मनोहर पर्रिकरांना झालेला स्वादुपिंडाचा कर्करोग किती जीवघेणा असतो वाचा माहिती

गोव्याचे मुख्यमंत्री गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना कर्करोग असल्याच्या गोष्टी लोकांमध्ये चर्चेचा विषय बनल्या होत्या, परंतू कुठल्याही विश्वसनीय सूत्रांनी या चर्चा खऱ्या असल्याचा दावा केला नव्हता. आता त्या चर्चा खऱ्या असल्याचे समोर आले आहे. गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी माहिती दिल्यानंतर मनोहर पर्रीकर यांना स्वादुपिंडाचा कर्करोग होता ही गोष्ट स्पष्ट झाली. पर्रीकर आपल्या राहत्या घरीच कर्करोगावर उपचार घेत होते. त्यांना एम्समध्येही दाखल करण्यात आले होते. परंतु कर्करोगाशी लढता लढता या नेत्याने प्राण सोडले.

काय असतो स्वादुपिंडाचा कर्करोग ?

आपल्या पोटात जठराच्या मागे स्वादुपिंड हा पचनक्रियेतील महत्त्वाचा अवयव असतो. खाल्लेल्या अन्नाचे पचन करण्यासाठी स्वादुपिंडाचा उपयोग होतो. हा अवयव पोटात वरच्या बाजुला उजवीकडे आतमध्ये असतो. थोडक्यात आपल्या पोट आणि पाठीच्या कणा यामध्ये सँडविचप्रमाणे तो तो स्थित असतो. लहान आतड्याची जिथून सुरुवात होते तिथे याचा एक भाग असतो.

स्वादुपिंडाचे काम काय असते ?

स्वादुपिंड पाचक रस व इन्सुलिनचे स्रवण करतो. हा पाचक रस आणि इन्सुलिन स्वादुपिंडातुन लहान आतड्यात सोडले जाते. तिथे लहान आतड्यात अन्नाचे विघटन होऊन शरीराला आवश्यक ऊर्जा निर्माण करण्याचे कार्य पार पडते. स्वादुपिंडातील इन्सुलिनमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य ठेवले जाते व इन्सुलिन कमी झाल्यास डायबेटिस होतो. म्हणजेच स्वादुपिंड दोन महत्वाची कामे करते. एक, खाल्लेल्या अन्नाचे पचन करणे आणि दोन, रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य राखणे.

स्वादुपिंडाचा कर्करोग किती धोकादायक असतो ?

स्वादुपिंडालाही कर्करोगाची भयानकता यावरुनच ओळखा की या रोगाला “सायलंट किलर” म्हणुन ओळखले जाते. कारण याच्या सुरुवातीच्या काळातील लक्षणांच्या आधारे हा कर्करोग झाल्याचे निष्पन्न करणे खूप जिकिरीचे काम असते आणि नंतर व्यक्तीगणिक याची वेगवेगळी लक्षणे पाहायला मिळतात. कुणाला पोटाच्या वरच्या बाजूला अत्यंत कळा येतात तर कुणाचे वजन एकदम कमी व्हायला लागते. कावीळ होणे, नाकातून रक्त येणे, भूक न लागणे किंवा नैराश्य जाणवणे ही याची लक्षणे आहेत.

सुरुवातीच्या काळात या रोगाचे निदान झाले तरी हा बरा करणे खूप अवघड असल्याचे सांगितले जाते. त्यात हा रोग झाल्याचे लवकर निष्पन्नही होत नाही. धूम्रपान, अति वजन, जेवणात पालेभाज्यांची कमतरता अशा कारणांमुळे हा रोग उद्भवतो.

इतर कर्करोगांच्या मानाने स्वादुपिंडाचा कर्करोग लवकर पसरतो आणि रुग्ण त्या मानाने लवकर दगावतो. आज जगात सर्वसाधारणपणे पाच लाख रुग्ण दरवर्षी या आजाराने मृत्यू पावतात. प्रगत उपचार पद्धती उपलब्ध असूनसुद्धा निदानानंतर फक्त पाच टक्के रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगतात.

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार कसे केले जातात ?

१) शस्त्रक्रिया – शस्त्रक्रिया या एकमेव उपचाराने हा आजार पूर्णपणे बरा करता येतो. परंतु यामध्येही अडचण आहे. हा कर्करोग झाल्याचे निष्पन्न होऊन त्यावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येईपर्यंत हा रोग खूप तेजीने शरीरात वाढलेला असतो. अशा परिस्थितीत शस्त्रक्रियेच्या यशस्वीतेचे प्रमाण केवळ १५-२०% असते. हा कर्करोग शरीरात इतर ठिकाणी पसरला तर मग शस्त्रक्रिया करूनही माणूस बरा होत नाही.

२) रेडिओथेरपी – या उपचारात कर्करोग झालेल्या भागावर क्ष किरणांचा मारा करुन नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो.

३) केमोथेरपी – या उपचारात औषधे शरीरात पसरणाऱ्या कर्करोगालाच्या पेशींना मारुन टाकतात किंवा त्यांची वाढ थांबवतात. जास्तीत जास्त अचूकपणे इलाज होण्यासाठी हा उपचार शक्यतो शस्त्रक्रिया आणि रेडिओथेरपी सोबत केला जातो. या उपचारात काही औषधे तोंडावाटे घ्यावी लागतात तर काही औषधे नसांमध्ये इंजेक्शनने द्यावी लागतात.

जसजसा हा कर्करोग वाढत जातो, तसतसे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत जाते. छोट्या आतड्याच्या कार्यात अडथळे निर्माण होत असतानाच पोटामध्ये जोरात दुखू लागते. वजन गतीने कमी होते. स्त्रियांच्या मानाने पुरुषांमध्ये हा कर्करोग अधिक प्रमाणात आढळून येतो. त्यातल्या त्यात जास्त वय असणाऱ्यांमध्ये अधिकच.

कर्करोग हा जीवघेणा रोग आहे. तो कुणालाही होऊ नये.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *