दिवाळीचे अभ्यंगस्नान कसे करावे आणि उटणे लावण्याचे फायदे…

आपल्या शरीराची तिळाच्या तेलाने मालिश करावी. मालिश केल्यानंतर व अभ्यंग स्नान करण्यापूर्वी ३० मिनिटांकरिता वाट पहावी. यामुळे तेल आपल्या शरीरात संपूर्ण जिरून जाईल. स्नानाच्या वेळी आपल्या पूर्ण शरीरावर उटणे लावून चांगल्याप्रकारे घासून घ्यावे. उटणे वाळल्यानंतर पाण्याच्या सहाय्याने ते काढून घ्यावे. भरपूर लोक उटणे लावल्यानंतर साबणाचा वापर करत नाही, परंतु आपल्याला हवे असेल तर आपण साबणाचा वापर करू शकता.

उटण्याचे शरीराला होणारे फायदे काय आहेत पाहूया…
त्वचा स्वच्छ करते

उटण्यामधील आयुर्वेदीक घटकांमुळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी अ‍ॅक्ने, पिगमेंटेशन, स्कार्स कमी होण्यास मदत होते. यामुळे सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेंब मिसळणे फायदेशीर ठरते. आठवड्यातून एकदा उटण्याचा वापर केल्याने त्वचा निरोगी होण्यास मदत होते.

नैसर्गिकरित्या चमक देते

उटण्यामध्ये रक्तचंदन, वाळा, चंदन, वेखंड, कात, नागरमोथा यासारख्या वनस्पती आणि खोडांचा वापर केला जातो. हे घटक त्वचेला स्क्रबर म्हणून काम करतात. यामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. याशिवाय उटण्याच्याबरोबरीने बेसन पीठही लावल्यास ते फायद्याचे ठरते. चंदनामुळे शरीराला थंडावा मिळतो.

चेहर्‍यावरील केसांची वाढ रोखते

चेहर्‍यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याची निवड करतात. उटण्याची पेस्ट चेहर्‍यावर गोलाकार दिशेने फिरवल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. महिनाभर हा प्रयोग केल्यास त्याचे निकाल अधिक स्पष्टपणे दिसून येतात. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. त्वचेचे सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याच्या सालीची पेस्ट व उटणं याचे एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहर्‍यावर करावा.

सुरकुत्या टाळणे शक्य

वयानुसार त्वचेला येणाऱ्या सुरकुत्या हे अतिशय सामान्य आहे. उटण्यामुळे सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते. हळदीमध्ये अ‍ॅन्टी एजिंग घटक असल्याने त्याचा त्वचेला फायदा होतो. त्वचा दीर्घकाळ तजेलदार आणि टवटवीत दिसते. याशिवाय उटण्यात मध किंवा दूध लावल्यास त्याचा जास्त फायदा होतो. मध मिसळल्यास त्वचा मुलायम होण्यास मदत होते.

सर्वांना दिवाळीच्या खासरेतर्फे शुभेच्छा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *