सहा एकर शेतीवर उपजीविका करत या शेतकरी मातेने घडवले आहेत दोन कलेक्टर मुलं..

महाराष्ट्र सध्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना करतोय. दुष्काळामुळे मराठवाड्यात तर अतिशय बिकट परिस्थिती आहे. मागील अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करत आला आहे. नापिकीमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येत आहे. हजारो शेतकरी आपलं जीवन संपवत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण काम असताना मुलांना शिक्षण कसे द्यावे हा एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर असतो.

पण मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील एका शेतकरी मातेने अवघ्या सहा एकर जमिनीवर आपला संसार चालवून आपल्या दोन मुलांना कलेक्टर बनवले आहे. या शेतकरी मातेचे नाव आहे आसराबाई हरिभाऊ मुंढे. अतिशय हलाखीच्या परिस्थिती मधून त्यांनी आपल्या मुलांना अतिशय काबाडकष्ट करत शिक्षण दिले. आसाराबाई यांनी स्वतः शेतीतील सर्व कामे केली आहेत.

आसराबाईंचे पती हरिभाऊ यांचे २०१३ साली निधन झाले. आसराबाई या धार्मिक व खूप गरीब मायाळू स्वभावाच्या आहेत. आजही आपली मुले एवढ्या मोठ्या पदावर असल्याचा त्यांना थोडाही गर्व नाहीये. विशेष म्हणजे आसराबाई या अशिक्षित आहेत.

बीड जिल्ह्यातील पिंपळनेरपासून जवळच असलेले ताडसोन्ना हे गाव. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आसराबाई या सहा एकर शेतीवर उपजीविका करत होत्या. त्यांचे पुत्र आज महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहिती आहेत. आसराबाईनी तुकाराम मुंढे आणि अशोक मुंढे या आपल्या दोन मुलांना कलेक्टर करून एक आदर्श मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवला आहे.

तुकाराम मुंढे यांना आसराबाईनी इयत्ता नववीपर्यंत गावातच शिकवले तर अशोक मुंढे यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण ताडसोन्ना मध्ये झाले. आसराबाईंचे पती हरिभाऊ पूर्णपणे सावकाराच्या कर्जात बुडालेले होते. असराबाईंनी पुढे तुकाराम मुंढेंना औरंगाबादला शिक्षणासाठी पाठवले. तुकाराम मुंढेंनी उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांनी इतिहास, सामाजिक शास्त्र मधून बीए ही पदवी प्राप्त केली, सोबतच राज्यशास्त्र घेऊन एमए पूर्ण केलं.

पुढे तुकाराम मुंढेंनी मुंबई येथे इस्माईल युसूफ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून देखील काही काळ नोकरी केली. तुकाराम मुंढे हे २००५ च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून देगलूर वर बार्शी येथे काम केले. नागपूर येथे सीईओ म्हणून काम केल्यानंतर पुढे जालना आणि सोलापूर मध्ये त्यांची जिल्हाधिकारी म्हणून कारकीर्द वादग्रस्त राहिली.

त्यांच्या बेधडक निर्णयामुळे राजकारण्यांशी त्यांचा संघर्ष निर्माण झाला. त्यांनी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून खुप चांगले काम केले. नंतर पुणे मनपाच्या पीएमपीएमएल च्या अध्यक्षपदी त्यांची कारकीर्द पण चांगलीच गाजली.

त्यांच्या बेधक निर्णयामुळे त्यांनी राज्यात आपला एक वेगळाच दरारा निर्माण केला. नुकतीच त्यांची नाशिक मनपा आयुक्त पदावरून मुंबईत बदली झाली आहे.

तुकाराम मुंढे यांचे मोठे भाऊ अशोक मुंढे यांचे उच्चशिक्षण बीडमधील बलभीम कॉलेजमध्ये झाले. अशोक मुंढे यांनी आतापर्यंत औरंगाबाद, गंगाखेड, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई येथे काम केले आहे.

महाराष्ट्राला लाभलेल्या अशा या धडाकेबाज, ध्येयवेडे व प्रामाणिक सनदी अधिकारी घडवणाऱ्या आसराबाईना खासरेचा सलाम.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *