भाजप-सेना युतीनंतर ‘स्वबळ’ या शब्दाला एका पत्रकाराने लिहिलेले खुले पत्र..

प्रिय स्वबळ,
मातोश्री,
मुंबई.

खरंतर एखाद्या शब्दाला काय पत्र लिहावे? पण, स्वबळ, तुला पत्र लिहावे वाटले. मनापासून वाटलं, तुझ्याशी बोलावं. पत्र पाहताच तुला पत्राचा विषय कळला असेल. त्यामुळे फार औपचारिकता न ठेवता, सर्वप्रथम जड अंतःकरणाने तुझ्याप्रती सहानुभूती व्यक्त करतो. आणि दोन शब्दांचे हितगुज तुझ्याशी करतो.

गेल्या वर्षा-दोन वर्षात झालेली तुझी झालेली हेळसांड, तुझा झालेला वापर, तुझी झालेली थट्टा पाहून मन आतून-बाहेरुन आरपार हेलावत होते रे. पण अखेर तू सुटलास. मलाच फार हायसं वाटलं.

हल्ली आपल्याकडे शब्दांची यथेच्छ थट्टा सुरु आहेच. मात्र तुला तर पार मातीमोल केलं होतं. ते पाहून तीव्र वेदना व्हायच्या. अनेकदा अश्रूही ढाळले. नाही नाही, मोदींसारखे नाही, खरे अश्रू. तुला खोटे वाटेल. आणि ते साहजिक आहे. कारण इतक्या खोटारड्या लोकांसोबत दिस-रात वावरल्यानंतर सगळं खोटं खोटं दिसणं साहजिक आहे. असो. आता तू यातून मुक्त झालास. आता तुला तुझं मूळ अस्तित्व मिळेल.

तुला आठवतंय? दादरच्या शिवतीर्थावर पहिल्यांदा तुझा उच्चार झाला – “आगामी निवडणुका ‘स्वबळा’वर लढणार”. आम्हा शब्दांच्या चाहत्यांना फार अभिमान वाटला. म्हटले, चला अवघ्या राज्याला ज्या शैलीचे सुप्त आकर्षण आहे, त्यांच्या तोंडी आपल्या स्वबळ शब्दाला जागा मिळाली. एकप्रकारे राजाश्रय! किती आनंदात होतो आम्ही. शिवतीर्थावर त्या तास-दीड तासाच्या भाषणात लाखोंच्या जनसागरासमोर तुझा दहा-बारा वेळा उल्लेख झाला. म्हणजे अॅक्च्युअली त्यांनी ५-६ वेळा उल्लेख केला. पण साहेबांना डबल बोलायची सवय असल्याने बहुधा १०-१२ वेळा झाला असेल. पण काही असो. ५-६ वेळा उल्लेख होणे, हे काय कमी आहे? तेही शब्द म्हणून अभिमानास्पदच की!

पुढे जसजसे दिवस सरत गेले, तसतसा तुझा वापर सारखा सारखा होऊ लागला. पक्षातला सोम्या-गोम्या तुझ्या नावाने ढेकरं देऊ लागला. सामनाच्या संपादकीयपासून ते साहेबांच्या भाषणापर्यंत, ते अगदी पोस्टर-बिस्टर सगळीकडे तुझ्याच नावाचा डंका. एखाद्या शब्दाला इतका मान-सन्मान मिळावा, हे तसे आपल्या शब्दांच्या नशिबात कुठे? पण तुला मिळाला. म्हणून आमचेही दिवस आनंदात सरत होते. पण पुढे जे झालं त्याने लाज जायला सुरुवात झाली. मान शरमेनं खाली यायला सुरुवात झाली.

हळूहळू तुझा वापर इतका होऊ लागला की बोलून सोय नाही. पण साहेबांचे वर्तन मात्र तुझ्या अर्थाला साजेसे कधीच नव्हते. मग काय, इतरांनी तुझी यथेच्छ खिल्ली उडवायला सुरुवात केली. अगदी आधी नाही का ‘आदर्श’ शब्दाची खिल्ली उडविली गेली, अगदी तशी.

स्वबळ थंडावले, स्वबळ नरमले, स्वबळ घाबरले, स्वबळ बिथरले, स्वबळ लाचार वगैरे वगैरे नाना प्रकारे तुझी टर उडवू लागले. हे पाहून मन हेलावत असे. पण आम्ही काय करणार सांग? आम्ही घाबरुन होतो की, साहेब आणखी कुठला धडाडीचा शब्द घेऊन त्याचीही पार लक्तरे वेशीवर टांगायचे. म्हणून मग शांत बसणे आम्ही सोईचे समजले. पण तुझी होणारी नाचक्की पाहवत नव्हती, हेच खरे.

साहेब तुझा वापर करुन फेकून देणार, हे तुला जवळ केले, तेव्हाच खरंतर अनेकांचा अंदाज होता आणि तसेच झाले. तुला फेकून दिले. वापरुन वापरुन फेकून दिले. मुळात स्वबळ या शब्दाचा रुबाब काय! पण तुझ्या अर्थाचा जो दबदबा होता, त्याचे महात्म्य धुळीत मिळवून फेकून दिले. फार वाईट वाटते रे.

झाले ते झाले. आता तू सुटलास. दीर्घ श्वास घे आणि पुन्हा कामाला लाग. फक्त या राजकारण्यांच्या नादाला लागू नकोस. आज तुझं स्वातंत्र्य पाहून आम्हा सगळ्यांना खूप बरं वाटतंय. लवकरच मातोश्रीवरील सामानसुमान गुंडळ आणि तिथून बाहेर पड. तिथे तुझी होत असलेली घुसमट आम्ही समजू शकतो. परत तिकडे फिरकू नकोस. नाहीतर येरे माझ्या मागल्या!

तुझाच मित्र,
नामदेव अंजना

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *