लाडका लक्ष्या – लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याविषयी त्यांच्या सहकाऱ्याने सांगितलेल्या या भन्नाट आठवणी

लाडका लक्ष्या – नाटक आणि सिनेमांमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालणारा लक्ष्मीकांत बेर्डे.अर्थात लहान,मोठया सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांचा लाडका लक्ष्या.
मी कॉलेजमध्ये शिकत असताना,एकदा लेखक वसंत सबनीस पुण्यात आले होते भरत नाट्य मंदिर येथे ते ‘बिघडले स्वर्गाचे दार’ हे नाटक पहायला जाणार होते,तिथेच मला त्यांनी भेटायला बोलावले.मला मनोमन आनंद झाला होता की एकतर माझ्या आवडत्या लेखकाला मला भेटता येणार होते आणि ‘बिघडले स्वर्गाचे दार’ मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे काम करीत असल्यामुळे माझ्या आवडत्या नटालाही प्रत्यक्ष पाहायला मिळेल म्हणून मी खुश होतो.त्यावेळी हे नाटक हाऊसफुल्ल गर्दी खेचत होतं,नाटकाच्या आधी अर्धा तास लक्ष्या मेकअप रूममध्ये आला तिथे वसंत सबनीस यांनी माझी आणि लक्ष्याचीओळख करून दिली.तेंव्हा माझे कर्तृत्व शुन्य असूनही,स्टार असलेला लक्ष्या माझ्याशी प्रेमाने बोलला आणि त्याच्याबरोबर फोटोही काढू दिला,लक्ष्या बरोबर झालेली ती पहिली भेट. नाटक संपल्यावर ,डोक्यावरील केसांचा जुपका उडवत,पायात सोनेरी रंगांच्या कोल्हापुरी चपला घातलेला,फॅनच्या जमलेल्या गर्दीतून वाट काढीत ऐटीत गाडीत बसणारा स्टार लक्ष्या आजही माझ्या स्मरणात आहे, पुढे लक्ष्या हिरो असलेल्या ‘गौराचा नवरा’ या चित्रपटात एका कोळी गाण्यात लक्ष्याच्या मागे गर्दीत मॉब आर्टिस्ट म्हणून उभं राहायची संधी मिळाली तेंव्हा मला कल्पना न्हवती की भविष्यात या स्टार हिरो बरोबर दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मला मिळणार आहे.

मी दिग्दर्शक झाल्यावर सुरवातीच्या काळात टेलिफिल्म मालिका करीत असताना,एका एपिसोडसाठी लक्ष्मीकांत बेर्डे यांनी माझ्याकडे काम करावे अशी माझी इच्छा होती त्यासाठी मनोरमा वागळे यांनी लक्ष्याला माझ्यासमोरच फोन केला आणि हक्काने सांगितले “लक्ष्या मी महेशला तुला भेटायला पाठवतेय, तुझ्यामागे मॉब आर्टिस्ट म्हणून काम केलेला धडपड्या मुलगा आहे तो, ,तू त्याला नाही म्हणू नकोस”.मी लक्ष्याला तो शुटिंग करीत असलेल्या ठिकाणी जाऊन भेटलो. त्याला सांगितलं पूर्वी मी कुठे भेटलो होतो ते.माझं सगळं ऐकून घेतल्यावर इतर कसलीच चौकशी न करता तो काम करायला तयार झाला. पुण्यात शुटिंगला येताना शुटला लागणारे कपडेही स्वतःचेच घेऊन आला.पुण्यात एका वाड्यात शुटिंग होतं. मनोरमा वागळे लक्ष्याच्या आई झाल्या होत्या आणि लक्ष्याच्या बहिणीला लग्नासाठी पाहायला पाहुणे आलेत असा सिन होता, सिनच्या वेळी मनोरमा वागळे दागिने घालून नटलेल्या पाहिल्यावर लक्ष्या पटकन चेष्टेने बोलला” पाहुणे मुलीला पाहायला आलेत की मुलीच्या आईला?त्याच्या हजरजबाबीपणामुळे मनोरमा वागळे आणि लक्ष्याची चेष्टा मस्करी सुरू झाली.त्यामुळे स्टार लक्ष्या बरोबर काम करताना कुठलेही दडपण आले नाही.

मनोरमा वागळे यांना लक्ष्या प्रेमाने ‘पॅनोरमा’म्हणून हाक मारायचा. आम्ही शुटिंग करत होतो त्यादिवशी क्रिकेटची मॅच होती,लक्ष्या क्रिकेटचा जबरदस्त फॅन,शुटिंगच्या मध्ये किती स्कोर झाला हे पाहण्यासाठी लक्ष्या वाड्यात राहणाऱ्या शेजारच्या घरी जाऊन टीव्ही बघायचा .त्या वाड्यातच राहणारे एक टीपीकल पुणेरी शेजारी होते,ज्यांना बहुतेक आमचं शुटिंग करणं आवडलेलं दिसत न्हवतं,सकाळपासून त्यांचा चेहरा त्रासलेला होता,त्यांना पाहून मुद्दामच लक्ष्याने त्यांना विचारले की काका मॅचचा स्कोर किती झाला? त्यावर आधीच त्रासलेल्या काकांनी वैतागून उत्तर दिले” टीव्ही बिघडलाय आमचा”. त्यावर लक्ष्या लगेच बोलला” तुमचा टीव्ही पण तुमच्या सारखाच दिसतोय”.लक्ष्याच्या या अश्या बोलण्यामुळे आम्ही पोटधरून हसू लागलो.शुटिंग संपल्यावर लक्ष्या त्या वाड्यातून बाहेर गाडीत बसेपर्यंत आमच्या नाकी नऊ आले. लक्ष्याला पाहायला प्रचंड गर्दी जमली होती ,बायका,लहान मुलं, वयस्कर सगळे ‘लक्ष्या लक्ष्या’ या एकेरी नावाने त्याला बोलवत होते,कारण प्रत्येकाला तो आपल्या हक्काचा आणि प्रेमाचा माणूस वाटत होता. पोलिसांना बोलावल्यावर त्यांच्या मदतीमुळे लक्ष्याला बाहेर पडणं शक्य झालं..

माझा दिग्दर्शक म्हणून त्याच्या बरोबर काम करण्याचा अनुभव खूपच आनंद देणारा होता,त्यानंतर ज्या,ज्यावेळी मी त्याला माझ्याकडे काम करण्यासाठी विचारले त्यावेळी कधीच तो मला नाही म्हणाला नाही की कधीच कसल्या अटी घातल्या नाहीत उलट शुटिंगला येताना शुटसाठी त्याला लागणारे कपडे दरवेळी स्वतःचेच वापरायचा आणि वर चेष्टा करीत म्हणायचा” अहो टिळेकर असा गडा सकट संभाजी तुम्हाला माझ्याशिवाय दुसरा कुणी मिळणार आहे का?”. दिवाळीनिमित्त एका विनोदी कार्यक्रमाचे शुटिंग आम्ही पुण्यात करीत होतो,त्यात विजू खोटे, अंकुश चौधरी,वर्षा उसगावकर हेही कलाकार होते, त्यात एका विनोदी स्किट मध्ये लक्ष्या भीक मागून श्रीमंत झालेला भिकारी दाखवला होता त्यात त्याला भिकाऱ्या सारखे कपडे घालायचे होते,ठिगळं लावलेला जुना शर्ट त्याला मी घालायला दिला,हातात एक कटोरा.पण कोणतेही आढेवेढे न घेता लक्ष्यानी ते कपडे घातले आणि त्या भूमिकेत धमाल आणली.

लक्ष्या बरोबर शुटिंग करणं म्हणजे दरवेळी फुल टाईमपास असायचा.,स्वतःचा शॉट नसेल तर तो कधीच मेकअप रूममध्ये जाऊन बसत नसे, किंवा माझा शॉट असेल तेंव्हाच मी बाहेर येईन असे नखरेही नसायचे,उलट काम असो वा नसो तो नेहमी सेटवरच थांबून टाईमपास करायचा,मध्येच विनोद करून,वातावरण हलकं फुलकं करायचा,एखादा विनोद सुचला तर समोरच्या कलाकाराला तो डायलॉगमध्ये घ्यायला सांगायचा.माझी पहिली मोठी सिरियल ‘अफलातून’ सुरू झाली तेंव्हा काही एपिसोड पाहून लक्ष्यानी आवर्जून मला फोन केला,एवढा मोठा नट असूनही स्वतःहून मला फोन करून माझे कौतुक केले,मी कुणी मोठा नट आहे याचा माज कधीच त्याने दाखवला नाही,अनेक कलाकारांना तो स्वतः काम करीत असलेल्या चित्रपटात काम मिळवून द्यायचा, एखाद्या भूमिकेत स्वतः पेक्ष्या दुसरा एखादा कलाकार योग्य असल्याचं निर्मात्याला सांगून त्या कलाकाराची शिफारस करायचा.

‘मोरूची मावशी’ हे नाटक आधी लक्ष्याला ऑफर झाले होते पण ‘विजय चव्हाण’ जास्त चांगलं काम करिन असं सांगून निर्मात्याला त्याने विजय चव्हाण मावशीच्या भूमिकेसाठी योग्य असल्याचे पटवून दिले.हिंदी चित्रपटात काम मिळू लागल्यावरही त्याने मराठीकडे पाठ फिरवली नाही. त्याच्याशी कामासंबंधी बोलताना, डेट्स घेण्यासाठी मला कधीच त्याच्या’मॅनेजर’बरोबर बोलावे लागले नाही.मला गमतीने नेहमी”अहो टिळेकर’ अशीच हाक तो मारायचा.मी कधीच शुटिंगच्या दिवशी सकाळी आणि दुपारी जेवणात नॉन व्हेज देत नाही, म्हणून कधीच त्याने तक्रार, कुरकुर केली नाही.

माझ्या पहिल्या ‘आधार’ सिनेमात लक्ष्या एका विनोदी भूमिकेत होता.शुटींगसाठी डेट्स घेण्यासाठी मी जेंव्हा फोन करून त्याला सांगितले की मला त्याचे जास्त दिवस लागतील शुटला.ते ऐकून शांत बसेल तो लक्ष्या कसला त्याने लगेच गंमतीने मला विचारले” अहो टिळेकर ,आपण मराठी चित्रपट करतोय की मुगले आझम?”. शुटिंगला आल्यावर त्यानेच आणलेल्या दोन पॅन्ट कमरेत खूपच सैल होत होत्या, त्याची कपड्यांची बॅग बायको प्रियाने भरली होती म्हणून लक्ष्याने बायको प्रियाला फोन वरून विचारलं”प्रिया,माझ्या पँट ऐवजी चुकून तू तुझ्या पॅन्ट दिल्यात की काय?”.माझ्या ‘आधार’चित्रपटात अक्षय कुमारने काम केल्यावर लक्ष्यानी न विसरता माझं अभिनंदन करायला फोन केला होता, माझ्या चित्रपटात काम केल्यानंतर काही महिन्यांनंतर पुन्हा एकदा माझ्याकडे एका टीव्ही जाहिराती मध्ये लक्ष्याने काम केले.

पुढे सिनेमांमधून तो कमीच दिसू लागला पण काही काळ गेल्यानंतर ‘लेले विरुध्द लेले’ या नाटकांमधून पुन्हा प्रेक्षकांच्या समोर तो आला. पण काळ बदलला होता .पुण्यात टिळक स्मारकाला त्याच्या नाटकाच्या प्रयोगाच्या वेळी माझी आणि त्याची भेट झाली,त्याला पाहिल्यावर कुठेतरी नेहमीप्रमाणे लक्ष्यात दिसणारा सळसळता उत्साह आणि चेहऱ्यावरील तेजही कमी दिसत होते.त्या दिवशी नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसादही जेमतेम होता,ते पाहून मनात विचार आला आता पुन्हा एकदा एका ‘हिट’ची लक्ष्याला खूप गरज आहे पण तसे काही झाले नाही पुढे काही महिन्यातच लक्ष्मीकांत बेर्डे हॉस्पिटलमध्ये असल्याचा आणि तो फारसं कुणालाही भेटत नसल्याच्या बातम्या कानावर येऊ लागल्या. तो कधी एकदा लवकर बरा होईल आणि मला त्याला भेटायला मिळेल याची मी वाट पाहू लागलो.

काही दिवसांनी मी त्याला फोन केला तेंव्हा लोणावळ्याला तो विश्रांतीसाठी आल्याचे त्याने सांगितले आणि मला भेटायलाही बोलावले. मी भेटायला गेलो तेंव्हा मनात एकसारखा विचार येत होता लक्ष्या नक्की बरा झाला असेलना?तेवढ्यात “अहो टिळेकर” अशी हाक आली मी पाहिलं तर समोर आजारपणामुळे अशक्त झालेला लक्ष्या, माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसला नाही, पण त्याच्या बोटातील बालाजीच्या अंगठीमुळे माझी खात्री पटली की हा खरंच आपला ‘लक्ष्या’आहे.मला तो म्हणाला”आपल्या फिल्म इंडस्ट्री मधल्या कुणालाच मी या अवस्थेत भेटत नाही,भेटलो तर माझी अवस्था पाहून आपल्याच इंडस्ट्री मधले लोक लगेच माझे एपिसोड लावतील आणि बातम्या पसरवतील,इथं आल्यापासून तूच पहिला आहेस ज्याला भेटतोय मी”. लक्ष्याच्या अश्या बोलण्याने क्षणभर काय बोलावे तेच सुचले नाही. सिनेमाक्षेत्रातील काही लोकांचे पडद्यामागचे ‘खरे मुखवटे’ पडत्या काळात जवळून पाहिल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. मी नवीन चित्रपट करतोय ते सांगितल्यावर तो खुश झाला,”मी लवकरच बरा होऊन पुन्हा तुझ्याकडे काम करणार आहे,असं विश्वासाने त्याने सांगितलं आमच्या तासभर गप्पा झाल्या.मी नमस्कार करून आशीर्वाद घेतला.

त्या भेटीनंतर दोन एक आठवड्यातच एका सकाळीच ‘लक्ष्मीकांत बेर्डे’ गेल्याची बातमी समजली, पुण्याहून मुंबईला त्याच्या घरी पोचेपर्यंत उशीर झाला आणि लक्ष्याचे शेवटचे दर्शनही होऊ शकले नाही म्हणून दुःखही झाले पण एक मन म्हणत होते मराठी चित्रपटात खऱ्या अर्थाने हिरोला चांगले कपडे घालण्याची फॅशन ज्याच्यामुळे सुरू झाली त्या स्टायलिश’हिरो’ला आणि नेहमी इतरांना हसवणाऱ्या लक्ष्याला कायमचा शांत झालेला कदाचित आपल्याला पाहणे जास्तच क्लेशदायक झाले असते.
त्याला जाऊन दोन वर्ष झाल्यावर त्याला ‘श्रद्धांजली’म्हणून नाही, पण त्याने मला केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून मी ‘लाडका लक्ष्या’या नावाने एक कार्यक्रम केला ,त्यात लक्ष्याच्या चित्रपटातील गाणी, नृत्य,लक्ष्याची कारकीर्द कशी घडली त्याची माहिती कार्यक्रमातून सादर झाली, कार्यक्रमाला लक्षाचे कुटुंब, नातेवाईक,चाहते मोठया संख्येने उपस्थित होते, ते पाहून वाटले ही गर्दी पहायला लक्ष्या आपल्या आजूबाजूला असेल कुठेतरी आणि नेहमीप्रमाणे येऊन काहीतरी गंमत करेल आणि आश्चर्य म्हणजे ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होता त्या मुंबईतील यशवंत नाट्यगृहात ज्या दिवंगत कलाकारांचे फोटो लावले होते त्यात लक्ष्या एक हसरा फोटो होता, म्हणजे कुठूनतरी ‘लक्ष्या’ त्याच्यावर केलेला कार्यक्रम पहात होता. त्या कार्यक्रमात लक्ष्याबरोबर काम केलेल्या कलाकारांनाही मी बोलावले,विजू खोटे, विहंग नायक,वर्षा उसगावकर,प्रिया बेर्डे, रेणुका शहाणे, किशोरी अंबिये, विजय चव्हाण हे आवर्जून उपस्थित होते बाकी सगळे ‘भयंकर’ बिझी होते त्यामुळे कदाचित आले नसावेत.

काही सहकलाकारांनी लक्ष्याच्या अनेक आठवणी सांगितल्या.याच कार्यक्रमासाठी लक्ष्या बरोबर काम केलेल्या एका प्रसिध्द कलाकाचा लक्ष्या बद्दलच्या आठवणी सांगणारा एक व्हिडिओ बाईट घेण्यासाठी मी गेलो, या प्रसिद्ध कलाकाराला मी आधी कल्पना दिली होती की हा कार्यक्रम ई टीव्ही मराठी चॅनेलवर दाखवला जाणार आहे.ठरलेल्या वेळी मी तिथे पोचल्यावर त्या प्रसिध्द कलाकाराने तो फोटो शूट मध्ये बिझी असल्यामुळे मला तासभर थांबायला लावले त्यानंतर ते मोकळे झाल्यानंतर मी कॅमेरा ,कॅमेरामन रेडी झाल्यावर त्यांना बाईटसाठी बोलावले तेंव्हा लक्ष्या बद्दल बोलायच्या आधी त्यांनी मला विचारले की कोणत्या चॅनेलवर हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे,मी त्यांना सांगितले ई टीव्ही साठी. त्यावर त्यांनी मला सांगितले की त्यांचा एक शो झी टीव्ही वर येतोय त्यामुळे त्यांना बाईट देता येणार नाही.खरंतर मी त्यांना सुरवातीला फोन करून विचारले तेंव्हा कोणत्या चॅनेलसाठी बाईट आहे,याची कल्पना दिली होती तरी अभिनयात सगळ्यांचा महागुरू असलेला हा प्रसिद्ध कलाकार ऐनवेळी पलटला. खरं तर एखाद्या गेलेल्या कलाकाराच्या बद्दल चार शब्द बोलायला चॅनलची परवानगी घ्यावी लागते हे मला आजही’खरं’ वाटत नाही.खरा एकच होता-प्रेक्षकांचं खरं खुरं मनोरंजन करणारा सगळ्यांचा खरा ‘लाडका लक्ष्या’.
– महेश टिळेकर (मराठी तारकाकार म्हणून प्रसिद्ध, दिग्दर्शक निर्माते)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *