फोटो पाहून हे तुम्हाला विमानतळ वाटेल पण हे विमानतळ नव्हे, हे आहे महाराष्ट्रातील एक बसस्थानक..

बल्लारपूर या औद्योगिक व ऐतिहासिक शहरात नव्याने बनलेले अवाढव्य आणि तेवढेच सुशोभित बसस्थानक केवळ विदर्भातच नव्हे तर महाराष्ट्रातील स्पर्श बसस्थानक (टच बस स्टॅन्ड) म्हणून ते एकमेव असावे! स्पर्श बस स्थानक म्हणजे, बस प्रवाशांना घेऊन येणे, उतरविणे, नवीन प्रवासी घेणे आणि लगेचच तेथून पुढच्या मार्गावर रवाना होणे. या बसस्थानकाचे देखणे रूप पाहून हे एखादे विमानतळच असावे असे वाटले नाही तर नवलच. बल्लारपूरकरांनी कधी कल्पना केली नाही, असे भव्य व नेत्रदीपक बसस्थानक आकाराला आले असून त्याचे लोकार्पण ६ मार्च रोजी झाले.

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूरचे बसस्थानक भव्य आणि अत्याधुनिक व ‘बस देखते रह जायेंगे’, असे सुशोभित असणार असा संकल्प केला व तो तडीस नेला आहे. या विशाल बसस्थानकावर प्रवाशांकरिता सुविधाही तेवढ्याच अत्याधुनिक आहेत.

वैशिष्ट्ये –

एकूण क्षेत्रफळ – १२० मीटर, इमारतीचे एकूण क्षेत्रफळ ६८ मीटर बॉय ६८ मीटर, महिला व पुरुष प्रवाशांकरिता वेगवेगळे प्रतीक्षालय, सर्वत्र पंख्यांची व विद्युत प्रकाशाची व्यवस्था, मुळात स्थानकाचे आत हवा खेळती राहावी असे बांधकाम, आतील गरम हवा बाहेर जाऊन तयार होणारे प्रसन्न, पर्यावरण पोषक वातावरण, प्रवाशी बसण्याकरिता तीन सिटरच्या एकूण ११० खुर्च्या, बसेस थांबण्याकरिता एकूण १२ फलाट असून २४ बसेस थांबण्याची व्यवस्था

बसेस येण्या-जाण्याची वेळ सांगण्याकरिता ध्वनीयोजना, कॅन्टीन, फळ, बुकस्टाल व जनरल स्टोर्सकरिता गाळे, स्थानकातच एटीएमची व्यवस्था, एकूण शौचालय १५ (महिला, पुरुष व अपंग यांच्याकरिता भारतीय बैठकीचे व विदेशी बैठकीची प्रत्येकी तीन व चार), पिण्याच्या पाण्याच्या सोयीकरिता शुद्ध व थंड पाणी देणारे मोठ्या क्षमतेचे आॅरो यंत्र, स्थानकाच्या आवारातच दुचाकी, चार चाकी व आॅटो पार्किंगची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, प्रवाशांना फ्रेश होण्याकरिता बाथरुमही आहेत.

यासोबतच नयनरम्यता म्हणून बसस्थानकाची वेगवेगळ्या प्रकारे सजावट करण्यात आली आहे. भिंतीवर आधुनिक पद्धतीने वन्यप्राण्यांची चित्रे रेखाटली आहेत. यात भडक रंगाचा वापर टाळून सौम्य व आकर्षक रंग वापरण्यात आले आहेत, हे विशेष! प्रवेशद्वारावर वेळ दर्शविणाऱ्या घडीचा सुमारे ७० फूट उंच असा देखणा मनोरा उभा करण्यात आला असून तीन दिशांनी घड्या लावल्या आहेत.

बसेसना जाण्या-येण्याकरिता दोन मोठे प्रवेशद्वार असून पायदळ प्रवाशांना येण्याजाण्याची, तद्वतच आॅटोकरिता वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. बसस्थानकाच्या आवाराच्या सीमा हिरवळीने सजविण्यात आल्या आहेत एकंदरीत, बसस्थानकात प्रवेश करताच, प्रवाशी प्रसन्न व्हावेत! या साऱ्या सुख – सुविधांची निगा राखण्याकरिता आवश्यक तेवढ्या संख्येत सुरक्षा रक्षक राहणार आहेत. इमारतीचे आर्कीटेक्चर रवी सोनकुसरे असून बांधकाम राहुल मोडक व एस.डी. क्षीरसागर यांच्या देखरेखेत व इमारत निरीक्षक पी.एच. अंबादे यांच्या मार्गदर्शनात झाले आहे.

परिसरातील झाडांचाही बांधकामात वापर

या बसस्थानकाच्या जागेवर मोठ्या आकाराचे पिंपळाचे दोन वृक्ष होते. त्यांचे वय निदान दीडशे वर्षे असणारच! नवीन इमारतीकरिता त्या वृक्षांना तोडण्यात आले. पण, मुळासकट नव्हे! जमिनीवरील सुमारे चार फूट भाग तसाच कायम ठेवून त्याभोवती चबुतरे बांधून बुंध्याला रंगरंगोटीने सजवून, त्याला आकर्षक करण्यात आले आहे. या वृक्ष बुंध्यामुळे स्थानकाच्या आकर्षणात भर पडली आहे.
-अमोल चंद्रकांत कदम

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *