इंदुरीकर महाराजांवर होणाऱ्या टिकेस शिवाजी जोरी यांचे उत्तर..

गेली वीस वर्षे झाली आहेत इंदोरीकर महाराज महाराष्ट्रभर किर्तनं करत आहेत.. महाराष्ट्रातील एक ही असा जिल्हा, तालुका नाही जिथं महाराजांचं किर्तन झालं नाही..

आजही दररोज ३ किर्तनं होतात अंतर जवळ असेल तर कधीकधी ४ कधी ५ ही किर्तनं झाली आहेत.. कित्येक वेळा महाराज सकाळी घरून कार्यक्रमासाठी निघालेत संध्याकाळी सातारा कोल्हापूर या भागात किर्तन आयोजित असते, पण त्याच वेळी काही अडचणी आल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आले.. तरीही तेथील लोकं महाराज एवढ्या लांब आपल्यासाठी आले हि भावना ठेवून मानधन देण्याचा मनापासून प्रयत्न करतात पण किर्तन न करता महाराजांनी एक रूपया ही कुणाचा घेतलेला नाही..

वीस वर्षापूर्वी महाराजांनी त्यांचं स्वतःचं इंदोरी हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गाव सोडलं आणि संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी राहण्यासाठी आले, तेथे स्वतः जागा घेऊन घर बांधलं आश्रम बांधला, गोरगरीब जनतेची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी, संत ज्ञानेश्वर बहूउद्देशिय वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, स्वखर्चाने शाळेची इमारत बांधली, तेथे १५/२० शिक्षकांची नेमणूक केली, त्यांचे मासिक वेतन हे आजही स्वतः महाराज हेच देतात.. आजही जे शिक्षण घेतात ते शंभर मुलं महाराजांच्या जवळ राहतात, त्यांच्या राहण्याची जेवणाची त्यांना लागत असलेल्या वही पुस्तक कपडे या सर्व गोष्टीचा खर्च महाराज हे स्वतः करतात..

आणि महाराजांवर टिका करणारे आतापर्यंत खुप झाले, जर खरंच कोण चुकीचं असेल तर जरूर आवाज उठवला पाहिजे, पण महाराजांच्या कार्यक्रमात, दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, आपल्या आई वडिलांना उतारवयात अपमानास्पद वागणूक देऊ नका, त्यासारखं मोठं पाप नाही.. तरूण मुलामुलींना पळून जाऊ नका, आजकाल अनेक भागात या गोष्टीचं प्रमाण वाढलंय हे महाराज सांगत असतात..

मुलगा मुलगी प्रत्येक माणसाला असते, मुलगी हि एक दिवस लग्न होऊन सासरी जाणार आहे त्यामुळे मुलीचे लाड करा पण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील माणसं आहोत, हे ध्यानात ठेवा मुलीला पाच हजाराचा ड्रेस घ्या पण मुलीला अंग झाकून कपडे घ्या.. तसेच सुनबाई आणि सासुबाई यांच्यामध्येही सुसंवाद रहावा प्रेमाने घरात एकी रहावी घरात वाद नको, ह्या सारख्या असंख्य गोष्टी महाराज आपल्या प्रबोधनात विनोदाची झालर लाऊन सांगतात.. मग ते कूणाला पटो किंवा न पटो.. आजही महाराजांच्या कार्यक्रमाच्या तारखा पुढील दोन वर्षे तरी मिळत नाहीत, यावरूनच त्यांची लोकप्रियता आहे की नाही हे समजते.. आणि महाराष्ट्रातील अन्य महाराज आहेत त्यांच्याही पेक्षा कमी मानधन घेऊन महाराज किर्तन करतात.. किमान पैशासाठी तरी कधी कुणाची अडवणूक केलेली मी तरी २००२ पासून पाहिले नाही..

लिहीण्यासारखं खुप आहे, पण लाईक मिळवण्यासाठी न लिहीता सत्यपरिस्थिती जाणून योग्य लिहीण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक योग्य होईल.. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथं आपण कुणावरही टिका करण्याच्या आधी, समाजात आपलं स्थान काय..? सामाजिक कार्यात आपलं योगदान काय..? आपल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी काय आहे का..? आपण कधी कुणावर परोपकार केला का..? हे ही तपासून बघायला हवे.. नाहीतर अनेकजण इथे अक्कल शिकवण्यातच व्यस्त रहायचे..

बारामती फेस्टीवल सन २०१२..

-शिवाजी जोरी

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *