टिपू सुलतान खरंच स्वातंत्र्यसेनानी होता का? मालोजी जगदाळे यांचा माहितीपूर्ण लेख..

Tipu Sultan – The Imprecise Hero #नेपोलियन_जॉर्जवॉशिंग्टन_मराठे_कॉर्नवॉलीस

चार्ल्स कॉर्नवॉलीस हा अवलिया त्रिखंडात लढलेला मनुष्य होता,जगभरातील महान सेनानींशी लढण्याची अथवा बरोबर काम करण्याची त्याला संधी मिळालेली. अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन सोबत लढताना १७८२ साली याला पराभव स्वीकारावा लागला, भारतात आल्यावर दक्षिणेतील राजकारणासाठी त्याचा महादजी शिंद्यांशी संबंध आला. १७९२ साली मराठ्यांनी याच्यासोबत आघाडी करत टीपू सुलतान चा पराभव केला, १८०२ साली कॉर्नवॉलीस ने नेपोलियन सोबत फ्रांस मध्ये अमेंस चा तह घडवून आणला.

टीपू आणि आंतरराष्ट्रीय राजकारण : टीपू विरुध्द युद्धात इंग्रज आघाडी करून उतरले याला कारण फ्रेंच राजकारण. फ्रेंचांनी अमेरिका,ऑस्ट्रिया,स्पेन,मॉरीशस अश्या अनेक ठिकाणी इंग्रजाविरुद्ध आघाड्या उघडल्या . अमेरिकेत जॉर्ज वॉशिंग्टन सोबत ते इंग्रजांविरुद्ध लढले, भारतात तर फ्रेंचांना आघाडी करण्यासाठी टिपू सारखा मुरब्बी सेनानी लाभला.फ्रांस चा राजा लुईस याने आणि नंतर नेपोलीयन ने सुद्धा टिपू ला मदत देण्याचे मान्य केले होते.हे मुख्य कारण आणि अनेक कारणे यामुळे इंग्रजांना टिपू शी कधीना कधी लढावे लागणारच होते. मराठ्यांविरुद्ध च्या लढाई साठी मदत मिळावी म्हणून त्याने आपले वकील तुर्कस्तान,अफगाणिस्तानात पाठवले. नेपोलियन नेही टिपू ला इंग्रजांच्या विरुध्द लढण्यास इजिप्त मधून १५०००० सैन्याची मदत देण्याचे कबूल केले होते , पण नाईल च्या युद्धात पराभव झाल्याने ते होऊ शकले नाही .

टीपू आणि मराठे : टीपू च्या बापाने म्हणजे हैदर अली ने १७७२ च्या शांततेच्या तहानंतर सुद्धा मराठ्यांचा कृष्णा आणि तुंगभद्रे च्या मधला भूभाग १७७४ आणि १७७८ साली बळकावला होता, जो टीपू ने गादीवर आल्यावर द्यायला नकार दिला. मराठ्यांशी आणि इतरांशी केलेले तह वारंवार मोडल्याने ‘विश्वासघातकी’ शासक अशी टिपू ची ओळख बनली.सुलतान-उत-तारीख या आपल्या डायरीत टिपू ने तुकोजीराव होळकरांचा उल्लेख ‘सर्वात मोठा नालायक’ असा केलाय तर पेशव्यांना ‘हरामखोर’ म्हंटले आहे. टिपू च्या अश्या धोरणाने दक्षिणेतील स्थिती इतकी अस्थिर झाली कि महादजी शिंदे,तुकोजी होळकर,मुधोजी भोसले यांना उत्तरेच राजकारण सोडून टिपू प्रकरणात हात घालावा लागला. इकडे पुणे आणि सातारा येथून हि पेशवे आणि छत्रपतींकडून टिपू वर मोहीम काढण्यासाठी आदेश निघाले .

१७९२ आणि १७९९ साली झालेल्या तिसऱ्या आणि चौथ्या मैसूर युद्धात मराठ्यांनी भाग घेतला.कॉर्नवॉलीस च्या नेतृत्वाखाली झालेल्या तिसऱ्या युद्धात टिपू चा मोठा प्रदेश मराठे,इंग्रज आणि निजामाला मिळाला तर चौथ्या युद्धात वेलस्ली च्या नेतृत्वात सैन्याने जोरदार मुसंडी मारत श्रीरंगपट्टनं जिंकले या निकराच्या लढाईत टिपू चा मृत्यू झाला.

टिपूला संपवून मराठ्यांनी कोणतीही चूक केली नाही हे नमूद करावेसे वाटते. पेशव्यांना बर्याचदा यात दोषी धरतात, पण टिपू चे राजकारण हे उत्तरेतून दक्षिणेत आले. या प्रकरणात जास्त पुढाकार महादजी शिंदे यांनी घेतला,त्यांनी मॅकफ़र्सन आणि कॉर्नवॉलिस या दोन्ही जनरल्स ना टिपू विरुद्ध पुण्यातर्फे हालचाल करण्यास भाग पाडले, जे गरजेचेही होते.

ब्रिटिशांशी युद्ध करणे टिपू साठी निरुपाय होता,राष्ट्रप्रेम नव्हते. याच टिपू आणि हैदर अली ने १७६९ साली इंग्रजांशी करार केलेला,जर मैसूर वर भविष्यात मराठ्यांकडून आक्रमण झाले तर इंग्रज टिपू ला मदत करतील असा.

उत्कृष्ठ सेनानी : सेनानी म्हणून टिपू ची कारकीर्द वाखाणण्याजोगी होती. आक्रमक,मुत्सद्दी आणि आधुनिक युद्धशैली मुळे टिपू ने मराठे,निजाम आणि इंग्रजांच्या विरुध्द अनेक युद्धे जिंकली . इंग्रजांना रॉकेट च्या हल्ल्याने चकित करत आर्थर वेलस्ली (वेलिंग्टन),कॉर्नवॉलीस सारख्या जागतिक दर्जाच्या योद्ध्यांना ही माघार घ्यायला लावली.रॉकेट च्याअविष्काराचे श्रेय हैदर आली आणि टिपू ला द्यायलाच हवे.

धर्मांध आणि असहिष्णू टिपू :

सुलतान-उत-तारीख या आपल्या डायरीत टीपू कुर्गी लोकांचा उल्लेख ‘Whore Sons’ असा करतो.
मीर हुसेन किरमानी हा टीपूचा इतिहासकार म्हणतो ‘१७८८ साली त्याने कुर्ग आणि कालिकत वर मोहीम काढली त्यात सुमारे ६०,००० सैन्य होते. कुर्ग मधली कुशालपुरा,तालकावेरी,मडिकेरी मधली अनेक गावे जमीनदोस्त करण्यात आली.थलीपराप्पू ,त्रीचम्बरम सारखी अनेक मंदिरे पाडण्यात आली, मडिकेरी येथील प्रसिध्द ओमकारेश्वर मंदिरास क्षती पोचू नये म्हणून त्याच्या कळस काढून त्याऐवजी घुमट लावण्यात आला. भगवती मंदिरा सारखी अनेक मंदिरे कायमस्वरूपी झाकण्यात आली.विल्यम लोगन च्या मलबार मन्युएल आणि लुईस रैस च्या मैसूर ग्याझेटियर मध्ये टीपू ने सुमारे ८००० मंदिरांना उपद्रव केल्याचे म्हंटले आहे.

कुर्ग मधील सुमारे ३०,००० पेक्षा जास्त लोकांचे जबरदस्ती धर्मांतर करण्यात आले, याचा उल्लेख टीपू ने कर्नूल चा नवाब रणमस्त खान याला लिहिलेल्या पत्रात केला आहे.आजही हे लोक कुर्ग मध्ये ‘कोडावा मापीलाज’ (कुर्गी मुस्लीम) म्हणून ओळखले जातात. कालीकत ची अवस्था सर्वाधिक भयावह होती, बर्थोलुम्यू या जर्मन प्रवाश्याने लिहिलेल्या ‘Voyage in East Indies’ या प्रवासवर्णनात याचे उल्लेख आलेत “टीपू साहेब ची ३० हजार माणसे फक्त कत्तल करण्यासाठी पुढे चालत होती त्यामागे टीपू स्वतः हत्तीवर आणि मागे पुन्हा ३० हजार सैन्य असा लवाजमा होता.चौकाचौकात फासावर लटकवलेल लोक दिसत होते, अनेकांचे धर्मांतर केले,नकार देणार्यांना मारण्यात आले. अनेकांना नंग्न करून हत्तीच्या पायाला बांधण्यात आले.युद्धबंदी स्त्रिया सैनिकांना देण्यात आल्या”

टिपूची अंगठी- वेलस्ली च्या नोंदीनुसार आणि ज्या ऑक्शन हाऊस कडे हि ‘राम’ कोरलेली अंगठी आहे त्यांच्यानुसार हि अंगठी टिपू च्या बोटात नसून त्याच्या पॅलेस मध्ये केलेल्या लुटीत मिळाली आहे.

टिपूची श्रींगेरी मठावरील श्रद्धा – टिपू च्या कारकीर्दी साठी शतकोट चंडी यज्ञ मठातर्फे केला गेला.या यज्ञानंतर टिपूला प्रचंड यश प्राप्त झालं. त्यामुळे टिपू ची मठावर प्रचंड श्रद्धा होती.मराठ्यांनी संतापाच्या भरात जरी हा मठ लुटला असला तरी याची नंतर पूर्ण भरपाई मराठ्यांनी केली.

काही मंदिरांना वर्षासन देऊन हजारो मंदिरे टिपू पाडत असेल तर औरंगजेबालाही सहिष्णू राजा म्हणायला काही हरकत नाही,त्यानेही हजारो मंदिरांना वर्षासने,इनामे दिली होती. अफजल खानाने वाई तील मंदिरांना वर्षासने दिल्याची पत्र आहेत,म्हणून दक्षिण भारतात शेकडो मूर्ती तोडणारा ‘बुत शिकन’ अफझलखान हा सहिष्णू शासक असू शकतो का ?

टिपूची एकंदर वादग्रस्त कारकीर्द पाहता सम्राट अकबर (उत्तरकालीन) , दारा शुकोह आणि इब्राहिम आदिलशाह (1556-1627) या सहिष्णू मुस्लिम राजांशी तुलनेत टिपू कुठेच बसत नाही. शिवरायांशी तुलनेचा तर विचारच नाही होऊ शकत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *