पक पक पकाक मधील भुत्याचे आयुष्य खऱ्याखुऱ्या आयुष्यात जगणारा कुडाळमधील घावनळे गावचा भुत्या…

डॉ बापू भोगटे यांच्या सौजन्याने

अमावास्येची रात्र… संपूर्ण गावात सन्नाटा… एक दहशत पूर्ण गावावर पसरलेली… हि दहशत असते भुताची.. अमावास्येच्या कुंद थंड काळोखासारखीच प्रत्येकाच्या मनावर पसरलेली, मनात खोलवर भिनलेली!!!

आणि एका छोट्या मुलाच्या खोडकरपणामुळे समोर येते या “भुता”ची कहाणी ! भूत्या !! समाजाच्या उपयोगी पडणारा एक निष्णात वैद्य… पण समाजाच्याच काही मुजोर घटकांमुळे घर-दार, बायकामुलं, इतकंच नव्हे, तर जिवंत मनाचं अस्तित्वही गमावलेला ! जगापासून दूर जंगलातल्या अंधाऱ्या भागाचा हिस्सा बनलेला, लोकांच्या भीतीचा विषय झालेला एक अभागी माणूस आपल्या समोर उलगडत जातो. भुताचं जीवन जगणं हे माणसाचं आयुष्य जगण्यापेक्षा अधिक सुखाचं मानणारा, त्या आपल्या जगातच मनोमन रमणारा…

काही वर्षांपूर्वी मराठीत नाना पाटेकरने साकारलेला हा “पक पक पकाक” चित्रपटातला हा भूत्या मनात घर करून बसला होता. त्या घरातून तो पुन्हा एकदा बाहेर आला कालच्या सर्वपित्री अमावास्येच्या भयाण मध्यरात्री!

कुडाळपासून काही किलो मीटर अंतरावर असलेले घावनळे हे गाव.तिथल्या आडरानातील निरव शांत स्मशानात जात आम्ही त्याच्या नावाने हाक दिली. त्यानेही शेडच्या आतून त्वरित प्रतिसाद दिला. जरा वेळाने तटकीवजा दरवाजा उघडून बसलेल्या अवस्थेत त्याने दरवाजा उघडला. थकलेले, पण तरीही आम्हाला बघून सुखावलेले डोळे, चेहऱ्यावर खोलवर उमटलेले हास्य, आणि या भेटीसाठी आतुरलेला उत्साह याच्यासकट त्याने आमचे स्वागत केले.

स्मशानात उभ्या केलेल्या शेडमधून तो वाकून पार्श्वभाग घसटतच तो आपल्या अंगणात येऊन बसला. अंगण? धगधगत्या चितेसमोरच चार पावलांवरची साफ केलेली जागा हेच त्याचं अंगण! त्या अंगणातच चटई टाकून त्याच्यासोबत आम्ही चार जण गप्पा मारायला बसलो. एरवी एखाद्याला स्मशानापर्यंत पोचवायला चार जण लागतात, इथे स्वतः स्मशानात येऊन बसलेल्या माणसासोबत जगण्याची चर्चा करायला आम्ही आलो होतो. सगळंच विपरीत!!

हा सगळा कार्यक्रम आखला होता तरुण भारतचे डॅशिंग पत्रकार शेखर सामंत यांनी. शेखर हे कदाचित या सगळ्या “समानशीले व्यसनेशु सख्यम्” मधून मैत्री अधिकच गडद झालेले आमचे मित्र! काहीतरी वेगळं शोधण्याचा सततचा छंद असलेला, जग आपल्या स्वतःच्या नजरेतून शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारा हा तरुण उमदा पत्रकार! त्यातूनच रात्रीची जंगलभ्रमंती असो, साहसी क्रीडा असो किंवा मालवणी साहित्याचा आनंद देणारा मिरगोत्सव असो, शेखर सामंतांचा सहभाग मनापासून असतो. हल्ली जम्मू काश्मीरचा धाडसी अभ्यासदौराही त्यांनी याच उत्साहाने पेलला.

त्यांच्या “या” कार्यक्रमात माझ्यासह डॉ बापू भोगटे, आणि आपल्या आवडत्या छायाचित्रणाचा छंद सगळ्या स्थितीत आणि कुठल्याही परिस्थितीत सांभाळणारे छायाचित्रकार श्री बाळ हरमलकर असे आम्ही नेहमीच्या उत्साहानेच सामील झालो. डॉ बापू भोगटे हे सगळे धार्मिक रीतीरिवाज, रूढीपरंपरा, गावरहाटी जाणणारे. पण, अर्थातच त्यामागच्या वैज्ञानिक धारणा तपासून त्याची धर्मकारण आणि गावरहाटी यांच्याशी सांगड घालणारे. जंगलभ्रमंती, किल्ले परिक्रमण असे रांगडे शौक जपणारे. एकवेळ बायकोपेक्षाही अधिक बंदुकीशी प्रेमसंबंध जपणारे हे व्यक्तिमत्व!

शेखर सामंत यांनी हा कार्यक्रम अगदी सर्वपित्री अमावास्येचा मध्यान रात्रीचा मुहूर्त पाहूनच ठरवलेला. शेखर हे भूतं खेतं, आत्मे यावर काडीचा विश्वास नसलेले. पण बापू आणि मी मृत्यूनंतर एक जग असतं, यावर विश्वास ठेवणारे! अनुभव घेणारे, आणि ते शास्त्रीय पातळीवर घासून पाहणारे! आणि आमची स्वत:ची एक विशिष्ट बैठक जपणारे!

पण अलीकडच्या चर्चेतून एका गोष्टीवर मात्र आमचे एकमत झाले होते, कि श्राद्ध हा विषय अभ्यासाचा, ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा असला, तरी त्याहूनही अधिक तो अवास्तव अवडंबराचा होत आहे. जिवंत माणसांना कष्टात जीवन घालवायला लावायचे, त्यांच्या वेळेवर गरजांचे, खाण्यापिण्याचे हाल करायचे आणि मेल्यानंतर त्यांच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी गावात जेवणावळी उठवायच्या हा प्रकारच मुळात न पटणारा! जिवंत माणसांच्या भावना, वेदना, सुखदुःख समजून घेणे, त्याच्याशी समरस होणे, त्यांना आपुलकीचा, सहकार्याचा हात पुढे करणे हा आपल्या पितरांना सुखावणारा सगळ्यात जवळचा मार्ग असू शकतो, यावर आमचे सगळ्यांचेच प्रॅक्टिकल एकमत नेहमीच होते.

आणि या सगळ्यामधूनच सर्वपित्री अमावास्येच्या मध्यानरात्री घावनळे गावच्या स्मशानात मागची तीस वर्षे आपल्याच कैफात सुखाची व्याख्या बदलून राहणाऱ्या या सिंधुदुर्गातील “भूत्या”सोबत आपलाही काही काळ घालवायचा कार्यक्रम आखला गेला. खरं तर, साधारणतः आठ वर्षांपूर्वी शेखर सामंतानीच या भुत्याची मुलाखत घेऊन त्यांना प्रकाशात आणले होते. आज पुन्हा आठ वर्षानंतर त्या सगळ्या परिस्थितीत काय फरक पडलाय हे त्यांना पाहायचे होते. त्याच्यासोबत काही काळ घालवून नवविचारांचा “शिळा म्हाळ” वेगळेपणाने घालवायचा होता.

रात्री उशिराच आम्ही त्या स्मशानात प्रवेश केला. ढणढणत्या चितेवरच्या प्रकाशाचा भडक लालसरपणा दारातल्या “त्या” च्या शेडवर पडला होता. त्याला हाक मारताच आतून ओ म्हणून प्रतिसाद मिळाला खरा, कोण म्हणून आतून चौकशीही झाली, ओळखीच्या खुणा पटल्या, पण तरीही दरवाजा उघडायला अंमळ वेळच लागला. काही वेळाने आतून बांधलेला तटकीवजा दरवाजा उघडला. दरवाजात खाकी अर्ध्या चड्डी घातलेला, वर उघडा बोडका असा एक वृद्ध माणूस दरवाजात बसलेला होता. आम्ही आधी दरवाजातच त्याच्या जेवणाखाण्याची चौकशी केली. तब्येतीची चौकशी केली. शुभ्र पिकलेल्या दाढीमागच्या खोल गेलेल्या, पण चमकत्या डोळ्यात अस्पष्ट हासू पसरले.

कालच्या सर्वपित्रीनिमित्त अनेक ठिकाणी पितरांच्या रूपाने गायी, कावळे पोट तटतटून तृप्त झाले असतील. पण जिवंत माणूस मात्र मानवी आयुष्याच्या या विरोधाभासाला हसत स्मशानात अर्धपोटी पहुडला होता. चेहऱ्यावर ना खेद ना खंत अशी विरक्त भावना.

या भुत्याच नाव होतं चंद्रकांत लाड. हा माणूस मूळचा देवगड तळेबाजार इथला. कलेच्या प्रांतातला हा एक अवलीयाच होता. राहणं, बोलणं, वागणं सगळंच रुबाबदार. चित्रकार म्हणून हा अतिशय प्रसिद्ध माणूस. अनेक जुन्या घरांच्या भिंतीवर याने काढलेली चित्रे त्या काळात दिमाखात मिरवत होती. सगळं काही सुखात चाललेलं होतं. पेंटिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून मुंबईत पण काही वर्षे त्यांनी घालवली.तिथेच एका ख्रिश्चन मुलीच्या प्रेमात पडला आणि तिच्याबरोबर लग्नही केलं. घरात वादविवाद झाले, बाहेर पडावं लागलं. संघर्षाचं जगणं सुरु झालं. आता नियतीनेही त्याची कठोर परीक्षा घ्यायला सुरुवात केली. जीच्यावरच्या प्रेमापोटी हा सगळा संघर्ष स्वीकारला, ती पत्नीही एका आजारात अचानक जग सोडून गेली. तिचे जपून ठेवलेले मंगळसूत्र हीच काय ती आता सोबत उरली होती.

आणि त्याचवेळी चंद्रकांतलाही काविळीने घेरलं. सगळ्या देहाला सूज चढली. त्यातच पावसाचे दिवस. घराचा आधार नाही. एरवी, अनेक घरांच्या भिंतींनी याच्या चित्रकलेचा स्वीकार केला होता. त्यातील एकाही घराने त्याला उभे राहायला अंगण दिले नाही, विसवायला ओसरी दिली नाही. प्रत्येकाच्या लेखी हा माणूस मरणाच्या दारात होता, अवघ्या काही दिवसांचा सोबती होता. कोणीही त्याला आपल्या दारात मरायला द्यायला तयार नव्हते. सगळीकडे हडतुड सुरु झाली. त्याच्यावर औषधोपचाराची जिम्मेदारी तरी कोणी घ्यावी? हा कुणाच्या नात्याचा ना गोत्याचा! दारोदारीचा नकार पचवत, नशिबाच्या ठोकरा खात हा भरकटत होता. नाही म्हणायला, केसरकर नावाचा एक मित्र मदतीला धावला, त्यानें घरी नेले, जेवणखाण दिले, औषधपाणी केले. तब्येत थोडीफार सुधारते, तोवर त्या मित्रावरही त्याच्या भाऊबंदांचा दबाव यायला लागला. हा आपल्या दारावर मरता कामा नये, असं त्याला बजावण्यात आलं. आणि समाजाच्या आधाराची ती शेवटची दोरी पण एक दिवस तुटली. भयाण वादळी पावसात जगण्याचा आधार शोधत बाहेर पडावं लागलं. काहीच मार्ग दिसत नव्हता. समोर मरण डोळ्यासमोर दिसू लागलं. मरणापाठोपाठ स्मशानसुद्धा डोळ्यासमोर दिसू लागले.आणि अचानक, विजेच्या लोळासारखं ते स्मशान लख्खपणे समोर स्थिरावलं.

त्याच्या लक्षात आलं, कि स्मशानात तिथे एक जुनाट पडवी बांधलेली आहे. बस्स! ठरलं. आता मरण आलं तरी आपल्या पायाने आधीच तिथे पोहोचू. आता जगलो तरी तिथेच आणि मेलो तर, तिथेच!

“शाहण्यांनी आपुले थडगे खणावे आणि खणताना पुन्हा, गाणे म्हणावे…. या गाण्याच्या ओळीच नंतर आयुष्याचा भाग होऊन गेल्या. सुरुवातीला स्मशान म्हंटल्यावर भीती वाटली, नाही कशाला? मनावर गावातल्या रुढींचे, देवपणाचे संस्कार होतेच. त्यातच भयकथा वाचण्याचे वेड लहानपणापासून होतेच, त्यामुळे रक्तपिशाच्च, वेताळाची भूतासकट नाचत जाणारी पालखी हे सगळे विसरता येत नव्हते. पण वास्तव हेच होते, कि मेल्यानंतर लोक स्मशानात येत होते, आणि मी जगण्याच्या आशेपोटी स्मशानात आलो होतो. आता हेच माझ्यासाठी माझा आधार होतं, माझं निवासस्थान होतं, दुसरा पर्यायच नव्हता.” आज जवळपास ऐशी वर्षे वय असलेले चंद्रकांत लाड हे सगळं सांगताना त्या काळात हरवून गेले होते. आगीच्या तांबड्या प्रकाशाची एक भयानकता त्या काळासोबत त्यांच्या चेहऱ्यावर वावरत होती.

आता हे स्मशान हीच त्याची कर्मभूमी झाली होती. माणसांच्या स्वर्गाचा फोलपणा त्यांना कळून चुकला होता. हा पृथ्वीवरचा यमलोक त्यांच्यासाठी हक्काचे घर बनला होता.

हळू हळू इथेच जीवन सुरु झाले. या जीवनालाही इतरांच्या मरणाचा आधार होता. प्रेतांचे अंत्यसंस्कार करायला येणारी माणसे काही पैसे हातावर ठेवायची आणि जळणाऱ्या प्रेताकडे लक्ष ठेवायला सांगायची. हि सेवा पण घडायची, आणि पोटाचा प्रश्नही सुटायचा. दहाव्याचे संस्कार पण असेच उपयोगाला यायचे. इतरवेळी कुडाळ शहरात जाऊन भीक मागूनसुद्धा जगण्याची वेळ या एकेकाळच्या प्रसिद्ध चित्रकारावर आणि एका हरहुन्नरी कलाकारावर आली. नियतीचा डाव कोणाच्या नशिबात कसा मांडला जाईल हे समजणे सर्वस्वी अशक्य असते हेच खरे. सुखी संसाराची सर्वसामान्य स्वप्ने पाहणारा एक युवक, ज्याची स्वप्नं एका छोट्याशा संकटांच्या वादळात रांगोळीसारखी क्षणात पुसली जातात, आणि लोक संसार करून भरल्या घरात नांदत असतांना या कलाकाराच्या नशिबी मृत पत्नीचे मंगळसूत्र तेवढे मुठीत धरून स्मशानात जगण्याची वेळ यावी, असे क्रूर कथानक नियतीला कसे सुचले असेल? पत्नी सोबत नव्हती, पण तिचे मंगळसूत्र नेहमी सोबत घेऊन हा माणूस आपली रात्र रात्र जागवत असे. शेवटी याही जगण्याची सवय झाली, अन आज ते मंगळसूत्र कुठे अन कसे हरवले हे देखील त्याला आठवत नाही. ते आठवून तो हरतो, पण प्रयत्न मात्र हाती उरतो.

आज तीस वर्षे तो या स्मशानभूमीत जगतो आहे.जगण्याच्या वेदनेचा रौप्यमहोत्सवी सोहळा म्हणावा का याला?

माहित नाही, पण तो हि माणूस आहे. कदाचित जगाच्या दृष्टीने तो खुळा असेल, पागल असेल. तो स्वत:च बोलून दाखवतो तसं. रात्री त्याच्यासोबत कोणी ओळखही दाखवत नसे. तीस वर्षाच्या कालावधीत कित्येक अमावास्या त्याने तिथेच काढल्या, पण आयुष्याचे एकाकीपण कधीच संपले नाही. ज्या गोष्टीवर जगाचा पूर्ण विश्वास असतो, त्यातील एकही भूत, एकही पिशाच्च, एकाचाही पितर त्याने कधीच त्या स्मशानात पहिला नाही. अर्थात, त्याच्या या प्रामाणिक कथनावर कोणी कधी विश्वास पण ठेवला नाही. कारण तीस वर्षे स्मशानात राहणारा हा माणूस, याला का कोणी शहाणा म्हणणार??

काल सर्वपित्री अमावास्येला जाताना आम्ही ठरवूनच गेलो होतो, कि त्याचे हे माणूस आणि भुतं यांच्याशिवायचे असलेले हे तीस वर्षांचे एकाकीपण आपण काही क्षणांपुरते तरी वेगळेपणाने संपवायचे. आम्ही जाताना सोबत फ्राईड राईस, पाण्याच्या व सरबताच्या बाटल्या, भरपूर फरसाण, बिस्किटांचे पुढे असे काही घेऊन गेलो होतो. सोबत डिशेश होत्या. फ्राईड राईस सर्वांनाच पुरेल इतका होता. स्मशानातल्या त्या अंगणात चटई टाकून आम्ही त्यांच्यासोबत बसलो. आज सोबत एकत्र जेवू असे म्हणताच, त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. आम्ही डिश भरल्या. त्यांच्याशी गप्पा मारत मारत आम्ही सर्वांनी भर स्मशानातच एकत्र जेवण केलं. आज काहीही झालं, तरी त्याच्या त्या वातावरणात, अनुभवात काही काळ तरी समरस होऊन जगायचं असं ठरवूनच ठेवलं होतं. आमच्या दृष्टीने, तो आमच्या पितरांच्या स्मरणाचा सोहळा तर होताच, आम्ही त्याला शिळा म्हाळ ठरवूनच गेलो होतो. पण त्याही पलीकडे देव जसा दीनदुबळ्यामध्ये, रंजल्या गांजल्यामध्ये असतो, तसेच पितरसुद्धा तिथेच असले पाहिजेत या आमच्या सिद्धांताला, आमच्या मताला पुष्टी द्यायला गेलो होतो, आणि ती मिळालीही. डोळे भरलेल्या अवस्थेत त्या वृद्धाने सांगितले, कि गेल्या तीस वर्षात मला खूप जणांनी आपापल्या परीने मदत केली, आज माणगावच्या कुठल्याशा हायस्कुलची तरुण मुलंही इथे येतात, माझ्या जेवणासाठी लागणारं सामान ते जमेल तसं आणून भरतात. पण ही अशी जेवणाची आणि मनमोकळ्या गप्पांची पंगत नाही आली नशिबात!आज खूप भरून आलं.

आमच्या पितरांनी भरल्या पोटाना अन्नदान करणाऱ्या आम्हाला आजवर खरेच असे मनापासून आशीर्वाद दिले असतील? झाले असतील त्यांचे आत्मे कधी असे तृप्त? डॉ बापू भोगटेंच्या अन माझ्याही त्या पारंपरिक संस्कारी मनात हे प्रश्न आल्याशिवाय राहिले नाहीत.

खूप काही गप्पा झाल्या. तीस वर्षांच्या शेकडो अमावास्यामधून त्याला आजवर शेकडो भुतं भेटायला हवी होती. पण पुन्हा पुन्हा खोदून विचारूनही त्याने ठामपणे सांगितलं की नाहीच, मला एक क्षणभर सुद्धा याचा अनुभव नाही. हे सगळे माणसांच्या मनाचे खेळ! जिवंतपणेच ज्येष्ठ माणसांना सांभाळा रे! मेल्यानंतरचे म्हाळ म्हणजे फक्त मोठेपणा मिरवण्याची कामे. पूर्वजांचे स्मरण चांगल्या कामातून करा. ते कधीच मुक्त होतील. हि कर्मकांडे, श्राद्धे, म्हाळ त्यांच्या काही कामाची नाहीत.

तीस वर्षांचा एकांत स्मशानवासातला तो ऐशी वर्षे वयाचा अनुभव अतिशय परखडपणे आपली मते मांडत होता. आता हेच सुंदर ठिकाण आपल्या आयुष्याचे अंतिम ठिकाण. कोणी कितीही प्रेमाने बोलावले, तरी माणसाच्या भयाण जंगलात पुन्हा जाणे नको.

कडवटपणा कितीही मनात लपवला तरी नकळत बाहेर पडत होता. आठ वर्षांपूर्वी शेखर सामंत यांनीच प्रसिद्ध केलेल्या मुलाखतीमुळे नाही म्हंटल तरी त्यांच्या जगण्यात काही बदल झाले होतेच. लोकांच्या पाहण्याच्या दृष्टीत तो बदल आला होता. समाजाच्या वागणुकीत बदल आला होता. आता माणगाव कॉलेजची मुलं आणि शिक्षक दर पंधरा दिवसांनी येथे येऊन या स्मशानबाबाची चौकशी करतात. वैद्यकीय तपासणीची सोय पाहतात. त्यांच्या जेवणखाणाचे साहित्य त्या शेडमध्ये भरून ठेवतात. अलीकडे झालेल्या छोट्याशा अपघातात कंबरेला मार बसलाय, पण उपचार सुरु आहेत. काहीसे बसून चालणे होते. बदल अनुभवाला येतोय, पण आयुष्याचा अनुभव अजूनही बदलायला देत नाहीय. स्मशान हीच आपली यापुढे समाधी हाच घोषा कायम आहे, अनुभवाची नफरत मनात आहे.

वातावरण हलकं करण्यासाठी आम्ही त्यांना गाणं म्हणायला सांगितलं. गाण्याची, कविता करण्याची त्यांना आवड आहे हे शेखर सामंतांच्या लक्षात मागील आठ वर्षांपूर्वीच्या मुलाखतीमुळे होतं. थोड्या आग्रहानंतर मूडमध्ये येत त्यांनी एक सुरेल आलाप लावला. कदाचित स्वरचित असेल, पण आर्त स्वरात त्यांनी एक गाणं आळवलं. कितीही मजबूत बुरुज असला, तरी सततच्या लढाईत तो पडतोच. मनात लपवलेली माणसाच्या आधाराची गरज आणि स्मशानाच्याच आधाराची अनिवार्यता त्या बोलातून रात्रीच्या अंधाराला चिरत गेली. ते रात्रसंगीत वातावरण हलके करण्याऐवजी सुन्न सुन्न करत गेले..

कणाकणावर लिहिले प्रभूने खाणाऱ्याचे नाव देवा, सांग कुठे रे जाऊ??? देवा मी रे करितो सेवा, तुझिया चरणी धाव… देवा, सांग कुठे रे जाऊ?
स्मशान सोडूनि नाही जागा स्मशानभूमी माझी प्रेमळ नाही कोठे ठाव, देवा, सांग कुठे रे जाऊ? नाही मजला आधार देवा,सांग कुठे रे जाऊ?….

या प्रश्नाचं उत्तर आमच्याकडे तरी कुठे होतं? अखेर, उत्तरं नसलेल्या अनेक प्रश्नाच्या माणसाच्या जंगलात राहणारी आम्ही सामान्य माणसच तर होतो!!!!

अविनाश पराडकर, सिंधुदुर्ग AGP CREATIONS च्या सौजन्याने

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *