लाच हा शब्द कशाप्रकारे त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लावतो याचे उदाहरण सांगणारा वयस्कर बाबांचा हृदयस्पर्शी प्रसंग..

एके दिवशी बसने प्रवास करत तालुक्याच्या गावी निघालो होतो. वाटेत एका खेडेगावी बस-थांब्यावर गाडी थांबली. साधारण चार पाच माणसे गाडीत चढली.त्यात एक वयोवृद्ध आजोबा दिसले.माझ्या सीटवर थोडी जागा होती आम्ही अॅडजस्ट करुन त्यांना बसवले.

ते बाबा सुखावले होते. त्यांना बरे वाटले जागा मिळाली म्हणून. मी न राहून प्रश्न केलाच….? बाबा काय करता आपण….? आजोबा धीर-गंभीर आवाजात बोलले नकोसं झालय रे जीवन….!

मला हे ऐकून गलबलल्यासारखं झालं. मी सहजच बाबांना बोलते करत गेलो. बाबा का हो असं म्हणता ? काय सांगू पोरा तुला कंटाळलोय रे आयुष्याला महिण्याला दहा चकरा माराव्या लागता या ऑफीसात. मी म्हणालो बाबा आराम करायचा मुलाला पाठवून द्यायचं ना काही काम असल्यास.

बाबा कोसळले! बाबांचे अश्रु अनावर झाले त्यांच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते… काय सांगू लेकरा तुला. गेला रे माझा सोन्यासारखा मुलगा आम्हा दोघांना सोडून..! आता माझेही डोळे पाणावले मलाही काही सुचेनासं झालं होतं. परंतू मला त्या बाबांची करुण कहाणी ऐकायची होती. जीवनात संकटं ही आपल्याच वाट्याला नसतात ते अनेक लोक भोगत असतात.

पण कुणी चेहर्‍यावर ते दु:ख जाणवू देत नाही. बाबा मग तुम्ही आता कोण कोण असता घरी..?बाळा मी आणी माझी पत्नी दोघचं रे..! मला एकुलता एक मुलगा होता तोपण गेला आम्हाला सोडून….
तो दुचाकीच्या अपघातातून दगावला….!

मी बाबांना सावरत होतो..  बाबा आता कुठे निघालेत तुम्ही आणी काय काम आहे तुमचे तालुक्याला..? न राहुन प्रश्न केलाच.. काय सांगू बाबा तुला अरे मी एक सेवानिवृत्त शिक्षक.मला निवृत्त व्हायला तीन वर्ष लोटली गेली पण अजून पेन्शन चा पत्ता नाही. माझ्याकडे ५ एकर जमीन आहे पण या वयात मी कशी ती जमीन कसू सांग बरे…? माझी बायको सारखी आजारी असते तिच्या औषधांवरच महिण्याला हजार रुपये खर्च होतात. त्यात हे ऑफिसातले कामं प्रत्येकाला पैसा द्यावा लागतो….

‘हा’ म्हणतो हि सही राहिली द्या पैसे.. ‘तो’ म्हणतो हे कागद राहिले द्या पैसे अरे पैसे का झाडाले लागतो कारे लेकरा..?

हे सर्व ऐकून मी सुन्नच झालो प्रथमता: या शासकीय यंत्रणेबद्दल मनस्वी खूप राग आला.. का असं करतात हे लोक हेच कळत नाही वरती सरकार कितीही जनहितोपयोगी असलं तरी खालील भ्रष्ट शासन त्याच्यावर पाणी फिरवते….

‘लाच’ हा असा शब्द आहे की ज्याने अनेकांना त्याच्यासमोर नतमस्तक व्हायला लावले…. पण यात या सामान्य लोकांचा काय दोष शासनाची अविरत ३० वर्षे नोकरी करायची आणी त्याची हि फळे….? असही नाही की ते जादाचे अनुदान मागताय… अरे जे हक्काचे आहे तेच जर व्यवस्थित व वेळेवर मिळत नसेल तर मग या देशात लोकशाहीचा अपमान झाल्यासारखं नाही का वाटत? हे सर्व वादळ मनी चालू असतानाच बाबाला प्रश्न केला.

बाबा याची रितसर तक्रार नाही का केली? बाळा रितसर तक्रार केली उपोषण पण केलं ८ दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पण काही फरक पडत नाही. शेवटी उपोषणावर असतांना मी बेशुद्ध पडलो काही सहकारी मित्रांनी नंतर मला घरी आणले. व्यर्थ अाहे रे सगळे. काय म्हणावं या सरकारी यंत्रणेला सामान्य लोकांच्या प्रश्नावर विचार करायला या लोकांना वेळेच नाही मग ही आलेशान ऑफीसं तर कशाला…?

नगरपालिका,महानगरपालिका,नगरपरिषद,जिल्हापरिषद तरी कशाला..? का एवढे स्वार्थापोटी हे भ्रष्ट कर्मचारी सामान्य लोकांना त्रास देतात. मी बाबांना म्हणालो आतापर्यंत किती पैसे दिलेत तुम्ही..?
बाबा म्हंटले बाळा आतापर्यंत नाही म्हंटले तरी वीस हजाराच्या वर रक्कम दिली पण कामचं होत नाही बघ.

अश्याच प्रश्नाच्या वादाळात बस कशी शहरात येवून पोहचली हेच कळालं नाही. बाबा उठले व चालायला लागले व थोडे थांबून परत येवून माझ्या डोक्यावरुन हात फिरवला आणी म्हंटले बाळा एक लक्षात ठेव. हा देश आपला आहे आणी या देशात कितीही लोक आपल्यावर अन्याय करत असले तरी त्याला तोंड देत वाट काढणे हे आपलं कर्तव्य आहे. चलं येतो बाळा जीवनात खूप मोठा हो आणी असं काहीतरी करं की या सरकारी कर्मचार्‍यांना पण लाज वाटली पाहीजेत.

बाबांचे ते वाक्य असे काही मनावर कोरल्या गेले की आजही जर कुणावर अत्याचार होतांना दिसले की मला पेटून उठल्यासारखं होतं. भ्रष्ट शासकीय कामांना भ्रष्ट बनवणारे आपणचं. तेच जर आपण रोखले आणी चांगल्या सुस्थित व्यवस्थेसाठी आपण काही करु शकलो तर नक्कीच करा.

लाच घेणार नाही…. आणी देणार तर मुळीच नाही…
साभार- सागर म भोंडे पाटील (बुलडाणा)
मो नं :-9011185202

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *