मराठा समाजाला सरंजामदार म्हणुन हिनावणाऱ्यांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत का ?

मुळात कोणतीही एखादी संपूर्ण जात सरंजामदार आहे असे म्हणणे हे अवास्तव तर आहेच पण ते सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अन्यायकारक सुद्धा आहे .
एकेकाळी संपूर्ण भारतवर्षावर , काबुल-कंदाहार से लेकर दूर बंगाल तक और लाहोर से लेकर तंजावर तक मुस्लिम बादशाह की हुकूमत थी…. तरी सुद्धा आपली हुकूमत गाजवणारा मुस्लिम समाज “सरंजामदार” आहे असे म्हणणार का ?

कारण आज भारतातील मुस्लिम समाज विविध प्रवर्गांमध्ये विभागल्या गेला . संविधानात अंतर्भूत असणाऱ्या अनुसूचित जाती ( SC ) , अनुसूचित जमाती ( ST ) आणि मंडल कमिशन लागू झाल्यानंतर OBC मध्ये अनेक मुस्लिम ( जातींचा ) समावेश करण्यात आला . तर काही मुस्लिम समुहांना अल्पसंख्यांकांचा दर्जा आहे .

सरंजामदार : सरकार , जमिनदार , वतनदार , मालगुजार , देशमुख , देसाई , पाटील ही पद असणाऱ्यांना सरंजामदार म्हटलं जातं . मग काय ही आडनाव मराठा नावाच्या एकमेव जातीत आहेत ????? मराठा जो की मूळचा कुणबी आहे . तिथे सुद्धा ही पाटील , देशमुख आडनाव आजही आहेत . मग काय त्यांना आरक्षण नाही ? मुस्लिमांमध्ये सुद्धा देशमुख , इनामदार आडनाव असणारे लोक आहेत .

शेतकरी कामगार पक्षाचे वयोवृद्ध आमदार गणपतराव देशमुख धनगर समाजाचे आहे . मग काय ते सरंजामदार आहेत ? शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे आगरी समाजाचे आहेत . मग पाटील आडनाव धारण करणारा संपूर्ण आगरी समाज सरंजामदार म्हणावा का ?

माझा एक मित्र सुधीर देशमुख हा महादेव कोळी म्हणजेच आदिवासी समाजातून येतो . त्यांच्याकडे पिढ्यानपिढ्या देशमुखी आहे . तो ST चे आरक्षण घेतो मग काय तो सरंजामदार आहे ?

महाराष्ट्रातील अनेक जातींमध्ये देशमुख , देसाई , पाटील ही आडनाव आहेत . या सर्वांच्या बापजाद्यांनी ही पद उपभोगली आहेत . तरीही त्यांना आरक्षण आहे . सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून ते योग्य सुद्धा आहे . यवतमाळचे माजी आमदार निलेश पारवेकर देशमुख हे वाणी समाजाचे होते . काटोल जि. नागपुरचे माजी मंत्री अनिल देशमुख हे कुणबी समाजाचे होते .

सावित्रीबाई फुलेंचे वडील हे पाटील होते . जिथे पाटील , देशमुख या पदव्या नाहीत तिथे चौधरी , नाईक , राजे आशा अनेक सरंजामी वाटाव्यात अशा पदव्या आहेत .

येरला जि. नागपुरचे एक शेतकरी रामराव पाटील धोटे हे ५२ गावांचे मालगुजार होते . आजचा विदर्भ , मध्यप्रदेश येथपर्यंत त्यांच्या जमिनी होत्या असे म्हणतात . तरीही त्यांच्या पुढील पिढ्या आरक्षणाचा लाभ घेत आहेत .

अगदी बंजारा समुहात सुद्धा नाईक हा हुद्दा असणारी आडनाव आहेत . वसंतराव नाईकांच्या घरात शेकडो एकर जमीन , शिक्षण संस्था , बँक , आजही आहेत . गोंड समाजामध्ये सुद्धा धर्मराव बाबा आत्राम यांना आठशे वर्षांचा राजकीय राजेशाही वारसा आहे . मराठ्यांच्या आधी गोंड राजे विदर्भ-महाराष्ट्राचे राजे होते . धर्मराव बाबा आत्राम , राजे सत्यवान आत्राम आज अनुसूचित जमातीसाठी राखीव असणाऱ्या मतदार संघातून निवडणूक लढवतात .

ज्या गावात जो समाज संख्येने , शक्तीने अधिक त्या त्या गावाचा पाटील , देशमुख मालगुजार तो तो समाज असायचा हा महाराष्ट्राचा इतिहास आहे . माजी मंत्री स्वरूपसिंह नाईक हे आदिवासी समाजाचे होते . माजी मंत्री गणेश नाईक हे सुद्धा मागास जातीतून येतात .

रायगड जिल्ह्यातील बहुतांश पाटील हे आगरी समाजाचे आहे. शिक्षणाचा अधिकार परंपरेने असणाऱ्या कोकणस्थ चित्पावन ब्राम्हण , कायस्थ ( सिकेपी ) , पाठारे प्रभू यांच्यात सुद्धा पाटील , देशमुख ही आडनावे त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत बक्कळ आढळतात .

जळगाव जिल्ह्यात असणारा लेवा पाटील , गुजर समाजामध्ये परंपरागत पाटीलकी असणारे आहेत . कदाचित देशमुख सुद्धा असावेत . आज महाराष्ट्रातील लेवा पाटलांना , गुजर समाजाला आरक्षण आहे .

राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सगळ्या अठरापगड जातीच्या लोकांना , बारा बलुतेदारांना शिक्षणात आणि नोकरीमध्ये आरक्षण दिले होते . अनेकांना परदेशी शिक्षणासाठी फेलोशिप सुद्धा दिल्या होत्या . भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा त्याचा मजबुत पुरावा आहे . खासेराव जाधवांना प्रशासकीय प्रमुख केले होते . मराठयांसह मुस्लिमांना आरक्षण दिले होते .

महाराष्ट्रातील जवळपास २० पेक्षा जास्त जातींमध्ये पाटील , देशमुख , देसाई , नाईक , महाजन , चौधरी , राजे , मालगुजार या सरंजामी वाटणाऱ्या पदव्या धारण करणारे जातसमूह आहेत . मग एकट्या मराठा समाजाला सरंजामदार म्हणण्यात काय अर्थ आहे ?

महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा , कुणबी , आगरी , धनगर , वाणी , गुजर , लेवा पाटील , महादेव कोळी , माळी , तेली , कायस्थ , कोकणस्थ-ब्राम्हण या आणि अशा असंख्य जातींमध्ये देशमुख , देसाई , पाटील ही सरंजामी वाटत असणारी आडनाव आहेत . यातील कोकणस्थ , कायस्थ हे परंपरागत शिक्षण घेणारे आहेत .

मग इतर देशमुख , पाटील यांना सोडून ( आरक्षणाच्या संदर्भात आणि अनेक सामाजिक बाबींसाठी ) परंपरेशी ( सनातन व्यवस्थेशी ) सतत संघर्ष करणाऱ्या मराठ्यांना सरंजामदार म्हणण्यात काय अर्थ आहे ? हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने योग्य आहे का ?

– निरज धुमाळ Whats App नं. ८८ ४७७ ५७७ ४६

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *