म्हणूनच बच्चू कडूंचा हा निर्णय कौतुकास्पद व अभिमानास्पद वाटतो..

भांडवलदारांच्या मागे लागलेल्या राजकीय पक्षांना बच्चू कडूंची मुस्काडात !

सध्या राजकारणाचा सिजन सुरू आहे. सर्व पक्षाचे नेते उमेदवारांच्या शोधात आहेत. प्रत्येक पक्ष पऴवापऴीत व्यस्त आहे. एक पक्ष बापाला पऴवतोय तर दुसरा पक्ष पोराला पऴवतोय तर तिसरा पक्ष त्याच्या बायकोला पऴवतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा कोंडकेचा पऴवापऴवी पिक्चर सध्या जाम हिट झालाय. बहूतेक पक्ष उमेदवारीची थैली घेवून भांडवलदारांच्या दारात बसले आहेत.

आमच्याकडून तुम्हीच लढा व तुम्हालाच उमेदवारी देतो म्हणून भांडवलदारांचे व प्रस्थापितांचे तऴवे चाटत आहेत. या भाऊगर्दीत प्रत्येक पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र उघड्यावर पडलाय. त्याला कोणी वाली नाही. तो पायातल्या जोड्यापेक्षा निसुक ठरलाय. त्याची औकाद फक्त सतरंज्या उचलण्याच्या लायकीचीच असल्याचे सिध्द केलय. उमेदवार्या ठराविक घरातच दिल्या जातायत, मग पक्ष कोणताही असो. याच लोकांच्या घरात सगऴे पक्ष आहेत.

भांडवलदारांच्या मागे लागलेल्या सर्वच पक्षांना व नेत्यांना प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आमदार बच्चू कडूंनी सणसणीत मुस्काडात दिली आहे. त्यांनी यवतमाऴ मतदारसंघातून वैशालीताई येडे या आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या पत्नीस लोकसभेची उमेदवारी दिली आहे. म्हणूनच वैशालीताई येडेंची उमेदवारी महत्वपुर्ण आहे. वैशालीताई येडेंच्या पतीने सातवर्षापुर्वी कर्जाला कंटाऴून आत्महत्या केली होती. आज राजकारणातून सामान्य माणसांचा चेहरा हरवला आहे. भांडवलदारांच्या गर्दीत व पैशाच्या खणखणाटात सामान्य माणूस राजकारणाच्या बाहेर भिरकावला गेलाय.

पैसा असल्याशिवाय राजकारणात प्रवेशच शक्य नाही. असे चित्र देशभर आहेच पण पुरोगामी म्हणवणार्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. सामान्य घरातला उमेदवार किंवा व्यक्ती राजकारणात येण्याची कल्पना करण्याची हिम्मतसुध्दा करत नाही. सांगली मतदारसंघात शेतकरी संघटणेचे खासदार राजू शेट्टींसारखा माणूसही धन-दांडग्या उमेदवारांच्यामागे लागतो. उमेदवारी करण्यासाठी त्यांनाच आर्जव करतो. अशावेऴी आमदार बच्चू कडूंनी दिलेला चेहरा नक्कीच आशेची पालवी वाटतो.

गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात शेतकर्यांच्या लाखो आत्महत्या झाल्या. किडा-मुंगी मरावे तसे शेतकरी मेले. गेल्या चार वर्षात अच्छे दिनाची लालूच दाखवलेल्या सरकारच्या कार्यकाऴात म्हणजे २०१५ ते १८ या काऴात तब्बल ६८०० शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. या कालखंडात शेतकर्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण तब्बल ९१% वाढले आहे. १९ मार्च १९८६ साली यवतमाऴ जिल्ह्यातील चिखलगव्हाणच्या साहेबराव करपे नावाच्या शेतकर्याने केलेली महाराष्ट्रातील पहिली आत्महत्या होती. साहेबराव करपेंनी त्यांच्या बायका-मुलांसह आत्महत्या केली होती. पवनार आश्रमात जेवणात विषारी औषध कालवून त्यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी चिठ्ठी (सुसाईड नोट) लिहीली होती. सदर चिठ्ठीत, “शेतकरी म्हणून जगणे कठीण आहे !” असे लिहीले होते. करपे त्यांच्या गावचे पंधरा वर्षे सरपंच होते. आज या घटणेला तेहत्तीस वर्षे लोटली. गत ३३ वर्षात महाराष्ट्राच्या मातीत अडीच लाखाच्यावर शेतकर्यांनी आत्महत्या केल्या. ३३ वर्षापुर्वी साहेबराव करपेंनी लिहीलेल्या चिठ्ठीत जे म्हंटले होते त्यात फारसा बदल झालेला नाही.

आजही शेतकरी म्हणून जगणे कठीणच आहे. त्यावेऴी मरणारा साहेबराव होता. आज मारणारा रावसाहेब आहे. सत्ताबदलाने फक्त पुढचा राव मागे गेला अन मागचा साहेब पुढे आला. शेतकर्यांच्या वाट्याचे मरण अटऴच आहे. सरकारातला मस्तवाल रावसाहेब (दानवे) शेतकर्यांना साल्या म्हणतो, शेतकर्यांना हिनवतो. ३३ वर्षाच्या कालखंडात शेतकर्यांच्या वाट्याला फारसं काही आलं नाही. अच्छे दिनाची शेपुट काढलेल्या सरकारने शेतकर्यांना साल्या नावाची शिवी पदक म्हणून घोषित केली. याच सरकारने मंत्रालयात रक्तबंबाऴ होईपर्यंत एका शेतकर्याला मारले.

धर्मा बाबा आत्राम नावाच्या वयोवृध्द शेतकर्याचा मंत्रालयातच बऴी घेतला. त्यामुऴे यवतमाऴ जिल्ह्यातील चिखलगव्हाणचे सरपंच साहेबराव करपेंनी आत्महत्या करताना जे लिहीले होते ते रोज उघड्या डोऴ्यांना दिसतय. सर्वांचा पोशिंदा आजही तसाच मरतोय. कधी विष पितोय, कधी फास घेतोय. पण सरकारातल्या आणि सरकारी कार्यालयातल्या रावसाहेबांना त्याचे काहीच वाटत नाही.

आज ३३ वर्षानंतर एखाद्या आत्महत्या केलेल्या शेतकर्याच्या पत्नीलाच लोकसभेची उमेदवारी दिली जातेय ही बाब नक्कीच विचार करायला लावणारी आहे. अवघा महाराष्ट्र विविध पक्षीय नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या कहाण्या आणि शरद पवारांच्या खेऴ्यात गुंतलाय. माध्यमात याचीच चर्चा आहे. पण बच्चू कडूंनी या भांडवलदारांना व त्यांच्या पक्षांना चांगलीच चपराक दिलीय. खरेतर सणसणीत मुस्काडात लगावलीय. पण त्याची चर्चा कुठेच होत नाही. माध्यमं यावर प्राईम टाईममध्ये चर्चा करत नाहीत. की त्याची बातमी करत नाहीत.

वैशाली येडेंना उमेदवारी देणे व त्या निवडूण आणणे म्हणजे आत्महत्या केलेल्या तब्बल अडीच लाख शेतकर्यांना खरीखुरी श्रध्दांजली वाहण्यासारखे आहे. राज्यात सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्या यवतमाऴ जिल्ह्यात झालेल्या आहेत. त्याच यवतमाऴ जिल्ह्यातील वैशाली येडेंची उमेदवारी शेतकर्यांचा आवाज संसदेत पोहोचवणारी आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याने जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून वैशाली येडेंना ताकद द्यायला हवी. कारण त्यांना ताकद देणे म्हणजे आपल्या शेतकरी बापाला अभिवादन करण्यासारखे आहे. वैशाली येडेंची उमेदवारी खर्या अर्थाने सामान्यांचा आवाज बुलंद करणारा आहे. म्हणूनच बच्चू कडूंचा निर्णय कौतुकास्पद व अभिमानास्पद वाटतो.

-दत्तकुमार खंडागऴे संपादक वज्रधारी, मो. 9561551006

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *