मराठवाड्याचे प्रतिनाना पाटील क्रांतीवीर दत्तोबा भोसले

ज्यांना स्वतः चा इतिहास माहित नसतो त्यांच्याकडून भविष्याच्या अपेक्षा ठेवणं व्यर्थ असतं.भविष्याची बिजे भुतकाळात प्रेरणेच्या रूपात दडलेली असतात.ज्यांची प्रेरणाच वांझ असते त्या भेकडांचा इतिहासद्रोही विस्मृतीपणा समाजाला पर्यायाने देशाला कमकुवत करून टाकतो,म्हणून चिंगारी जिवंत ठेवली तर मशाल पेटवायच्या वेळेला आपसूकच अवसान येतं अन् हर हर महादेवची आरोळी आमच्या नसानसात दवडू लागते.

तलवारीचा खणखणाट, घोड्याच्या टापांचा अन् ढोलताशाच्या थापांचा,युध्दाचा, चित्कारांचा,विद्रोहाचा,बलिदानाचा,स्वातंत्र्याचा ,त्यागाचा भयाण इतिहास लातूर उस्मानाबादच्या तेरणेच्या खोऱ्यात तडोळा,काजळा,सारोळा ,उपळा,वाघाली,कनगरा,आशिव,मातोळा,सास्तूर,ढोकी,आळणी,बेलकुंड या भागातल्या शेकडो गावातला १७२४ ते १९४८ हा इतिहास वारणेच्या खोऱ्यासारखा लिहिला गेला नाही.शेकडो गावे निजामापासून मुक्त करून मुक्तापूर स्वराज्य निर्माण करून चिंचोली या गावाला राजधानी घोषीत केल्याचे किती जणांना माहिती आहे ? ज्यांना मराठवाड्याचे प्रतिनाना पाटील म्हणतात त्या दत्तोबा भोसले यांचा इतिहास हा तेरणेच्या खोऱ्यातल्या अप्रकाशित काळोखात जिज्ञासूंची अन् कृतज्ञवंतांची वाट पहात उभा आहे.आरक्त अन् शौर्याचे प्रतिक बनून.

निझाम मिर उस्मान अलीखाँ अन् निझामाच्या रझाकार संघटनेच्या दडपशाहीचा तो काळ होता.सव्वादोनशे वर्षाच्या गुलामागिरीला सांस्कृतिक आर्थिक भाषीक पैलु होते. तिसरीपासून उर्दू ,सरकारी कामाकाजं, न्यायालयिन कामकाजं ऊर्दूतूनच चालत असे .नोकऱ्यात भयानक तफावत होती. मराठवाड्यातले तेंव्हाचे पाच जिल्हे म्हणजे आताचा बराचसा भाग हैद्राबाद संस्थानात व्यापलेला होता. कन्नड, तेलगु ,मराठी भाषीक अशा सोळा जिल्ह्यांचा हा बलाढ्य भाग निझामाच्या अधिपत्याखाली होता.इथली जनता इंग्रजांच्या राजकीय गुलामगिरीपेक्षा भयानक अशा सर्वकश गुलामगिरीत खितपत पडली होती.बहाद्दुरयारजंग अन् लातुरचा कासिम रझवी यांच्या अनुक्रमे मजलिस ई इत्तेहादुल मुसलमिन आणि रझाकार या संघटनांनी धुमाकुळ घातला होता.जाळपोळ,लूट,बलात्कार,खून अशा घटनांना वैतागून बऱ्याच जणांनी इंग्रजी मुलुखात स्थानांतर केले. पिसाळलेल्या अन्यायी रझाकारांच्या कथा इथे आजही गावोगाव सांगितल्या जातात.हा धार्मिक लढा नसून स्वातंत्र्य लढा आहे असे ठासून सांगणाऱ्या स्वामी रामानंद तिर्थ यांच्या भुमिकेला सलामच केला पाहिजे कारण या लढ्यात सर्व जाती धर्माचे लोक होते.

हैद्राबाद स्टेट कॉग्रेसची स्थापना,भारतीय स्वातंत्र्य , आर्यसमाजी सत्याग्रही ,पोलिस ॲक्शन अन् सतरा सप्टेंबरचा अंतिम लढा या प्रकाशित व जमेच्या बाजू असल्यातरी एक समांतर अशी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ इतिहासाच्या पानातून दुर्लक्षित राहिली पण अजूनही इकडच्या जनतेच्या मनामनात जिवंत आहे.अशाच एका लढ्याचा नायक म्हणजे मातोळ्याचे क्रांतिविर दत्तोबा भोसले. ज्यांच्या कथा जात्याच्या पाळूपासून ते चावडीचावडीपर्यत सांगितल्या जातात. ज्यांना पकडण्यासाठी निझामाने लाखोचे बक्षिस ठेवले होते. अनेक सापळे रचले गेले पण ते सापडले नाहीत. वेशांतर करण्यापासून ते पांढऱ्या घोडीवर वाऱ्यासारखे धावणारे ,सशस्त्र तरूणांची फौज उभी करणारे दत्तोबा भोसले एक अख्यायिका बणले आहेत. या लढ्याला शिक्षणाचीही किनार आहे. दत्तोबा भोसले म्हणजे लोहाऱ्या जवळच्या हिप्परगा गावातील स्वामी रामानंदतिर्थ मुख्याध्यापक असलेल्या राष्ट्रीय शाळेचे विद्यार्थी. शिक्षणाच्या प्रचंड आवडीतून त्यांना राष्ट्रवादाचे धडे मिळाले. आशिव गावचे रहिवासी आणि शिक्षणमंञी तसेच नागपूर कराराच्या वेळी मराठवाड्याचे प्रतिनिधी म्हणून हजर असणारे देविसिंह चौहाण देखील याच शाळेतले विद्यार्थी होत.

हा नायक ज्ञानर्जनासाठी पुढे सयाजीराव गायवाडांच्या आश्रयाला बडोद्याला गेला. तिथे सयाजीरावांच्या तालमीत आत्मविश्वास घेवून लढाईसाठी सज्ज झाला. स्वतः महाराजांसोबत कुस्ती खेळण्याची संधी दत्तोबा भोसले यांना भेठली. ओठावर क्रांतीचा जयजयकार,त्यांच्या आवाजातली जरब अन् डोळ्यातल्या तेजाने रझाकार थरथरा कापत असत. तलवारबाजी,दांडपट्टा,घोडेस्वारी याचे शिक्षण त्यांनी चिंचोली – बार्षी भागातल्या कैंपवर तरूणांना दिले. शेकडो रझाकार कापून काढले. रझाकार आरणी,डिक्सळ या गावची ज्वारी घेवून जात असताना दत्तोबा भोसले यांनी ५०० पोती ज्वारी लुटली व कैंपमधील लोकांना दिली. सेलु गावचा शेतसारा लोहाऱ्यात जात असताना लुटला. काजळ्या गावातील रझाकारांचे अनेक हल्ले परतवून लावले. तरूणांच्या फलटनी निर्माण करून त्यांना प्रशिक्षण दिले. एका फलटनीत ४०० ते ५०० तरूण असत. असे अनेक कैंप उभे केले.

मोरारजी देसाई,यशवंतराव चव्हाण यांनी उपळ्याला भेठ देवून तेथील दत्तोबा भोसले यांचे कार्य पाहून गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना अहवाल दिला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी सैन्य पाठविले,अवघ्या साडेचार दिवसातच निझामाचा बिमोड होवून हैद्राबाद संस्थान १७ सप्टेंबर १९४८ ला भारतात विलीन झाले.

दत्तोबा भोसले यांना डायरी लिहिण्याचा छंद होता. वाचन मनन चिंतनात रमणारा हा नायक तितकाच संवेदनशील अन् कुटुंबवत्सलही होता.आईवर त्यांचे प्रचंड प्रेम होते. तलवार आणि लेखणी दोन्ही राष्ट्रभक्तीतून निर्माण झाले होते. कारागृहात त्यांनी लिहिलेल्या रोजनिशीतले लेख त्यांच्या राष्ट्रवादाचे देशभक्तीचे अन् गुलामगिरीविरूध्द विषमतेविरूध्द त्यांचा कल स्पष्ट करणारे आहेत.

“ज्यावेळी माणुस कोशीस करुन करुन थकतो तेंव्हा त्याचा प्रयत्न सफल होणार हे खास.अत्यंत उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो,अत्यंत हिवाळा होऊ लागला की उन्हाळा जवळ आहे असे समजावे. अमावस्येच्या दिवशी काळ्याकुट्ट अंधारातच विजेची कोर दिसते”.
“जगातील श्रमणारे किसान कामगारा्ची भुक शांत होईल तेंव्हाच जगात शांतता निर्माण होईल.”
“गुलामगीरीच्या तुप साखरेपेक्षा स्वांतत्र्याची मीठभाकरच राष्ट्राची उन्नती करु शकेल”
“देवभक्ती हा एका दुबळ्या मनाचा दु:ख विसरण्याचा मार्ग आहे. पण कुठलीही दु:खे विसरुन दुर होत नाहीत.ती झगडुन प्रसंगी लढून दुर करावी लागतात.तशातलाच समाजसेवेचा प्रकार असतो. स्वत:ला, आपल्याला प्रेम करणारयांना सर्वस्वालाच मूठमाती द्यावी लागते,पारखे व्हावे लागते.”
“मोठमोठेवृक्ष क्षणात ऊगवत नाहीत.क्षणात ऊगवणारी झाडे क्षणात मरतात.भराभरा जन्मणारे जीवजंतु मरतात ही भराभरा.मोठी ध्येये,मोठे विचार वाढीला लागावयाला वेळच लागणार.सृष्टीचा हा नियम आहे.तो लक्ष्यात ठेवून वागले पाहीजे”

या वीर यौध्याला प्रत्येक १७ सप्टेंबरला मनामनातून आपण आठवत जावू. परवा २ जानेवारीला दत्तोबा भोसले यांचा स्मृतिदिन. हैद्राबाद मुक्ती लढा आणि क्रांतीवीर दत्तोबा भोसले याविषयावर महाराष्ट्रातील ख्यातनाम विचारवंत व वक्ते प्राचार्य डॉ. सोमनाथजी रोडे यांचे व्याख्यान मातोळा ता.औसा जि.लातूर येथे आयोजित केले आहे. सांयकाळी ५:३० माधवराव भोसले हायस्कुलच्या प्रांगणात दत्तोबा भोसले यांच्या इतिहासाला उजाळा मिळेल. आपला इतिहास आपल्याला समजेल.प्रेरणेचे पंख नक्की भेठतील.

जगदिश_पाटील
करजखेडा_उस्मानाबाद

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *