समाजाने जिला वांझ ठरवले तिने लावली ३८४ वडाची झाडे, राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला पद्मश्री!

कर्नाटकच्या सालुमर्दा थिमक्का या १०७ वर्षांच्या आजीला पर्यावरणासंबंधी कार्यासाठी यंदाचा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या आजीने ७० वर्षापुर्वी कर्नाटकमधील हुलीकल ते कुडूर या गावांदरम्यान चार किलोमीटरपर्यंत वडाची ३८४ झाडे लावली लावली आणि ती जगवलीही ! जाणुन घेऊया थिमक्का आजीचा थक्क करणारा प्रवास !

थिमक्का आणि चिक्कण्णा हे कर्नाटकच्या रामनगर जिल्ह्यातील हुलीकल येथील दाम्पत्य लग्नानंतर बरीच वर्षे झाली तरी मुलबाळ होत नाही म्हणुन लोकांच्या हेटाळणीचा विषय झाले होते. या निराशेपोटी थिमक्का यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला पण चिक्कण्णाने त्यांना सावरले. त्यावेळी हुलीकल ते कुडूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु होते. आपल्याला मुलबाळ होत नाही तर आपण मजुरी करत करत या रस्त्याच्या कडेला झाडं लावू, त्यांना मुलाबाळांसारखे सांभाळू हा विचार त्यांच्या मनात आला आणि सुरु झाला थिमक्का आजीचा प्रवास !

दरवर्षी हे जोडपं १५-२० वडाची झाडे लावू लागलं. चिक्कण्णा झाडांना आळे करायचे तर थिमक्का झाडांचे संगोपन करायचे काम करु लागल्या. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी या झाडांची काळजी घेतली. दरवर्षी झाडे लावत लावत त्यांनी चार किलोमीटर अंतरापर्यंत झाडे लावली. राष्ट्रीय महामार्गावरील हुलीकल आणि कुडुर या गावांच्या दरम्यान चार किलोमीटर लांब रस्त्याच्या दुतर्फा एक एक करत अशी ३८४ वडाची झाडं त्यांनी लावली. ७० वर्षांपुर्वी या जोडप्याने लावलेली शेकडो झाडे आज प्रवाशांना सावली आणि पशुपक्षांना आश्रय देत उभी आहेत. त्यांना आता सालुमर्दा थिमक्का (सालुमर्दा – झाडांची रांग) असे नाव पडले आहे. १९९० मध्ये चिक्कण्णा मरण पावले. त्यानंतरही थिमक्का थांबल्या नाहीत. एकट्या थिमय्यांनी स्वतः ८००० इतर झाडे लावुन ती जगवली. थिमक्का आजीला लोक आज “वृक्षमाता” म्हणुन ओळखतात.

थिमक्का यांच्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते २०१९ चा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. पुरस्कार स्वीकारण्यासाठी थिमक्का अनवाणी पायांनीच राष्ट्रपती भवनात आल्या. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यांचा साधेपणा पाहून पुरस्कार स्वीकारतेवेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. यावेळी राष्ट्रपतींच्याही भावना अनावर झाल्या होत्या. “देशातील सर्वात श्रेष्ठ आणि योग्य प्रतिभाशाली व्यक्तींना पद्म पुरस्कारांनी सन्मानित करणे आनंददायी असते. परंतु पर्यावरण सुरक्षेसाठी मोठे काम करणाऱ्या कर्नाटकच्या १०७ वर्षांच्या आजी सालुमरदा थिमक्का यांनी माझ्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला तेंव्हा माझे हृदय भावनांनी भरुन आले होते” अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली. महिलांच्या संकल्पशक्ती, दृढनिश्चय आणि एकाग्रतेचे थिमक्का हे मोठे उदाहरण आहे, अशा शब्दात त्यांनी थिमक्कांचा गौरव केला.

“हा पुरस्कार मला जाहीर झाला पण मला खरोखर हा पुरस्कार काय असतो ते माहीत नाही. आम्ही लावलेली झाडे आमच्या मुलांसारखी असुन मी त्यांची मुलांप्रमाणेच काळजी घेते” अशी प्रतिक्रिया यावेळी थिमक्का यांनी व्यक्त केली.

थिमक्का यांच्या कामाबद्दल १९९५ मध्ये राष्ट्रीय नागरी पुरस्कार, १९९७ मध्ये इंदिरा गांधी प्रियदर्शिनी वृक्षमित्र पुरस्कार तसेच विरचक्र प्रोत्साहन पुरस्कार मिळाला आहे. २००० मध्ये कर्नाटक कल्पवल्ली पुरस्कार, २००६ मध्ये गॉडफ्रे फिलिप्स साहस पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगकडून त्यांना विशालाक्षी पुरस्कार दिला आहे. बीबीसीने १०० प्रभावशाली महिलांमध्ये थिमक्कांचा समावेश करुन त्यांना गौरविले होते.

समाजाने वांझोटी ठरवलेल्या थिमक्कांनी वृक्षाच्या रुपात आज शेकडो मुले जन्माला घातली आहेत आणि तीच मुले पुढची शेकडो वर्षे समाजाला थिमक्कांची कीर्ती सांगत उभी असणार आहेत.

१०७ वर्षांच्या थिमक्का या आजही दारिद्र्यरेषेखालील महिन्याला ५०० रुपये सरकारी पेन्शनवर चरितार्थ चालवत आहेत. एवढे असुन गरिबांसाठी हॉस्पिटल काढण्याचे त्यांचे स्वप्न आहे. सध्या थिमक्का बेल्लूर तालुक्यातील बेल्लूर गावात आपला दत्तक पुत्र उमेश यांच्याकडे राहतात. थिमक्का यांचा वारसा चालविण्यासाठी उमेशही दररोज एक झाड लावतात.

असे समजले जगाला थिमक्कांचे कार्य

थिमाक्कांचा मुलगा उमेश याने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, एकदा हुलिकल गावाजवळून कर्नाटकातील एका खासदाराचा ताफा जात होता. गाडीमध्ये अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी संपूर्ण ताफा थांबवला आणि ते खाली उतरले. खाली उतरल्यानंतर ते खासदार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या वडाच्या झाडा खाली सावलीत काही क्षणांसाठी निवांत बसले. मोकळ्या हवेमुळे आणि सावलीमुळे त्यांना थोड्याच वेळात बरं वाटू लागलं. थोडं बरं वाटू लागल्यानंतर रस्त्याच्या बाजूला अशी वडाची झाडं एका रांगेत कोणी झाडं लावली असा प्रश्न त्यांना पडला.

यासंदर्भात त्यांनी विचारपूस केली असता स्थानिकांनी त्यांना थिमक्कांचं नाव सांगितलं. लगेचच खासदार साहेब आपल्या लव्याजम्यासहीत थिमक्कांच्या घरी त्यांचे आभार मानण्यासाठी पोहचले. निघताना थिमक्कांनी खासदाराला जेवण करुन खायला घातल्याचंही उमेश यांनी सांगितलं. या खासदाराने त्याला आलेला हा अनुभव एका कार्यक्रमात सांगितला. तेव्हापासून थिमक्कांच्या कार्याची माहिती जगभरात पसरली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *