शहीद तुकाराम ओंबळे यांनी अशाप्रकारे बहादुरी दाखवत अतेरिकी कसाबला पकडले..

शहीद तुकाराम ओंबळे यांनी कशाप्रकारे बहादुरी दाखवत अतेरिकी कसाब याला पकडले याचा किस्सा या केसचे तपास अधिकारी व शहीद तुकाराम ओंबळे यांचे सहकारी रमेश महाले यांनी सांगितला आहे.

२६/११च्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जाहीर झाला. विधान भवनाकडून रायफलच्या धाकावर चोरलेली स्कोडा कार घेऊन अतिरेकी मलबार हिलच्या दिशेने निघाल्याचा पहिला कॉल रात्री १२ वाजून ११ मिनिटांनी खणाणला. आम्ही वॉकीटॉकीवर सज्ज होतो. साडेबाराच्या ठोक्याला ही कार गिरगाव चौपाटीकडे अडवण्यात आली. बाहेरील लाइट बंद करून आतील लाइट सुरू करण्याच्या आम्ही सूचना दिल्या.

मात्र इस्माईलने अप्पर लाइट मारली. तो प्रकाश डोळ्यावर आल्याने पोलिसांना नंबर दिसत नव्हता. पोलीस गाडीभोवती येत असल्याचे पाहून इस्माईलने ती वळविण्याचा प्रयत्न केला. गाडी दुभाजकाला धडकून कारचे चाक जाम झाले. रागाच्या भरात इस्माईलने पोलिसांवर गोळ्या झाडल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात इस्माईलचा मृत्यू झाला. ही बाब बाहेरच्या पोलिसांना माहिती नव्हती.

माझा पार्टनर मारला गेला या रागात त्या गाडीत बसलेला कसाब बाहेर आला आणि पायात पाय अडकून पडला. त्याचवेळी तुकाराम ओंबळेसाहेबांनी कसाबला एके-४७ सह पाहिले आणि पकडण्यासाठी मिठी मारली. कसाब त्यांना ढकलत होता, परंतु त्यांची मगरमिठी सुटायला तयार नव्हती. म्हणून त्याने ५ राउंड फायर केले. पाचही राउंड ओंबळे यांच्या पोटाच्या आरपार गेले. ४ राउंड मानेच्या बाजूने बाहेर आणि एक राउंड हाडाला लागून खिशात असलेल्या २ रुपयांच्या नाण्याला जाऊन भिडला. त्या नाण्याचा आकार सी राउंडसारखा झाला होता. ते नाणेही न्यायालयात सादर केले.

आमचा संजय गोविंदकर पुढे सरसावताच कसाबने आणखी एक राउंड फायर केला. तोपर्यंत पोलिसांनी कसाबला काठीने मारण्यास सुरुवात केली होती. अवघ्या ७ मिनिटांच्या या थरारानंतर कसाबला जिवंत पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले.

या घटनेत तुकाराम ओंबळे यांनी मोलाची कामगिरी बजावली आपला मृत्यू समोर असतानाही त्यांनी त्याची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावले. तुकाराम ओंबळे यांच्या मुलीचा त्या दिवशी वाढदिवस होता आणि त्याच दिवशी त्यांना शहीद व्हावे लागले. तुकाराम ओंबळे यांच्या पराक्रमाला मानाचा मुजरा..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *