वास्तवात गुजरातच्या रस्त्यांची अवस्था कशी आहे?

गुजरातच्या रस्त्यावरून ‘मी प्रचंड आशावादी’

परवा काही कामानिमित्त एक दिवसाची गुजरातवारी घडली… आणि भारावून गेलो. सापुतारा इथली महाराष्ट्राची बॉर्डर ओलांडली आणि सुखद धक्का बसला. महाराष्ट्रातला खड्ड्यांचा, खडबडीत, कठीण वळणांचा रस्ता माघे पडून गुजरातचा सुसाट रस्ता लागला. सुरुवातीला वाटलं दिखाऊ मोदीने बॉर्डर लागत केला असेल थोडाफार चांगला रस्ता पुढे अवस्था जैसे थे असेल असं वाटलं पण तिथून पुढे तब्बल शंभर किलोमीटर पुढे गेलो पण वाटेत मला कुठेच रस्त्यात खड्डा दिसला नाही. किंवा कुठे डांबर उखडलंय हे सुद्धा दिसलं नाही. परतीच्या प्रवासात हटकून गुगल मॅप टाकून अडवळणाचे खेड्यापाड्यातले डांग जिल्ह्यातले आदिवासींच्या पाड्यांचे रस्ते सुद्धा पाहिले पण सगळे अगदी खणखणीत सुसाट..!

वाटेने प्रवास करताना, कुण्या वाहनाला ओव्हरटेक करावं किंवा हॉर्न वाजवावं याची गरजच पडली नाही. रस्ता चांगला असल्यामुळे वाहनं आपापल्या लयीत आणि अपेक्षित वेगात चालत होती. सगळं काही शांत आणि चैतन्यमयी वाटत होतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाड त्यांना छान चुना काव लावलेला. काही झाडं अगदी रस्त्याला खेटून होती. पण उगीच त्यांना तोडलं गेलेलं नव्हतं तर रात्री अपरात्री त्याला वाहने धडकू नयेत म्हणून रेडियम लावलेलं होतं.

नदी शेजारी डोंगर फोडून रस्ता केलेला पण त्याचा राडारोडा नदीपात्रात न टाकता तो सरळ उचलून दुसरीकडे शिफ्ट केलेला अशी सगळी नीट व्यवस्था… लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळं चैतन्य आणि हास्य दिसत होतं. बाजारात बऱ्यापैकी तेजी दिसत होती. उगीच लोकांच्या मनात आमचा विकास नाही झाला, हे नाही झालं, ते नाही झालं, घोटाळाच झाला असले काही प्रश्न नव्हते… जो तो आपल्या कामात गर्क दिसत होता…

कितीही वाईट म्हटलं तरी मोदींची ही कमाई नजरेआड करण्यासारखी नाही. जो महाराष्ट्र सिंचन घोटाळ्याने गाजला. अख्खी धरणच्या धरणं ज्या महाराष्ट्रतल्या लोकनेत्यांच्या बगलबच्च्यांनी घशात घातली, सार्वजनिक बांधकामची आजही अशी अनेक रस्ते असतील ज्यांची करोडो रुपयांची बिले उचलली गेली पण अजूनही रस्ते सापडत नाहीत.

पचवर्क, खड्डे बुजवा ही अशी किरकोळ कामं तर रोजच बोगस होत आलीत. खड्यात पडून त्यामुळे अपघात होऊन कित्येकांचे जीव गेले याची तर मोजदाद नाही. महाराष्ट्रात रस्त्यावर एक गोष्ट मात्र प्रामाणिक केली जाते ते म्हणजे “पुढे अपघातग्रस्त ठिकाण आहे वाहने हळू चालावा” या सूचनेचा बोर्ड कुठलाही घोटाळा न करता लावला जातो. गुजरातला असे बोर्ड खूप कमी पाहायला मिळाले.

महाराष्ट्रातही भाजप सरकार आल्यापासून रस्त्यांच्या कामाला चांगला वेग आलाय. महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात जा रस्त्याची कामे सुरू असलेली दिसतील. सिमेंट काँक्रीटचे चांगले रस्ते बनवण्याचं काम सुरू आहे. पर्यायाने या रस्त्याच्या कामावरच अनेक तरुणांना रोजगार मिळालाय. ही कामं पूर्ण झाल्यास महाराष्ट्रही सुसाट बनेल. समृद्धी ही रस्त्यानेच येते हे काही खोटं नाही. त्यामुळे ही रस्ते तयार झाल्यास महाराष्ट्रात चैतन्य निर्माण होईल.

त्यावेळी घोटाळ्यात अखंड बुडालेली काँग्रेस आणि राष्ट्रवादी कुठे असेल.? यांच्या सत्तेच्या काळात गेल्या 15 वर्षात सांगता येईल असा एकही रस्ता धड बनवू न शकलेल्या या ‘ताई’ प्रत्येक जिल्ह्यात जाऊन खड्डयांसोबत सेल्फी काढत होत्या. आणि याच सेल्फीच्या जीवावर पुन्हा सत्तेत येऊ असा ‘आशावाद’ बाळगणाऱ्या या राजकारण्यांना भाजपने खूप लांबची मुसंडी मारलीय याची तिळमात्र कल्पना नाही….

विकासाच्या बाबतीत भाजप उजवाच आहे. त्यांचे खाकी पँटीतले नेते निष्कलंक राहण्याचा प्रयत्न करतात. त्यात ते अजूनतरी यशस्वी आहेत. फक्त भाजपने rss च्या नादी लागून सर्वसामान्य लोकांना, आदिवासींना आणि बहुजनांना संस्कृतीक गुलाम करण्याचा प्रयत्न करू नये… ते पुन्हा पुन्हा सत्तेत येत राहतील…

दत्ता कानवटे, औरंगाबाद.
9975306001

तळटीप :- गुजरातच्या उनाई गावात भेटलेल्या गोविंदभाई या दुकानदाराने “नोटबंदीने पुरी फाड रखी है हमारी ” हे म्हटलेलं वाक्य मात्र दुर्लक्षित करता येण्यासारखं नव्हतं..!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *