नदीपासुन आपल्या गावापर्यंत तीन किलोमीटरचा कालवा तयार करणारा कॅनॉल मॅन!

आपण सगळ्यांनी “मांझी – द माऊंटन मॅन” हा चित्रपट पाहिला असेल. बिहारच्या दशरथ मांझी यांच्या जीवनावर तो चित्रपट होता. मांझीची पत्नी त्यांच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन येत असताना डोंगरावरुन पाय घसरुन पडली आणि त्यातच ती मरण पावली. याचा बदला म्हणुन मांझीने सलग २२ वर्ष डोंगर फोडुन त्यातुन ३६५ फुटांचा रस्ता तयार केला आणि शहरात जाण्यासाठी ८० किलोमीटरचा वळसा घालावा लागायचा तो वाचवला. या कामाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.

असाच एक अवलिया ओडिशा मध्येही आहे. त्यांचे नाव दैतारी नायक उर्फ कॅनॉल मॅन ! ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात रहाणाऱ्या ७५ वर्षीय दैतारी नायक यांनी आपल्या हातांनी गोनसिका पर्वतात तीन वर्षे खोदकाम करुन नदीपासुन आपल्या गावापर्यंत तीन किलोमीटरचा कालवा तयार केला आहे. त्यांनी आपल्या अथक परिश्रमाने कृषी सिंचन आणि पेयजलाची समस्या कायमची संपुष्टात आणली आहे. त्यांच्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

दैतारी ज्या भागात राहतात तिथल्या बांसपाल, तेलकोई आणि हरीचंदपुर भागातील कित्येक गावे पाण्याच्या प्रश्नांनी त्रस्त आहेत. तिथे प्यायलाही पाणी उपलब्ध नाही. प्यायला पाणी नसल्याने शेतीसाठी लोकांना पावसावर अवलंबुन राहावे लागत होते.

दैतारी यांच्या सांगण्यानुसार गावात शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने धान्य पिकवु शकत नव्हते. त्यासाठी आपल्या परिवारातील लोकांना सोबत घेऊन त्यांनी पर्वतातुन पाट काढुन पाणी आणण्याचे ठरवले. जिल्हा प्रशासन आणि गावातील लोकांनी काहीच मदद केली नाही म्हणुन दैतारी यांनी आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन स्वतःच हा कालवा तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तीन वर्षे प्रयत्न करुन वैतरणा नदीतुन गावात पाणी आणले. वयाच्या सत्तरीत या जिद्दीने केलेले काम खुप मोठे आहे. त्यांनी सिद्ध केले की शेतकऱ्याने एकदा मनाशी ठरवले तर आपल्या शेतीसाठी, आपल्या गावासाठी ते काहीही करु शकतात. आज लोक त्यांना कॅनॉल मॅन नावाने ओळखतात.

आता या कालव्यातील पाण्यावर तिथले लोक तांदूळ, मोहरी, मका अशी पिके घेत आहेत. केओंझारचे जिल्हाधिकारी आशिष ठाकरे यांनी दैतारी नायक यांच्या दृढनिश्चयाचं व कष्टांचं कौतुक केले आहे. दशरथ मांझीने डोंगर फोडुन रस्ता केला तर दैतारी नायक यांनी नदीपासुन गावापर्यंत कालवा केला. या जिद्दीला सलाम !

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *