स्वतःची मोटरसायकल विकून निवडणूक लढला हा जादूगार आणि मुख्यमंत्रीही बनला..

तीन राज्यात काँग्रेसच्या विजयानंतर मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रिया सध्या चालू आहेत. यानिमित्ताने खास काही राजकीय किस्से आहेत त्यांना आपण उजाळा देऊया. राजस्थानमधील एका मुख्यमंत्र्यांनी गोष्ट अशीच काहीशी न्यारी आहे.

हा नेता एकेकाळी राजस्थानमध्ये जादूगार होता. आपल्या मोटरसायकल वर जादूचे खेळ दाखवत फिरत असे. तो जादूगार संजय गांधी यांच्या जवळचा होता. राहुल आणि प्रियांका गांधींना जादू दाखवायला यायचा हा जादूगार. पण कोणाचे नशीब कधी कसे बदलेल सांगता येत नाही. निवडणूक लढवण्यासाठी पैसे नसताना आपली मोटरसायकल ४००० रुपयांना विकून तो जादूगार आमदार झाला आणि पराभवापासून सुरुवात करत केंद्रीय मंत्री ते राजस्थानचा मुख्यमंत्री झाला. ते नेते आहेत राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आलेले अशोक गेहलोत.

बघूया एक जादूगारचे ते मुख्यमंत्री कसे झाले?

अशोक गेहलोत यांचा जन्म जोधपूरच्या एका सामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील लक्ष्मण सिंह दक्ष हे एक चांगले जादूगार होते. देशातील विविध भागात फिरून ते आपली जादू दाखवायचे. अशोक हे अनेकदा आपल्या वडिलांसोबत जात असत. त्यांनी देखील स्टेजवर बऱ्याचदा जादू दाखवली.

ते अभ्यासातही हुशार होते. त्यांनी १२ वि नंतर जोधपूरच्या जसनारायण व्यास युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी त्यांना गांधी शांती प्रतिष्ठानची आवड निर्माण झाली. ते तिथे गांधीजींचे विचार वाचत. त्यानंतर त्यांनी काँग्रेस जॉईन केली. पण राजकारणापासून दूर राहत त्यांनी सामाजिक कार्य सुरु केलं.

१९७१ च्या युद्धादरम्यान अनेक गरजूना मदत म्हणून कॅम्प त्यावेळी लावण्यात आले होते. तिथे अशोक गहलोत हे देखील सेवा भारतीचे कारकून म्हणून सेवा करण्यास पोहचले. एके दिवशी त्या शिबिरात इंदिरा गांधींचा दौरा झाला. त्यांची नजर २० वर्षाच्या अशोक यांच्यावर पडली. त्यांनी बरोबर हेरलं कि हा मुलगा मेहनती दिसतोय. त्यांनी अशोक यांना काँग्रेस मध्ये येन्यास सांगितले.

पण निवडणूक लढवण्याचे त्यांचे वय नव्हते. अजून ५ वर्षांनी निवडणूक लढवणे शक्य होणार होतं. मग त्यानंतर ते वर्ध्यात गांधी आश्रमात आले. तिथे ते पक्के गांधीवादी घडले. पुढे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. सोबतच जोधपूर पासून ५० किमी पिपाड गावात बी बियाणांचे दुकानही टाकले.

पुढे ते NSUI चे प्रदेश अध्यक्ष बनले. त्यामुळे संजय गांधी यांचे निकटवर्तीय बनले. त्यांच्या जादूच्या कलेमुळे संजय हे त्यांना गिली-बिली या नावाने बोलायचे.

मोटरसायकल विकून लढवली निवडणूक-

आणीबाणी संपल्यानंतर काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे काँग्रेसला राजस्थानमध्ये विधानसभेसाठी उमेदवार देखील मिळेनासे झाले होते. अशोक यांनी संधी ओळखत संजय गांधी यांच्याकडून जोधपूरमधील सरदारपुरा मतदारसंघाची उमेदवारी आणली.

त्यांचे वय होते अवघे २६ वर्ष आणि नावावर होती फक्त एक मोटरसायकल. समोर आव्हान होतं जनता पार्टीच्या माधव सिंह यांचं. अशोक गेहलोत त्या निवडणुकीत अवघ्या ४३२९ मतांनी पडले. 

पुढे ३ वर्षात जनता पार्टीचे सरकार गेले. अशोक यांना पुढे लोकसभेची उमेदवारी मिळाली. त्यांच्या मित्राने स्वखर्चाने प्रचार कार्यालय सुरु केले. अशोक यांनी यावेळी आपली मोटरसायकल विकली. मित्राच्या मोटरसायकलवर फिरून प्रचार केला. आणि जनता पार्टीच्या बलबीर सिंह यांचा ५२५१९ मतांनी पराभव करत दिल्लीत पोहचले. वयाच्या अवघ्या ३१ व्य वर्षी ते केंद्रीय मंत्री बनले.

त्यांची रार्जकीय कारकीर्द आजही यशस्वीपणे चालू आहे. आजच त्यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. अशोक गहलोत यांच्या या संघर्षमय वाटचालीस खासरेच्या शुभेच्छा.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *