रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्यावर एका युवकाची प्रतिक्रिया..

#आठवलेंच्या_निमित्ताने

एखाद्या नेत्याने घेतलेली भूमिका नसेल आवडली तर सोडून द्या, निर्णय नसेल पटला तर सोडून द्या. नेता मोठा कशाने होतो तर त्याच्या पाठीमागे असलेलं जनमत, कामाची तळमळ आणि भूतकाळातला प्रचंड संघर्ष….

काल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना मारहाण झाल्याचे समजले आणि दुखः झालं. खरंतर एखाद्याची भूमिका नाही आवडली तर त्यांना आपलं मानणं सोडून द्यायला हवं. आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या या दलित नेत्याला एक चापट लावून तुम्ही कोणतं दिव्य कार्य करणार आहात. ज्यांनी समाजाला एका लयीत जोडून ठेवलं त्यांना तुम्ही ही कोणती शिक्षा देणार आहात.

दलित आणि इतर समाज म्हणून जेव्हा समाजात काही गोष्टी घडतात तेव्हा रामदास आठवले यांची प्रतिक्रिया ही दलितांच्या विरोधात नसते मात्र दोन्ही समाजाला सोबत घेऊन दलितांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने टाकलेलं पाउल असते. गेल्या अनेक वर्षांपासून आठवले नावाचं वादळ ऐकून होतो.

महाराष्ट्रासह इतर अनेक ठिकाणीही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) च्या माध्यामातून त्यांनी आपला राजकीय अजेंडा जाहीर करून धाडसाने निर्णय घेतला असेल आणि तेवढ्याच धाडसानं निर्णय बदललाही असेल मात्र कधी राजकारण करण्यासाठी समाजात आग ओतण्याचं काम या पँथरने केल्याचं ऐकलं नाही.

खऱ्या अर्थाने दलित, वंचित आणि शोषित घटकांवर अन्याय होतो तेव्हा रामदास आठवले आवाज देताना पाहिलंय. रामदास आठवले नावाचा नेता एका रात्रीत तयार झालेला नाही, कुण्या मिडीयाने डोक्यावर घेऊन तयार केलेला नाही, कुणाच्या पाठीमागे फिरून तयार झालेला नाही तर खेड्यापाड्यात दलित समाजाच्या वाड्यावस्तीत फिरून एक एक पँथर जमा करून त्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग पेटवण्याचं काम यांनी केलं.

साधारण घरातून घोंघावत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रीपदापर्यंत मारलेली मजल ही त्यांच्या इतिहासजमा झालेल्या संघर्षाचे आणि कार्याचे मोल आहे. गावागावात आठवले साहेब अंगार है अशा घोषणा बाहेर पडताना पाहिल्या तेव्हा त्या फाटक्या माणसाची उंची तुम्हाला आम्हाला लक्षात येते.

दलित समाजाला इतर नेत्यांनी काय दिलं आणि आठवलेंनी काय दिलं हे समजून घ्यायचं असेल तर आठवलेंचा संघर्ष जाणून घ्या. आपलं काम ही आपली आयडेंटीटी असली पाहिजे आणि तशी आयडेंटीटी आठवलेंनी तयार केली. दलित समाजाच्या मागण्या आणि उत्कर्षासाठी तळमळत उन्हात बसण्यापेक्षा भाजपाच्या सोबतीने जाऊन एखादं मंत्रिपद घेऊन समाजाला जेवढा न्याय देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न केला तर रामदास आठवले याचं बिघडलं कुठं?

दलितांच्या हितासाठी सातत्याने काम करून झोपडपट्टीतल्या दलितांचे प्रतिनिधित्व करणारे रामदास आठवले यांच्या कर्तृत्वाकडे पाहिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असणारा कार्यकर्ता आठवतो. कारण देशाला बळ दिले पाहिजे म्हणत चुकीचे ते चुकीचे आणि बरोबर ते बरोबर म्हणण्याची ताकद रामदास आठवले ठेवतात. आणि नेमकं हेच दलितांचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांना पचनी पडत नाही आणि मग अशाप्रकारचा हैदोस मांडला जातो…

कदम मिलाकर चलना होगा… बाधाएं आती हैं आएं… घिरें प्रलय की घोर घटाएं, पावों के नीचे अंगारे, सिर पर बरसें यदि ज्वालाएं, निज हाथों में हंसते-हंसते, आग लगाकर जलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।

रामदास आठवले यांना झालेल्या मारहाणीचा जाहीर निषेध आणि रामदास आठवले यांना शुभेच्छा ! लगे रहो….

विकास विठोबा वाघमारे
Vwaghamare0@gmail.com

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *