वशानं आईची ओळख नवीन मोलकरीन अशी करुन दिली… म्हतारी जागेवरच कोसळली..

वशा(वसंत) हा गरीबीतुन आलेला..वश्या लहान असतानाच बाप वारला..आईनं मोल -मजुरी करून वश्याला शिक्षण दिलं.. वश्यानं आईच्या कष्टाच चिज केलं वशा मुंबईत नोकरीला लागला. रोज आईला फोन करायचा..मुंबैतच वशान पोरगी बघीतली आण एका चर्चमधी लग्नही केलं. आईला भेटायला गावी आला. परधर्माची पोर केली म्हणुन भावकीनं कालवा केला…वश्याची आय मात्र वशाच्या बाजुनं ठाम होती.. गावकुसाला पाचटाच्या सपरात राहनारी साधी म्हातारी ती..नंतर हा मुंबईत गेला तो कायमचाच..आईला फोन येनही हळु हळु बंद झालं..गावातली माणसं सांगायची वशानं ममयला फलाट घेतलाय..वशानं पांढरी गाडी घेतलीय ..म्हतारी भरुन पावायची..भैरुबाला निवद- नारळ करायची ..रैवारचं सव्वापावशेर गोडत्याल देवळातल्या समईत वतायची..परटाच्या रखमाचा भाऊ वश्याच्या शेजारीच रहायला असल्यानं रखमा माहेरी गेली की खबर आणायची वशाच्यी खुशाली सांगायची..

अशीच परवा रखमानं बातमी दिली वश्याच्या बायकुला दिवस गेल्यात..म्हतारी लय हराकली..वश्याला भेटायला आण सुनच बाळातपण करायला जायला पाहीजेल अस म्हणाय लागली..सुन खडुस तिला म्हतारी ऊंबर्याच्या आत आलेली चालायची नाय..जाऊ का नकु ह्याच इचारात आठवडा गेला..एक दिवस पहाटं म्हतारीला सपान पडलं..एक बाभळीच्या खोडाईतका जाड साप एका बारक्या पोराला गिळतोय।.पोरगं वराडतय..पाय गिळलेत..पण हात बाहेर लोंबलेत..पोरगं सुटायची धडपड करतय..साप पोराला गिळतोय…म्हतारी झोपतुन खडबडुन ऊठली..तोंडाला कोरड पडली..घामानं भिजली..

सकाळची किसनाआप्पाकडनं ऊसनं पैसं घेऊन मंबैला वशाकडं जायला निघाली..मंबैला वशाचा पत्ता सोधीत दारात पोचली..वशा घरीच होता आईला बघुन घडीभर त्याचा चेहरा ऊजळला..आतनं त्याची बायकु आली आण म्हतारीला बघुन वराडलीच..वशान कशीतरी समजुत काढली आजच्या दिवस आईला राहुन द्यायला राजी केली..

रात्री ८ वाजता वशाच्या घरी पार्टी होती..माणसं गोळा झाली..म्हतारी आतल्या दारातुन सगळ कौतुकानं बघतीय.. वशानं आईची ओळख नवीन मोलकरीन अशी करुन दिली… म्हतारी जागेवरच कोसळली..

लेख – आनंद नामदेव कोकरे

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *