दुर्लक्षित राष्ट्रशिवशाहीर बाबासाहेब देशमुख नक्की वाचा…

गेल्या तीन चार दशकांमध्ये महाराष्ट्रातील असे एकही गाव नसेल ज्या गावात शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांचा आवाज घुमल्याशिवाय शिवजयंती साजरी झाली असेल.

“ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुन प्रारंभे डफावर थाप तुणतुण्या ताण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभुचं गातो गुणगान जी जी जी जी…आधी नमन साधुसंताला ज्ञानेश्वराला एकनाथाला तुकाराम महाराज गाडगेबाबांच्या गुरुचरणाला जी रं जी जी…नमन माझे गुरुमाऊलीला सुभद्रा मातेला सोना मातेला सांगली जिल्हा वाळवे तालुक्याला मुक्कामी मालेवाडीला शाहीरी साज चढविला पुर्ण चढवुन शाहीरी साजाला शाहीर देशमुख गातो पोवाड्याला जी रं जी जी !” ही शाहीरी ताण शिवजयंतीला आजही महाराष्ट्रभर गर्जत असते.

मर्दाचा पोवाडा मर्दानेच गायचा आणि ऐकायचा असतो अशी बाबासाहेब देशमुखांबद्दल जी ओळख सांगितली जाते ती योग्यच आहे. बाबासाहेबांनी अनेक पोवाडे गायले. त्यांच्या गड आला पण सिंह गेला, शिवजन्म, स्वराज्याची शपथ, अफजलखानाचा वध, शाहिस्तेखानावर हल्ला, सुरतेची लूट, आग्र्याहून सुटका, राज्याभिषेक, छत्रपती संभाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे या ऐतिहासिक पोवाड्यांसोबतच त्यांचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसिंह नाना पाटील, आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक, राजारामबापू पाटील व इतर पोवाडे महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.

काळजाला भिडणारा पहाडी आवाज, नसानसांत चैतन्य निर्माण करणारी त्यांची वाणी पोवाडा ऐकणाऱ्या कुणालाही इतिहासात घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या अभ्यास आणि गायनशैलीच्या जोरावर पोवाडा या काव्यप्रकाराला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी गायलेला प्रत्येक पोवाडा महाराष्ट्राने डोक्यावर जरीपटका मिरवावा तसा अभिमानाने मिरवला. लोकांनी त्यांना राष्ट्रशिवशाहिर अशी ओळख दिली.

…परंतु शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या मृत्यूनंतर अद्यापही शासन दरबारी त्यांचा यथोचित सन्मान करायचा राहून गेला आहे. आज खरे “शिवशाहीर बाबासाहेब” लोकांच्या विस्मृतीत गेले आहेत आणि ज्यांचा कुठलाही पोवाडा महाराष्ट्राला माहीत नाही असं बाबासाहेबांच्या नावाचा आधार घेतलेलं एक बांडगुळ मात्र महाराष्ट्राभुषण पुरस्कार घेऊन मिरवत आहे.

पुरस्काराला जात नसते मात्र पुरस्कार देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला जात असते, हे महाराष्ट्रातील विदारक वास्तव आज परत एकदा उफाळुन वर आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन…

अनिल माने.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *