राजकारणातील घराणेशाही स्वीकार्हाय का ?

एका गोष्टी बद्दल सर्वात जास्त चर्चा होते ती गोष्ट म्हणजे घराणेशाही.. घराणेशाही बद्दल अनेकांच्या मनात एक तिरस्कार असतो. पण हा तिरस्कार फक्त राजकीय घराण्याबद्दल पाहायला मिळतो. त्याला कारण हि तसेच असते कि सामान्य कार्यकर्ता हि पक्षासाठी काम करत असतो पण त्याला सतरंजी पुरते ठेवून नेत्यांच्या मुलांना पदे देण्यात येतात अशी भावना त्यांची असते.

घराणेशाही विरोधात महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर लढा दिला होता त्यांच्या भूमिकेचे त्याकाळात स्वागतच झाले होते. पण जेव्हा शिवसेना पक्ष हा प्रस्थापित पक्ष झाला तेव्हा घराणेशाहीला विरोध असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांना माझ्या उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेला सांभाळून घ्या म्हणावे लागले. बाळासाहेबांनी जाताना स्वतः घराणेशाही वर शिकामोर्तब केले. शेवटी स्वतःवर आले कि आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तीलाच प्राधान्य देतो हे सिद्ध झाले.

तसे पाहिले तर महाराष्ट्रात घराणेशाहीला सुरुवात ही विखे पाटील यांच्या घराण्यातून झाल्याचे बोलले जाते. सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांचे वारसदार म्हणून बाळासाहेब विखे पाटील यांना जनतेने मोठ्या उत्साहाने स्वीकारले. तेथूनच नगर मध्ये विखे पाटील यांची दिसणारी घराणेशाही सुरूच आहे.उलट विखे पाटील घराण्याला लोकांनी स्वीकारल्याचे दिसून आले आहे. सध्या राधाकृष्ण विखे पाटील हे राजकारणात सक्रिय आहेत त्यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील हे सुद्धा लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. म्हणजे विखे पाटील घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रिय उतरत आहे.

भारतीय समाजात वडिलांनी केलेल्या चांगल्या कार्याचे परिणाम हे पुढील पिढीला उपयोगाचे असतात. चांगल्या राजकारण्याच्या पुढील पिढीला लोक आनंदाने स्वीकारतात हे आपण नाकारू शकत नाही. पण येथे लोक ही जागरूक असताना दिसतात. नवीन वारसाला राजकारणात संधी देतात पण त्यांनी अपेक्षित काम नाही केले तर त्याला जमिनीवर ही आपटतात. एक टर्म किंवा जास्तीत जास्त दोन टर्म पर्यंत बापाच्या पुण्याई वर निवडून दिले जाते. नंतर जर स्वतःचे कर्तृत्व नाही दाखवले तर काय होते हे आपण जाणून आहातच.

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या सारख्या मातब्बर घराण्यातील तिसऱ्या पिढीला ही लोकांनी आस्मान दाखवले होते. त्यामळे जरी वरून आपल्याला घराणेशाहीला स्वीकारले जाते असे दिसून येत असले तरी कर्तृत्ववान व्यक्तीलाच लोक स्वीकारतात हे एक लक्षात घ्यावे लागेल..

शरद पवार साहेब यांच्या शिवाय महाराष्ट्रातील राजकारणाचा विचार आपण करू शकत नाही एवढी येथील राजकारणावर त्यांची आजही पकड आहे. त्यांची कन्या सुप्रिया ताई सुळे व पुतण्या अजित पवार हे राजकारणात सक्रिय आहेत. दोघांना ही जनतेने स्वीकारल्याचे दिसून येते. दोघांनी ही जनसामान्या सोबतची नाळ घट्ट केली आहे. अजित पवार यांची राजकारण करण्याची एक वेगळी शैली आहे त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे.

सुप्रिया ताई व अजितदादा या दोघांना जनतेने मोठ्या प्रेमाने स्वीकारल्या नंतर शरद पवार साहेबांच्या घराण्यातील तिसरी पिढी म्हणून रोहित पवार यांच्याकडे पाहिले जातेय. तसे पाहिले तर रोहित पवार यांना घराणेशाहीचे लेबल जरी लागत असले तरी त्यांची वाटचाल ही स्वकर्तुत्वाने सुरू आहे.आता पर्यंत त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून वेगवेगळ्या समाज घटकापर्यंत पोहचले आहेत. मोठ्या घराण्यातील असून ही लोकांशी मनमोकळ्या पद्धतीने ते बोलतात लोकात सहजतेने मिसळतात. हा एक त्यांचा प्लस पॉईंट आहे. आजच्या युवा राजकारण्यात लोकात सर्वात जास्त मिसळणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिल्या जाते.

शिवसेना पक्षात एक प्रकारे घराणेशाही सोबतच संघटनात्मक हुकूमशाही आहे. ज्यामुळे लोकांना नेता आवडो न आवडो याच्याशी त्यांना घेणे देणे नसत. तसेच निवडणुका लढवत नसल्याने प्रत्येक्षात त्यांच्या बद्दल चा रोष व्यक्त ही करायला जागा राहत नाही. आदित्य ठाकरे युवा पिढीतील राजकारणी म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत. पेज थ्री क्लास मध्ये सक्रिय ते राहतात. सामान्य वर्गात सहजतेने मिसळताना कधी दिसले नाहीत.उलट शिवसेनेचे जेष्ठ खासदार पण त्यांच्या पायाला लागतात याबाबत चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यातून दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेतेही ही आदित्य सोबत संपर्क करायला कचरत असावेत.

आज महाराष्ट्रात अनेक प्रस्थापित राजकारण्यांच्या मुलांनी आपले नशीब राजकारणात आजमावले आहे. त्यातील काही यशस्वी झाले काहींना लोकांनी संधी देऊन पाहिली तर काहींना लोकांनी सपशेल नाकारले. घराणेशाही हे वास्तव आहे त्याच्याशिवाय राजकारण अशक्य आहे. प्रत्येक क्षेत्रात घराणेशाही असते त्याबद्दल आपण कधी चर्चा करत नाही. उद्योजक आपल्या उद्योगाची धुरा ही आपल्या पुढील पिढी कडेच देताना आपण पाहत आलोय.

वैद्यकीय क्षेत्र असो किंवा आपल्या सर्वांच्या आवडीचे बॉलिवूड असो.. अमिताभ बच्चन यांना सुपरस्टार म्हणून देशाने त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. अभिषेक बच्चन वडिलांचे नाव घेऊन आले कर्तृत्व अभिनय दाखवू शकले नाहीत लोकांनी आज त्यांना साईड लाईन ला केले. कोणत्याही क्षेत्रात घराणेशाही मुळे जरी सहज संधी मिळत असली तरी त्या संधीचे सोने करून आपले कर्तृत्व दाखवले तर टिकाव लागू शकतो. नाहीतर त्याचा अभिषेक होतो.

भैया पाटील (राजकीय विश्लेषक)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *