मुळशी पॅटर्न बघितल्यावर प्रत्येकाने वाचावी अशी एका शेतकरी पुत्राची प्रतिक्रिया..

जमीन ईकायची नसते राखायची असते…!
काल बहुचर्चित असा ” मुळशी पॅटर्न ” बघण्याचा योग आला. जमिनी विकून संपलेल्या पैश्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांची वास्तववादी आणि विदारक परिस्थिती मांडल्याबद्दल चित्रपटाच्या टीम चे आभार. ” पिकवणारी जमात आपली आज पाठीवरून ओझं वाहतेय ” हे महेश मांजरेकरांच्या तोंडातील वाक्य मनाला चटका लावून जात. बापजाद्यांच्या शेत्या विकून त्यातून आलेल्या पैशातून खरेदी केलेल्या गाड्या , पोरींचे केलेले मोठे लग्न यासगळ्यात पैसे संपल्यामुळे गाव सोडून शहरात हमाली करायला लागणारा ” मुळशी ” गावचा पाटील , हे अनुभवत आल्याने मनामध्ये प्रस्थापिताविरोधात प्रचंड चीड ठेऊन गुन्हेगारी विश्वाकडे वळणारा पाटलाच पोरग ” राहुल्या ” त्याचा झालेला क्रूर शेवट हे सगळं बघून मन सुन्न झाल्याशिवाय राहत नाही.

खरंतर सर्वांनाच विचार करायला लावणारा हा चित्रपट आहे. कधीकाळी या महाराष्ट्रावर राज्य करणारी जमात आपली आज इतक्या विदारक परिस्थितीत का जगतेय याचा विचार कुणीच करत नाहीय. ” मुळशी पॅटर्न ” फक्त मुळशी या गावाचीच नाही तर शहरांच्या वाढत्या व्यापात गिळंकृत होणाऱ्या सर्वच गावाचं वास्तव मांडणारी कथा आहे. ” तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या मग आम्ही तुम्हाला खाणारच ना ” हा चित्रपटातील डायलॉग शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या विकृत मानसिकतेला इशारा देणारा आहे.

वडिलोपार्जित जमिनी शेतकऱ्याकडून वाट्टेल त्या भावात घ्यायच्या त्यावर मोठे मॉल , कंपन्या उभारायच्या , त्या जमिनीच्या मालकांना हवी तशी वागणूक द्यायची या प्रस्थापितांच्या मानसिकतेमुळे एक वर्ग विस्थापित होत चाललाय. त्यातून प्रचंड असंतोष या वर्गामध्ये निर्माण होत आहे हे सर्व भयावह आहे. वरवर जरी सगळं शांत दिसत असल तरी याचा स्फोट कधीतरी झाल्याशिवाय राहणार नाही.” गुरू हा वाट दाखवणारा असतो वाट लावणारा नाही ” हे चित्रपटातील वाक्य गुन्हेगारी जगताकडे आकर्षित होत चाललेल्या युवकानाही विचार करायला लावणार आहे. भाई , दादा हे क्षणिक सुख देणारे असले तरी त्याचा शेवट ही कधी न कधी ठरलेला असतोच हेही अत्यन्त उत्कृष्ट पणे मांडलं आहे.

शेवटी एकच बोलावसं वाटत की हे गेलेलं वैभव पुन्हा मिळवायचं असेल तर मेहनत , शिक्षण ,व्यवसाय , उद्योग , विचारधारा हे सर्व आपल्याला अंगिकरावच लागणार आहे. प्रत्येक क्षेत्रात शेतकऱ्याच्या पोरांनी पाय घट्ट रोवून मोठं होण्याची आज गरज आहे तेही कुठल्याही भाई , दादा , तात्याच्या नादी न लागता. पुन्हा ” पाटील ” या नावाला वलय मिळवून द्यायचं असेल तर त्याशिवाय पर्याय नाहीच.इंद्रजित भालेराव सरांच्या कवितेतील एक ओळ कायम लक्षात ठेवुयात

” शिक बाबा शिक लढायला शिक कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक “…
– पवन खडके , औरंगाबाद. ९६८९३७७२७५

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *