महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देण्यात येणाऱ्या मानाच्या गदेविषयी संपूर्ण माहिती…

महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आणि या स्पर्धेत बक्षीस म्हणून दिली जाणारी मानाची चांदीची गदा आपल्या खांद्यावर यावी. यासाठी अनेक मल्लांचे कसोशीने प्रयत्न सुरू असतात. वर्षानुवर्षे अनेक मल्ल तालमीत यासाठी घाम गाळतात आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेची तयारी करतात. पण, या स्पर्धेतील विजेत्यास दिली जाणारी मानाच्या चांदीच्या गदेला मोठा इतिहास आहेे. गदा मानाची… परंपरा मामासाहेब मोहोळे घराण्याची. गेली 36 वर्षे ही परंपरा घराण्याने जपली आहे.

कुस्तीमहर्षी मामासाहेब मोहोळे यांच्या कर्तृत्वाची आठवण चिरकाल राहावी. म्हणून त्यांचे चिरंजीव माजी खासदार अशोकराव मोहोळे व क्रिकेटपटू सदानंद मोहोळे हे त्यांच्या नावे मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाची गदा बक्षीस म्हणून देत आहेत. तांबड्या मातीला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा म्हणून यशवंतराव चव्हाण, भाऊसाहेब हिरे, बाळासाहेब देसाई, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्याशी चर्चा करून सन 1953 मध्ये कुस्तीमहर्षी नामदेवराव तथा मामासाहेब मोहोळे यांनी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली.

कुस्तीप्रेमी राजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय देऊन अनेक नामांकित मल्ल घडवून अनेक प्रेक्षणीय कुस्त्यांची मैदानेही भरविली.त्यानंतर ठेकेदारी कुस्तीच्या रूपाने कुस्ती जिवंत ठेवण्याचे काम येथील कुस्तीप्रेमी आणि तालमींनी केले.त्यामुळेच पै.सादिक, पै.रमजी, पै.बुटा, पै.बिद्दू ब्राह्मण, पै.लब्बू,पै.किंकर सिंग, पै. गुलाम, पै.कल्लू, पै.चागा, पै. गोबरबाबू, पै. गामा जगज्जेता, पै.एक्‍का गामा, पै. शहानवाज नानीवाला, पै. गुलाम मोईद्दिन, पै.ठिला, पै. कल्लू गामा, पै. गुलाम कादर, पै. हमिदा, पै.झोबिस्को पै. जिजा, पै. भोला असे नामांकित मल्ल कोल्हापूरच्या तांबड्या रांगड्या मातीत घडले आणि अनेकांना त्यांनी घडविले.

कुस्तीची परंपरा महाराष्ट्रातील अनेकांनी जपली आणि पोसलीसुद्धा. कुस्तीच्या इतिहासातही मामासाहेब मोहोळे यांचा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सन 1961 ला सुरू झाली आणि पहिली गदा कोल्हापूरचे मल्ल दिनकर धयारी यांनी सांगलीच्या बिरजू यादव याला चितपट करून मिळवली. तेव्हा ही गदा कुस्ती परिषद देत होती. सन 1982 ला मामासाहेब मोहोळे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी चांदीची गदा देऊन त्यांच्या कर्तृत्वाची आठवण जपली आहे. ही गदा पुणे येथील पानगंटी परिवारच बनवीत. या मानाच्या गदेची उंची अडीच फूट आहे. त्यावर नक्षीदार काम केले असून मामासाहेब मोहोळे यांचा फोटो आहे.

महाराष्ट्र केसरीची गदा बनविण्याचे काम पुणे येथील पानगरी कुटुंब मागील २७ वर्षापासून करत आहे. पेशवे कालीन पिढीतले सातवे वारस प्रदीप प्रतापराव पानगरी हेच गदा बनविण्याचे काम मोठ्या कलाकुसरीने करत असतात. त्यामुळे गदेला वेगळीच झळक मिळते.

या गदेची उंची २७ ते ३० इंच, व्यास ९ ते १० इंच व वजन १० ते १२ किलो एवढे असते. ३२ गेज जाडा चांदीचा पत्रा त्यावर कोरीव काम आणि झळाळी दिलेली असते. मध्यभागी चांदीच्या कोंदणात मामासाहेब मोहोळ यांचा फोटो असतो. बरोबर १८० फिरवून हनुमानाचे चित्र वर्तुळाकार चांदीच्या कोंदणात बसविण्यात आले आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *