निवृत्ती महाराज इंदुरीकर :अफाट विनोदाचं वर्तमान! जगदीश कदम यांचा लेख

पूर्वी सारखे आता लोक हसत नाहीत आणि हसवणारेही उरले नाहीत. अशी तक्रार परवा आमच्या एका मित्रानं केली.हा मित्र पेशानं प्राध्यापक.गत जमान्यातील प्रके,पुलं,चिंवि अशी नावं त्यानं पढवल्यागत भिर्कावली आमच्या दिशेनं.आम्ही म्हटलं असं काही नाही. विनोद कधी मरत नसतो,हसणं कधी थांबत नसतं.तरी सुध्दा आमचा मित्र मान्य करायला तयार नव्हता.

ही गोष्ट आमच्या गाडीचा चालक नामदेव आगलावेनं सिरीयस घेतली. त्यानं स्टेअरिंगवरचा हात खिशात घातला.खिशातून एक छोटीसी डबी बाहेर काढली.तिला पेनड्राईव्ह असं काही तरी म्हणतात.ती डबी कारच्या थोबाडात कोंबली. अन् आमच्या मित्राला म्हणाला ‘साहेब, तुम्ही निवृत्ती महाराजाचं कीर्तन ऐकल्या का कधी?’ आणि आमच्या संमतीविना आवाज मोठा करून टेप सुरू केला.

निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर.. दोनच मिनिटात मुख्य विषय. थेट विषयालाच हात.नमनाला भाराभर तेल नाही का मृदंगाची मरामत करायला वेळेचा अपव्यय नाही. निवृत्ती महाराजांच्या मुखातून बाहेर पडणारा एकेक शब्द आपली अचूक जागा घेऊन आसनावर बसणारा. भाषा शुद्ध गावंढळ.गावंढळ म्हणजे गावखेड्यात बोलली जाणारी बोलीभाषा.तिच्याच आचपेच नाही.सरळ धोपट.पार काळजात घुसणारी.

महाराजांच्या पहिल्या वाक्यापासून हसू फुटलेलं. एकेक वाक्य भात्यातून ठेवणीतले बाण काढावेत तसे. प्रत्येक वाक्य विनोदानं ठासून भरलेलं. जवळ जवळ तासभर हे कीर्तन चाललं. आमचा मित्र हसून हसून बेजार झाला.त्याचं विनोदाच्या बाबतीतलं अगाध अज्ञान मावळलं. नामदेवनं आमच्याही ज्ञानात भर घातली. पुढे ‘यू ट्यूब’ वरून निवृत्ती महाराज आमच्या हातात आले.

त्यांच्या विषयीचं कुतूहल लगोलग शिरजोर झालं. निवृत्ती महाराज पदवीधर.शाळा मास्तर. अहमदनगर जिल्ह्यातलं इंदुरी हे छोटंसं गाव.त्यागावचे भाषिक आणि राहणीसाहणीचे संस्कार घेऊन निवृत्ती मास्तर उतरले थेट कीर्तनाच्या आखाड्यात. कीर्तन परंपरेची पारंपरिकता वगळली सनकून.थेट नातं जोडलं गाडगेबाबांच्या बिनघोर संवादशैलीशी.

उघडा नागडा माईक.त्याचा गावरान भोंगा. महाराजांनी ठेवलं आपलं कीर्तन अटींचं आखीव गणित वगळून. गोणपाट असला वा ताडपत्री असली तरी बसला नाही हा बाबा तट करून. श्रोत्यांना ‘महाराज’ असं संबोधून सपाटून शेकारणारा कीर्तनकार म्हणून निवृत्ती महाराजांची ख्याती सर्वदूर सरकत गेली.
माणसाच्या वागण्या-बोलण्यातलं वैगुण्य नेमकेपणानं हेरायचं आणि कसलाही मुलाहिजा न ठेवता ते ठामेठोकपणे मांडायचं ही खाशीयत रूढ करीत हा कीर्तनकार बोलू लागला.

लोकांना कळेल अशा भाषेत त्यांचं भयानक भवताल मांडू लागला. या बुवाचं हे मांडणं इतकं वस्तुनिष्ठ की काडीचीही कारागिरी न मानवणारी. हा महाराज बोलतो आपल्या विषयी,आपल्या भेसूर वास्तवाविषयी आणि ते ही पोटात कसलीच गाठ न ठेवता. हसतखेळत थेट ओढतो आपल्यातील वकटेपणावर चाबूक.
हसवणार नाही असं एकही वाक्य निघत नाही त्याच्या मुखातून. सासू-सून,बाप-लेक,शेजारी-पाजारी,पुढारी-कार्यकर्ते असे कितीतरी विषय हा महाराज बोलता बोलता सावडत जातो.

निवृत्ती महाराजांचं कीर्तन सर्वात अपडेट. काल घडलेली घटना आजच्या कीर्तनात करंगळीवर येणार.त्यामुळे केव्हाही टवटवीत वाटावा असा हा जनसंवाद.
आजघडीला इतका ताजा, टवटवीत आणि प्रसन्न संवाद साधणारा कीर्तनकार अपवादभूतच. निवृत्ती महाराज बोलताना ठेवत नाहीत आचपेच.जे पोटात तेच ओठात इतकी प्रखर प्रांजळता. याचं प्रांजळतेचा लळा पब्लीकला. ‘हा महाराज बायकांविषयी बोलला काहीबाही’ म्हणून पुण्यातील पंडितांनी केला हलकल्लोळ अशी बातमी नामदेव कडूनच कळली आम्हाला.त्यातलं तथ्य तपासून पाहिलं तेव्हा ती निघाली निर्णायक अफवा.

आम्ही पाहिल्या निवृत्ती महाराजांच्या कीर्तनातील बारीकसारीक जागा बंदोबस्ताला आलेल्या पोलीसी नजरेतून. बोलताना कधी कधी जीभेचा पट्टा जरूर जातो जागा सोडत.ते तसं नसतंही अनाठायी.पण टोचत राहतं पारंपरिक पेहरावाला.परीटघडीवर पडतो की काय डाग याचीच धास्ती! बाकी न मानवण्यासारखं नसतंच काही. हा महाराज बोलतो पोटतिडकीनं पोटातलं.ते पोचतं तेवढ्याच तत्परतेनं तालासूराची अपेक्षा न ठेवता ताटकळत बसलेल्या श्रोत्यांपर्यंत तडक.
महाराजांचा श्रोतावर्ग सर्व स्तरातला.

पुरुषांपेक्षा महिलांची उपस्थिती वाखाणण्याजोगी.शाळा-कालेजातली पोरं पोरी हमखास. वाक्यागणिक हास्याचे फवारे.एक वाक्य संपलं की दुसरं वाक्य तेवढ्याच जोमानं विनोदाला गाठणारं. एक वाक्य,एक फट्कारा.अशी स्टाईल.अफलातून शैली.नम्रताही शिगोशिग.’सांगा महाराज खरं का खोटं’ हे पालूपद.सामाजिक विकृती,व्यंगावर विनोदाच्या अंगाने बोट ठेवणारा हा प्रबोधनकार. दैनंदिन जगण्यातील उदाहरणं देत देत एका दमात अध्यात्मिक अंगणात येणार.तिथल्या ख-याखोट्या जागा मांडणार.त्यासाठी ज्ञानोबा-तुकोबा यांचा प्रकाश हाताशी ठेवणार.

व्यसनाधीनतेचा समाचार घेत घेत मायबापाच्या सेवेची सार्थकता उलगडून दाखवणार.इतर बुवांना फारशी न मानवणारी शाहू,फुले,आंबेडकर ही नावं सहजगत्या संदर्भासह येणार. या अंगाने प्रबोधन घडत असेल तर विरोधाची वजनमापं कशाला मांडायची मांडवात. निवृत्ती महाराज ही ‘एकला चलो’ संस्था आहे.ती इतर ह.भ.प.सारखं टोळीत राहात नाही ;अथवा तुकोबा विषयी अमुकानं अमूक अमूक लिहिलं म्हणून तावातावानं ताशेरे ओढत नाही.

आज मराठी मुलखात इंदुरीकरांइतकं डिमांड कोणालाच नाही.गावोगावचे सप्ते असो की जयंती मंयतीचा मजकूर असो.इंदुरीकर महाराजांचं नाव पत्रिकेत हमखास दिसणारच.हेच खरं हसतखेळत प्रबोधन. दररोज किमान तीन कीर्तन या हिशेबाने हा महाराज पायाला भिंगरी बांधून आहे.बाकी मानधनाचा मामलाही मोठाच असणार.दहा हजारांपासून लाखभर लोकांना सतत दीड-दोन तास हसत ठेवणं ही गोष्टही मुळीच मामुली नाही!

जगदीश कदम
भ्र.९४२२८७१४३२

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *