पुण्याचे श्रेष्ठत्व मिरवणा-यांनी थोडा हा पण विचार करा…

आज दुपारी पुण्यात शिवाजी नगर रेल्वे स्टेशननजीकच्या जुना बाजार चौकातील सिग्नलवर हे जे पडले आहे तो केवळ जाहिरातीच्या होर्डिंगचा सांगाडा नाही, ही पडलेली व्यवस्था आहे जी आपण उभी केली आहे आणि तिच्याकडे हताशपणे हतबल होऊन पाहतो आहोत कारण आपण ही त्या व्यवस्थेचा एक भाग आहोत…

इथे जे तीन जीव हकनाक बळी गेलेत त्यांच्याबद्दल दोन तीन दिवस आक्रोश होईल, सोशल मिडीयावर पोस्टींचा खच पडेल, वाहिन्या त्याचा नुसताच चावून चुथडा करतील, वर्तमानपत्रात रकाने भरून माहिती येईल, सर्वपक्षीय राजकारणी आता मृत आणि जखमींच्या घरी जातील, प्रशासन एकमेकावर जबाबदारी ढकलेल, एक दोन माणसं निलंबित होतील, त्यांच्यावर समिती नेमली जाईल, वीसेक वर्ष खटला चालेल, तोवर त्या माणसांचं पुनर्वसन झालेलं असेल…

दरम्यान याच चौकात नवे होर्डिंग वर्षात उभारलं जाईल त्यावर असलेल्या फ्लेक्सवर त्याच राजकारण्यांच्याही छबी असतील जे आता सांत्वनासाठी दुर्घटनेतील पिडीतांच्या घरी जातील….

तुम्ही आम्ही इतके मुर्दाड आणि बिनकण्याचे झालो आहोत ना की आपल्याला या व्यवस्थेचा संतापच येत नाही आणि आलाच तर तो षंढ असतो…

इथे सांडलेलं रक्त जरी आपल्या कुणा साख्ख्यांचं असलं तरी आपण फक्त चडफडतो त्या पुढे आपली मजल जात नाही….

उपलब्ध माहितीनुसार इथं असलेलं होर्डिंग परवाना दिलेल्या आकाराहून खूपच मोठं होतं. त्यावर तक्रारी देखील नोंदवल्या गेल्या होत्या. पण सगळ्यांचे लागे बांधे असल्याने सगळे सुखैनैव होते. आता दुर्घटना घडल्यावर महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात जुंपलेली पाहायला मिळेल. थातूर मातुर नुकसान भरपाई मिळेल पण गेलेले जीव परत येतील का हा प्रश्न यांना कोण विचारणार ?

नुसतेच पुणेरी पाट्यांचे जोक आणि पुणे मुंबईचे पीजे फिरवत पुण्याचे श्रेष्ठत्व मिरवायच्या हव्यासापुरते हे शहर उरलेय का ? राक्षसी महानगराच्या लालसेपोटी या रेखीव शहराचा जीव कधीच निघून गेला आहे. उरला आहे तो केवळ बाजार आणि बाजार !! पुण्याच्या बदलत्या स्वरूपावरही आता निष्फळ चर्चा झडतील न जाणो यातून कुणा नगरसेवकाला एखादी लॉटरीही लागेल वा कुणा एकाची वरकमाईही कमी होईल !

उच्च न्यायालयाने वारंवार आदेश देऊन देखील पुण्यातले होर्डींग्ज जैसे थे दिसतात आणि लोक मख्खपणे त्याकडे बघून न बघितल्यासारखं करतात. पुढारी आणि प्रशासन त्यातून मलई कमावते ! येऊन जाऊन न्यायालये आणि तिथं जनहित याचिकांचे किडे करणारे काही वायझेड लोक यांनाच याचे फार पडलेले असते…

खरं सांगू का ? असं होर्डिंग एखाद्या आमदार, खासदार वा मंत्र्यावर जोवर पडत नाही ना तोवर आपल्याकडे कारवाई होत नाही. आता जे होणार आहे तो कारवाईचा फार्स असणार आहे, कारण आपल्या व्यवस्थेच्या लेखी मुर्दाडांच्या जीवांचे मूल्य नसते…

– समीर गायकवाड

(दुर्घटनेत बळी पडलेल्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहण्याचा नैतिक अधिकार देखील मला नाही वा माझ्या सारख्या अन्य सामान्य माणसांनाही नाही. तरीही आपण सराईतासारखी नुसती श्रद्धांजली वाहून मोकळे होऊन आपली जबाबदारी (?) पार पाडू या… )

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *