महात्मा गांधी तर टोपी घालत नव्हते मग गांधी टोपी नाव का ? वाचा खासरे इतिहास

गांधिजींच्या जन्माअगोदरही टोपी अस्तित्वात होती-
आज ३० जानेवारी गांधीजींचा स्मृतीदिन आहे.त्यानिमीत्ताने खादी ग्रामोद्योगच्या दुकानांमधून गांधी टोप्यांची मागणी वाढलीय. खादीची पांढरी टोपी गांधीजींच्या जन्माआधीपासून वापरात होती.महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, बंगाल, कर्नाटक आणि बिहारमद्ये पिढ्यान् पिढ्या अशा प्रकारच्या पांढऱ्या टोप्या लोक वापरत.आजही ग्रामीण भागात पुरुष मंडळी उन्हापासून डोक्याचं संरक्षण व्हावं,म्हणून टोपी मोठ्या प्रमाणात वापरतात; तर शहरी भागात शुभ-अशुभ कार्य करताना पुरुष मंडळी टोपी घालतात.

गांधी टोपीचा इतिहास-
गांधीजी बॅरीस्टर झाले होते.ते सूट-बूट-हॅट वापरत.पण गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील आंदोलन काळात ही टोपी त्यांच्या वेशभूषेचा अविभाज्य घटक झाली.
हेन्री पोलॉक हे दक्षिण आफ्रिकेतील गांधीजींच्या लढ्यात त्यांच्या सोबत होते. द मॅनचेस्टर गार्डियनमद्ये लिहलेल्या पत्रात हेन्री यांनी गांधी टोपीच्या इतिहासाबाबत सविस्तर लिहलंय.’आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अनेक भारतीयांना गांधी टोपीचा इतिहास माहित नाही.’

१९०७ ते १९१४ या काळातील ही गोष्ट आहे.गांधीजी जेंव्हा दक्षिण आफ्रिकेमद्ये वकिली करीत,तेंव्हा इंग्रजांकडून झालेल्या अपमानामुळे त्यांनी सत्याग्रह केला.भारतीयांनी आपल्या दोन्ही हातांचे ठसे पुरावा म्हणून द्यावे, असा नियम इंग्रजांनी काढला होता.त्याला गांधीजींनी तिव्र विरोध केला आणि स्वच्छेने तुरुंगवास पत्करला.

तुरुंगात भारतीय कैद्यांना विशिष्ट प्रकारची टोपी घालण्याची सक्ती केली जात होती. तीच टोपी गांधीजींनी पुढे कायम डोक्यावर ठेवली. इतकंच नाही, तर या टोपीचा प्रसार गांधीजींनी केला.त्यामुळे ब्रिटिश सरकारचा भारतीयांबरोबर होत असलेला भेदभाव लोकांना कळेल,अशी त्यांची भावना होती.हीच टोपी पुढे गांधी टोपी म्हणून प्रसिद्ध झाली.

दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर गांधीजींनी ही टोपी कधीच घातली नाही-
दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात आले तेंव्हा त्यांनी ही टोपी नाही तर पगडी घातली होती. त्यानंतर त्यांनी टोपी अथवा पगडी कधीच घातली नाही. भारतीय नेते आणि सत्याग्रहींनी मात्र गांधी टोपी आपलीशी केली. कॉंग्रेस पार्टीने तर टोपीचं नातं थेट गांधीजींबरोबर जोडून पार्टी प्रचारक, कार्यकर्त्यांनी ही टोपी घालावी, यासाठी प्रोत्साहीत केलं.

गांधीजींच्या मृत्यूनंतरचे टोपीचे महत्त्व-
गांधीजींच्या निधनानंतर या गांधी टोपीला भावनात्मक महत्त्व मिळालं.जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई हे नियमितपणे गांधी टोपी वापरत.१५ ऑगस्ट १९४७ मद्ये पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करताना अनेक नेत्यांनी आवर्जून गांधी टोपी घातली होती. पुढे आपण गांधी विचारांचे पाईक आहोत हे दाखवण्याची ती खूणच झाली. इतर राजकीय पक्षांना या गांधी टोपीचं वावडं असलं,तरी कॉंग्रेसजनांच्या माथी गांधी टोपी दिसतच होती.कालांतराने गांधी टोपीचा वापर कॉंगेसजनांनीही कमीच केला.

अलीकडच्या काळात भ्रष्टाचाराविरोधात मोठं आंदोलन उभं करणारे नेते आण्णा हजारे यांनी गांधी टोपीला वेगळी ओळख निर्माण करून दिली.२०११ मद्ये आण्णांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर कॉंग्रेस सरकार विरुद्ध जे आंदोलन केलं त्यावेळी तिथे असलेल्या त्यांच्या समर्थकांनी ‘मै आण्णा हूँ’ अशी अक्षरं असलेल्या गांधी टोप्या घातल्या होत्या.त्यामुळे काहीशा विस्मृतीत गेलेल्या, अडगळीत पडलेल्या गांधी टोपीला नवी ओळख निर्माण झाली.

आण्णांचे तत्कालीन समर्थक अरविंद केजरीवाल यांनी नंतर आण्णांशी फारकत घेऊन स्वतःचा ‘आम आदमी’ हा नवा राजकीय पक्ष स्थापन केला.त्यानंतर गांधी टोपीवर मैं आण्णा हूँ ऐवजी मै आम आदमी हूँ हे शब्द आले.ज्या गांधी टोपीमुळे हॅटवाले ब्रिटिश देश सोडून गेले,ती गांधी टोपी घालून अनेकांनी आपापली राजकीय इच्छाशक्तीही साधून घेतली. ही गांधी टोपीची ताकदच म्हणावी लागले.

महात्मा गांधी पुण्यतीथीच्या निमित्ताने आता खादीचे कपडे,जॅकेट आणि राजकीय वलय मिळालेली गांधी टोपी पुन्हा दुकानांच्या शो-केसमद्ये दिसू लागलीय.२०१४-१५ मध्ये १२,५१३ कोटी रुपयांच्या खादीची विक्री झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री कलराज मिश्रा यांनी लोकसभेत दिली होती. या सरकारी आकडेवारी वरून खादीला किती डिमांड आहे,ते दिसून येतं.

लेखक – मल्हार गायकवाड

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *