मानेंच्या बेताल वक्तव्यावरून प्रकाश आंबेडकरांना अमरजित पाटलांचे खुले पञ !

आदरणीय अॅड.प्रकाशजी आंबेडकर साहेब.
सस्नेह जय जिजाऊ…!

महोदय,
पञास कारण की,आपण गेली अनेक दिवस वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यातील वंचित समाज घटकांना राज्याच्या सत्तेमध्ये सत्ताधारी बनवण्याचे ध्येय घेऊन गावोगाव मेळावे घेत आहात.आपण घेत असलेल्या मेळाव्यामधून आपलेच अनेक सहकारी,त्यातल्या त्यात लक्ष्मण माने हे सातत्याने मराठा समाजावर टिका करित आहेत.राज्य मागसवर्ग आयोगाच्या अहवालानुसार मराठा समाज हा शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झाल्यापासून तर लक्ष्मण मानेंच्या टिकेमधून विकृतपणा डोकावू लागला आहे.

मुळामध्ये लक्ष्मण माने हे स्वत: बौद्ध धम्म स्विकारल्याचे सांगत आले आहेत.ज्यावेळी त्यांनी ‘…चलो बुद्ध कि और ‘ म्हणुन भटक्या विमुक्तांचे अनेक मेळावे राज्यभर घेतलेले होते.त्यावेळेस मराठा समाजातील मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाला सदिच्छा आणि पाठींबाच दिलेला होता.

नंतरच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यातील पाचगाव मधील राजर्षी शाहू महाराज यांच्या नावे असणार्‍या भटक्या विमुक्तांच्या अनाथ आश्रमाच्या उभारणीसाठी देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जी भरीव स्वरुपाची आर्थिक मदत लक्ष्मण माने यांना मिळवून दिलेली होती. त्याबद्दल तर स्वत: लक्ष्मण मानेंचाच एक लेख आमच्या वाचण्यात आला होता. एकंदरीत वेगवेगळ्या प्रसंगी मराठा समाजाने वेळोवेळी सर्वच बहुजन समाजासाठी जो त्याग आणि निस्वार्थ भावणेने सेवा केलेली आहे.हे कोणी ही नाकारु शकत नाही.

आदरणीय अॅड.प्रकाशजी आंबेडकर साहेब भारतीय लोकशाही मध्ये प्रत्येकाला त्याचा संवैधानिक हक्क आणि अधिकार मिळाला पाहिजे यासाठी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाही मार्गाने मागणी करण्याचा,त्यासाठी लढण्याचा हक्क ही प्रत्येक भारतीय नागरीकाला दिलेला आहे.हे आम्ही आपणास सांगावे लागेल असे आम्हाला वाटत नाही. आपण स्वत: डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात. यातच सर्व आले.

परंतु,आपल्या न्याय हक्काची मागणी लोकशाही चौकटीत राहून मराठा समाजाने केल्यावर सुद्धा जर आपले सहकारी असणार्‍या लक्ष्मण मानेंना मराठा समाजावर अत्यंत विकृत टिका टिप्पनी करावी वाटते. व ते तसे आपल्या अनेक सभांमधून सातत्याने करत आहेत.त्यामुळे आम्हाला एकूणच आपल्या भुमिके बद्दल आपले स्पष्टीकरण आपण करणे आवश्यक वाटत आहे.

आज आपले सहकारी लक्ष्मण माने यांनी आपल्या भाषणांतून मराठा, पाटील यांच्या मुलींबद्दल जी अत्यंत निंदनीय आणि विकृत विधाने केलेली आहेत. त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख म्हणून आपण आपली भुमिका जाहिर करणार काय ? लक्ष्मण मानेंच्या एकंदरीत सर्व भाषणांमधून व त्यातल्यात्यात आजच्या मराठा महिला,मुलींसंदर्भातील भाषणा बाबत आपले मत काय ? लक्ष्मण माने यांनी मांडलेल्या किंवा मांडत असलेल्या मतांशी आपण सहमत आहात काय ? लक्ष्मण मानेंनी मांडलेली मते ही आपल्या बहुजन वंचित आघाडीची अधिकृत भुमिका आहे काय ? असल्यास तसे सांगावे.

परंतु, आपली अथवा आपल्या वंचित बहुजन आघाडीची भुमिका वेगळी असल्यास आपण लक्ष्मण मानेंवर शिस्तभंगाची कारवाई करुन आपल्या आघाडी मधून हकालपट्टी करणार काय ?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मराठा समाजाला आपण दिली पाहिजेत.कारण,आपण स्वत: डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहात.व आपण स्वत: जेष्ठ विधिज्ञ आहात.डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर आपला जेवढा हक्क आहे तेवढाच मराठा समाजाचा सुद्धा डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांवर हक्क आहे.

किंबहुना,मराठा समाजातील नवतरुणांनी शिव – फुले – शाहू – आंबेडकर हि विचारधारा व हे सर्व महापुरुष त्यांची जात न पाहता,त्यांचे बहुजन समाजाप्रती असणारे योगदान पाहून स्विकारलेले आहेत.हे आपण जाणताच,मग अशा परिस्थितीमध्ये आपले सहकारी असणारे लक्ष्मण मानेंच्या वक्तव्यावर आपली भुमिका आपण स्पष्ट करणे.बहुजन समाजाच्या सामाजिक स्वास्थाच्या अनुशंगाने गरजेचे आहे.आपण आमच्या या खुल्या पञास खुला प्रतिसाद देऊन आमच्या प्रश्नांची उत्तरे द्याल.या अपेक्षासह आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत असलेला एक मराठा बहुजन बांधव…

जय जिजाऊ…! जय शिवराय…!! जय भिम…!!!

आपला
अमरजित पाटील.
प्रदेश कार्याध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *