कासवांच्या जत्रेसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या गावाची गोष्ट !

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात तिन्ही बाजुंनी डोंगर आणि एका बाजुला समुद्र असणारं वेळास गाव आपल्या कुशीत अनेक गुपिते घेऊन वसलेले आहे. जेमतेम दोनशे घरे असलेल्या वेळास गावात आंबा, सुपारी आणि नारळ यावर उदरनिर्वाह करणारे लोक राहतात. गेली काही वर्षे कासवांच्या जत्रेमुळे हे गाव चर्चेत आले आहे.

काय असते ही कासवांची जत्रा ?

कासव जत्रा म्हणजे कासवांचे संग्रहालय वगैरे नाही. आपल्या महाराष्ट्राला ७२० किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. आपल्या सागर किनाऱ्यावर चार प्रकारच्या कासवांच्या प्रजाती सापडतात. यापैकी “ऑलिव्ह रिडले” या जातीची मादी कासवे नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत समुद्रात शेकडो मैलांचा प्रवास करुन वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर येतात. रात्रीच्या वेळी लाटांच्या भरती रेषेच्या वर सुरक्षित ठिकाणी वाळुमध्ये एक-दिड फुट खड्डा खोदुन त्यात १००-१५० अंडी घालते आणि समुद्रात निघुन जाते. एकदा गेल्यानंतर ती मादी कासव परत येत नाही त्यामुळे त्या अंड्यातील पिल्लांना कोणीच पालक नसतो. ४५ ते ५० दिवस हा अंडी उबवणीचा काळ असतो.

साधारण मार्च महिन्यात ५० ते ५५ पिल्ले अंड्यातुन बाहेर पडतात. अंड्यातुन बाहेर पडल्यांनातर ही लहानशी पिल्ले कुठल्याही मदतीशिवाय मुलायम रेतीमधुन तुरुतुरु चालत अथांग सागराकडे धाव घेतात. या पिल्लांना पाण्याचा स्पर्शही कधी माहीत नसतो तरी लाटांवर स्वार होण्याचे धाडस ती करत असतात. समुद्राच्या निर्दयीपणे त्या पिल्लांना किनाऱ्याकडे भिरकावुन देतात, मात्र पिल्ले पुन्हापुन्हा प्रयत्न करतात. त्यांची पाण्यात जाण्याची आस जबरदस्त असते. शेवटी अनेक संकटांचा सामना करत हजारो पिल्लांपैकी काहीच पिल्ले समुद्राच्या कुशीत जाऊन विसावतात, बाकीची शिकार होतात.

ऑलिव्ह रिडले कासवांच्या पिल्लांचे अंड्यातुन बाहेर येण्यापासुन ते त्यांचे समुद्रात जाईपर्यंतची दृश्ये अतिशय मनमोहक असतात. वाळुतील घरट्यापासुन अथांग सागराकडे तुरुतुरु चालत जाताना त्यांचं अडखळणं, इवल्याश्या पायांनी रेतीत नक्षी काढणं, त्यांच्या मनमोहक बाळलीला पर्यटकांनाही पाहता याव्यात म्हणुन वेळास येथे फेब्रुवारी-मार्च महिन्यात “कासव महोत्सव” आयोजित केला जातो.

पुर्वी कासवाची अंडी लोक खाण्यासाठी घेऊन जायचे किंवा कुत्री, खेकडे, पक्षी यांच्या भक्ष्यस्थानी पडायची. त्यामुळे इंडो-जर्मन जैवविविधता प्रकल्पाअंतर्गत वेळास येथे सागरी कासव संवर्धन क्षेत्र स्थापन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या संवर्धन कामामुळे ऑलिव्ह रिडले कासवांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे मादी पिल्ले १५ वर्षांनंतर हजारो मैलांचा प्रवास करुन आपल्या जन्मस्थानी विणीच्या हंगामात अंडी देण्यासाठी येतात, त्यामुळे इथे जन्मलेली मादी पिल्लेही काही वर्षांनंतर वेळासच्या समुद्रकिनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी येतील.

कासवांच्या अंड्यांना इजा होऊ नये म्हणुन निसर्गप्रेमी व्यक्तींकडुन किनाऱ्यावर हॅचरी तयार करण्यात येते. त्यात कासवाची अंडी शोधुन आणली जातात. मुळ घरट्याप्रमाणे वातावरण निर्माण करुन त्यावर टोपली झाकली जाते. त्यांचे संगोपन केले जाते.

देशविदेशातील पर्यटकांना कासवांच्या जन्माचा नजारा पाहता यावा म्हणुन मार्च महिन्यात कासवजत्रा आयोजित केली जाते. पिल्लांचा जन्म झाला की त्यांना लगेच समुद्रात सोडलं जातं, त्यामुळे संवर्धनस्थळी भेट देणाऱ्या प्रत्येकाला हा नजारा बघायला मिळेल याची खात्री नसते. मात्र साधारणपणे एखाद्या घरट्यातील कासवाची पिल्ले बाहेर येऊ लागली की लागोपाठ काही दिवस त्यातुन पिल्ले बाहेर येत राहतात.

सकाळ उजाडते. ठरावीक वेळी ती घरट्यावरील टोपली बाजुला सारली जाते आणि त्या बाळराजांना पहिल्या सूर्यप्रकाशाचा अनुभव मिळतो. ती कोवळी उन्हे झेलत त्यांचा सागर प्रवास चालू होतो. अंड्यांतून बाहेर आलेल्या त्या इवल्याशा पिल्लांचा प्रवास पाहणे मौजेचे असते. नैसर्गिकरीत्याच लाभलेली कूर्मगती. वाळूतून पुढे सरकणारी त्यांची इवलीशी पावले, ‘ही चाल तुरुतुरु’ निसर्ग गीत साकारत असतात. हा निसर्गाचा अद्भुत देखावा आयुष्यात एकदा तरी नक्की पहा.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *