आमदार खासदार शब्द कुठुन आले ? वाचा मजेशीर माहिती…

राज्याच्या विधीमंडळात म्हणजेच विधानसभेत आणि विधानपरिषदमध्ये निवडण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींना आमदार तर देशाच्या संसदेत म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत निवडण्यात आलेल्या लोकप्रतिनिधींना खासदार म्हणून ओळखले जाते. अशी बिरुदावली लावण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रामध्ये आढळते. पण ही आमदार आणि खासदार या बिरुदावल्या कधी प्रचलित झाल्या हे नक्की सांगता येत नाही.

सध्या आपल्याकडे लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आपला खासदार, आमचा खासदार, जनतेच्या मनातील खासदार, जिवाभावाचा खासदार यासारखे अनेक शब्द दररोज मतदारांच्या कानी पडत आहेत. आमदार किंवा खासदार म्हणजे त्या सभागृहाचे सदस्य. पण या शब्दांची उत्पत्ती कुठून आहे ?

आपला देश बऱ्याच काळापर्यंत मोगलांच्या ताब्यात होता. साधारण १६२७च्या आसपास शाहजहान बादशहाने त्याच्या राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी जाणून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी दिवान-ए-आम सुरु केलते. या ठिकाणी शाहजहान बादशहा जनतेच्या समस्या ऐकायचा आणि त्यांच्यासोबत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करायचा. या दिवान-ए-आमच्या मधोमध मयुरसिंहासन होतं. तिथे बसून बादशहा त्याच्या अधिकारी लोकांसोबत चर्चा करायचा. अशाच प्रकारची रचना दिवान-ए-खासचीही होती. मात्र त्या ठिकाणी केवळ विशीष्ट वर्गातल्या लोकांच्याच समस्या जाणून घेऊन त्यावर मार्ग काढण्यात यायचा.

१९३५ साली बॉम्बे प्रेसिडेन्सीत पहिल्यांदा झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिवान-ए-आम आणि दिवान-ए-खास या शब्दांवरुन आमदार आणि खासदार ह्या बिरुदांची सुरुवात झाली असावी असा अंदाज आहे. विशेषकरुन सांगायचं झालं तर अशी बिरुदे केवळ आपल्या महाराष्ट्रातच वापरली जातात.

महाराष्ट्राबाहेर हिंदीचा प्रभाव असलेल्या भागात आमदाराला आणि खासदाराला अनुक्रमे विधायक आणि सांसद अशी बिरुदे वापरली जातात. राज्यघटनेच्या भाषेत बोलायचे झाले तर मात्र विधानसभा किंवा विधानपरिषद सदस्य आणि लोकसभा किंवा राज्यसभा सदस्य याच अधिकृत शब्दांचा वापर करावा लागतो.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *