रेड लाईट एरियात व्हॅलेंटाईनडे साजरा कसा होतो… समीर बापू यांचा लेख

रेड लाईट एरियातही व्हॅलेंटाईनडे साजरा होतो. तिला सोडवू न शकणारे, तिच्या सुटकेसाठी आवश्यक असणारे पैसे जवळ नसलेले, तितकी धमक मनगटात नसलेले, तिला कोठे न्यायचे आणि कसे सांभाळायचे याचे उत्तर माहित नसलेले, पण तिच्यावर मनापासून प्रेम करणारे आजच्या दिवशी भर दुपारी इथे येताना किंचित सुकून गेलेला, पाकळ्या झडायच्या बेतात असलेला, लाली फिकी झालेला थोडासा स्वस्तातला गुलाब
शर्टमध्ये लपवून घेऊन येतात. पाच पन्नास रुपयांची कचकडयाची भेटवस्तूही आणतात.

आत आल्यावर अड्डेवाल्या आंटीच्या हातावर मळलेली, किंचित घामेजलेली शंभराची नोट ठेवतात. तिचे तोंड बंद करतात. फळकुटाच्या कंपार्टमेंटमध्ये आवरून सावरून बसलेली असते. चमेली मोगरयाचे अधाशी नाग तिच्या केसात शांत झोपी गेलेले असतात. नीटनेटक्या बिस्तरावर तो येऊन बसतो. ती दाराला कडी घालते. बराच वेळ ते एकमेकाचा हात हातात घेऊन बसतात. एकमेकाच्या डोळ्यात भिनत जातात.
बाहेरून तिच्या नावाचा पुकारा होतो. दारावर एकदोन लाथा मारल्या जातात.

उतरल्या चेहरयाने ती त्याच्याकडे पाहते. त्याचा हात पाकिटाकडे जाताच ती हात अडवते. ब्लाऊजमध्ये बारीक घडी घालून दुमडून ठेवलेली घामाने ओली झालेली नोट त्याच्या हातात उलगडते. तो दार उघडून बाहेरच्या नटव्या हातात ती नोट सरकावतो. आता आणखी अर्ध्या तासाची बेगमी झालेली असते.
नंतरच्या खेपेस बाहेर जेवायला जायचे, सिनेमा बघायचे, तीर्थक्षेत्री घेऊन जायचे स्वप्न तो रंगवतो. ती डोळे भरून त्याच्याकडे पाहत असते.अस्तित्वात न येऊ शकणारया त्याच्या स्वप्नांना अनुभवत असते. दोघे आता रेलून बसलेले असतात.

तिच्या केसातून हात फिरवत तो तिला गोंजारतो. बाळाला झोपी लावावे तसे तिच्या डोळ्यांवरून हलकेच बोटे फिरवतो. अथांग प्रेमसागरात आकंठ बुडालेली ती त्याच्या कुशीत हलकेच मान टेकते. काही वेळाने बाहेर पुन्हा गलका वाढतो. ती कासावीस होते. पलंगाखाली ठेवलेल्या लोखंडी ट्रंकेत घडी घालून ठेवलेला सेलमधून आणलेला शंभर दोनशे रुपयांचा शर्ट बाहेर काढते. त्या नव्या शर्टची जमेल तितकी बारीक घडी घालून त्याच्या हाती देते. तो तिच्या कपाळाचे चुंबन घेतो. त्याच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब हलकेच ओघळतात. तिच्या हनुवटीवरून ओघळून खाली पडतात.तिच्या ओलेत्या डोळ्यांना पुसून घाईघाईने तो तिला कवेत घेतो. दार पुन्हा वाजू लागते. ती त्याचा हात घट्ट धरून ठेवते. तिच्या हाताची पकड सैल करत, अंगठा तुटलेली चप्पल पायात सरकवत तो बाहेर येतो…..

त्यानंतर दिवसभर अनेक पांढरपेशे व्हॅलेंटाईन तोंडाला रुमाल बांधून आत येत राहतात, कुस्करत राहतात. दिवसामागून दिवस जात राहतात.
‘त्या’ दिवसांसह ३६५ दिवस तिचं घुस्मटणं सुरुच असतं. पराभूत मनाने जमेल तेंव्हा अधून मधून तो येत राहतो, तिच्या दमलेल्या देहातली धग ओठात सामावत जातो. प्रेमाचे अबोल गीत जगत जातो. जगाबरोबर शय्यासोबत करूनही ती त्याच्यासाठी आणि तो तिच्यासाठी पवित्रच असतात… अपवित्रांच्या दांभिक नजरेत दोघेही व्यभिचाराचे मानबिंदू असतात.

-समीर गायकवाड.
ओरीजनल ब्लॉग लिंक साठी येथे क्लिक करा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *