारी बाई नाही चालत. डोलणारी पाहिजे…म्हणून दिल्लीवाली विधवा बाई नाही चालली. पण मी पण बोलणार आहेच ना

आम्ही महिला विधवा नाहीत ; एकल आहोत..आपला सारा समाजच विधवा झाला आहे.

एकदा नवरा गेला की साऱ्या गावाले ती संधी वाटते.. एकट्या रांडेवर साऱ्या गावाचा डोळा असतो …. कसे दुःखाचे जीवन आम्हाला जगावे लागते हे आह्मालाच माहित…

आमच्या वाट्याला आलेले हे पांढरे कपाळ निसर्ग नियमाने आलेले नाही …. हे विधवापण व्यवस्थेने आमच्यावर लादले आहे…

“प्रहारने” यवतमाळमधून का दिली उमेदवारी ??

इंग्रजी काळापासूनच यवतमाळमधील “कारंजा” ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ होती … कापूस, धान, सोयाबिन याची येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर उलाढाल होत होती. कारंजा व यवतमाळ येथे इतकी समृद्धी होती की यवतमाळकरांनी 1634 कोटी रुपयांचे कर्ज इंग्रजांना दिले होते.
मात्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे येथील परिस्थिती बदलत गेली आणि यवतमाळवासीयांना आत्महत्यांचे ग्रहण लागले. एकट्या यवतमाळमध्ये देशातील सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. येथील अनेक गावे अशी आहेत की, या गावात 20 – 30 – 40 अशा शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत.

हजारो महिलांच्या माथी वैधव्याचे जीणे आले आहे. राहुल गांधी, शरद पवार, श्री श्री रविशंकर अशा अनेकांनी येथे भेटी दिल्या. पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही. पिकाला भाव नाही, बाजारपेठ नाही, नापिकीकरण यामुळे शेतकरी उध्वस्त झाला आहे. हे चित्र आपल्याला बदलायचे आहे. देशभरातील शेतकऱ्यांना पुन्हा नवा जगण्याचा नवा आत्मविश्वास देत त्यांना सन्मानाने उभे करायचे आहे … याचीही सुरवात आपल्याला यवतमाळमधून करायची आहे.

निवडणूक म्हणजे घराणेशाही, पैसा, सत्ता हे समीकरण “प्रहारला” पुसायचे आहे

“प्रहार जनशक्ती पक्षाने” व आमदार बच्चू कडू यांनी घराणेशाही, पैसा, सत्ता यांना बाजूला सारत अगदी सामान्य व शेतकरी कुटुंबातील वैशालीताई यांना उमेदवारी देत नवा आदर्श उभा केला आहे. प्रहारला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर राज्यभरातील अनेक राजकीय व्यक्ती, घराणी व धनदांडग्यांनी लोकसभेच्या उमेदवाऱ्या मागितल्या… अगदी 20 – 25 करोडपर्यंत खर्च करायच्या तयाऱ्या दाखवल्या.

पण आमदार बच्चू कडू यांनी या सर्वांना साफ नकार दिला. कारण “प्रहारला” घराणेशाही, पैसा, सत्ता हे समीकरण पुसायचे आहे. “पैश्याच्या जीवावर सत्ता आणि सत्तेच्या जीवावर पैसा व घराणेशाही ” हा लोकशाहीला लागलेला रोग आपल्याला संपवायचा आहे. लोकशाही टिकवण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूस निवडणूक लढ़वू शकतो आणि जिंकूही शकतो हे “प्रहारला” दाखवायचे आहे आणि एक नवा आदर्श उभा करायचा आहे. शेतकऱ्याच्या “विधवा” लेकीने लढवली जाणारी ही देशातील कदाचित पहिलीच निवडणूक असेल.

रस्त्यावरच्या लढाईबरोबरच संसदेतील लढाई महत्वाची, प्रत्येक वेळी रस्त्यावरची लढाई करून फायदा नाही

सरकारला रस्त्यावरची लढाई कळत नसेल तर संसदेत व विधिमंळळात सरकारला जाब विचारण्यासाठी व जनतेसाठी – शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी भांडणारे हक्कांचे उमेदवार हवे आहेत. यासाठीच प्रहारने निवडणुकीच्या मैदानात उड़ी घेतली आहे. शेतीव्यवस्था, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, शेतमाल बाजारपेठ, सिंचन व्यवस्था, आरोग्य, शिक्षण, साहित्य, न्यायव्यवस्था, प्रशासन या सर्वच पातळ्यांवर प्रहारला अत्यंत ताक़दीने काम करायचे आहे. यासाठी लोकशाहीच्या प्रांगणात म्हणजेच “संसदेत” प्रहारला जनसामान्यांचा आवाज बुलंद करायचा आहे.

लेखक- अॅड. विवेक ठाकरे, मुंबई 8888878202

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *