ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा आनंदोत्सव असलेली भीमथडी जत्रा नक्की आहे तरी काय?

बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शारदा महिला संघाच्या वतीने आयोजित भीमथडी जत्रा येत्या २२ ते २६ डिसेंबर या दरम्यान पुण्यातील सिंचननगर येथे भरणार आहे. जत्रेचे यंदाचे हे तेरावे वर्ष आहे. मागील वर्षीच्या बळीराजा संकल्पनेनंतर आधारित असलेली यात्रा यंदा कोल्हापुरी आकर्षण असलेली असेल.

जत्रेबाबत संस्थेच्या विश्‍वस्त व जत्रेच्या आयोजक सुनंदा पवार यांनी माहिती दिली, की भीमथडी जत्रेत शेतकरी बाजार, विषमुक्त अन्न ही संकल्पना याही वर्षी आहे. त्याचबरोबर विविध भागांतील खाद्यसंस्कृती जोपासणारे महिला बचत गटांचे तीनशेहून अधिक स्टॉल या जत्रेत असणार आहेत.

महाराष्ट्रातील पारंपरिक कलाकार, कारागिरांनी केलेल्या ग्रामीण हस्तकलेच्या वस्तू, पारंपरिक दागिने, मातीच्या वस्तू, विणकाम, कपड्यांचा या जत्रेत समावेश आहे. या वर्षीच्या जत्रेत शेतकऱ्यांनी पिकवलेला सेंद्रिय शेतीमाल, कोल्हापुरी पानापासून ते पारंपरिक दागिन्यांपर्यंत, आदिवासी भागातील तांदूळ, मधापासून आयुर्वेदिक उत्पादनांचाही समावेश राहणार आहे.

तेरावे वर्ष ऑनलाइन

भीमथडी जत्रेने गेल्या एक तपापासून हजारो महिलांना बाजारपेठ मिळवून देत महिलांना उद्योजक बनवले. ही जत्रा ग्रामीण संस्कृतीचा शहरी भागाशी एक संवाद बनली. आता ही जत्रा ऑनलाइन झाली आहे. ट्रस्टने ‘भीमथडी बाजार वेब’ ही संकल्पना सुरू केली आहे. त्या माध्यमातून भीमथडी जत्रेतील उत्पादने ऑनलाइन मिळणार आहेत. त्यातच या वर्षी डिसेंबरच्या अखेरच्या आठवड्यात २२, २३, २५ डिसेंबर या तीन दिवशी बॅंका बंद आहेत. त्यामुळे जत्रेत एटीएम व पेटीएम सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

कसा झाला भीमथडीचा उदय?

भीमथडी म्हणजे भीमा नदीच्या काठावर असलेला प्रांत! ह्या प्रांताने यादव, निजाम, मुघल, पेशवे व असेच असंख्य सम्राटाचे शासन पाहिले. पुर्वीच्या काळात नदीच्या किनाऱ्यावर बाजारपेठ भरत असायच्या. त्यातुनच “भीमथडी जत्रा”च्या संकल्पनेचा उदय झाला.

गेल्या १३ वर्षात भीमथडीला प्रचंड प्रतिसाद आणि यश मिळाल्यानंतर गेल्या वर्षी दीड लाख पर्यटकांनी भीमथडीला भेट देऊन एक उंचीच गाठली होती.

भीमथडी जत्रा म्हणजे सांस्कृतिक प्रदर्शन, खाद्य बाजार, कलात्मक वस्तुंची बाजारपेठ, हस्तशिल्प, हातमाग, घरगुती पदार्थ व मसाले व शाकाहारी-मांसाहारी खाद्यपदार्थ अशा विविध गोष्टींनी भरलेल्या व बहरलेला ग्रामीण व शहरी भागातील महिलांचा आनंदोत्सव आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *