कशी झाली होती धोनीची कर्णधारपदावर निवड? पवार साहेबांनी सांगितलेला किस्सा जरूर वाचा

मी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा (बीसीसीआय) अध्यक्ष असतानाची ही घटना आहे. त्या वेळी भारतीय संघाचा इंग्लंडमध्ये दौरा सुरू होता. इंग्लंडच्या दौऱ्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता. वर्ल्डकपची तयारी महत्त्वाची असल्यामुळं या दौऱ्यापासूनच निवड समितीचे सदस्य आणि आम्ही पदाधिकारी काळजी घेत होतो. संघाची कामगिरी कशी चालली आहे, हे बघण्यासाठी आणि किमान एक-दोन कसोटी सामन्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यासाठी मी लंडनला गेलो होतो. माझा मुक्काम लंडनमधल्या बकिंगहॅम पॅलेसजवळच्या टाटांच्या हॉटेलमध्ये होता.

त्या वेळी कसोटी सामन्यामध्ये एक दिवस सुटीचा असायचा. सामन्याच्या सुटीच्या दिवशी सकाळी भारतीय संघाचा कप्तान राहुल द्रविड यानं मला फोन करून ‘भेटायला यायचं आहे,’ असं सांगितलं. निवड समितीचे अध्यक्ष दिलीप वेंगसरकरही तिथंच होते. ठरल्याप्रमाणं राहुल माझ्याकडं आला आणि त्यानं, धक्का बसावा असा प्रस्ताव मला दिला. त्यानं सांगितलं ः ‘‘मला कप्तानपदाच्या जबाबदारीतून मोकळं करा; कारण कप्तानपदाच्या जबाबदारीमुळं माझ्या खेळावर वाईट परिणाम होतोय.’’ त्याला म्हटलं ः ‘‘तू हे असं काय सांगतोयस?’’ त्या कालखंडामध्ये राहुल, सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे हे क्रिकेटपटू नव्या पिढीचे आदर्श होते. संघाचा परदेशदौरा सुरू असताना मध्येच संघनायकाला बाजूला करायचं, हा सगळ्यांच्या दृष्टीनं चुकीचा संदेश जाईल, याची मला काळजी लागली होती.

‘‘या दौऱ्यानंतर आपल्याला आफ्रिकेला वर्ल्डकपसाठी जायचंय आणि त्या तारखा इतक्‍या जवळ आलेल्या असताना कप्तान बदलणं मला योग्य वाटत नाही,’’ असं मी राहुलला समजावलं. राहुल मात्र आपल्या भूमिकेशी ठाम होता. नंतर मी त्याला विचारलं ः ‘‘तू कप्तानपद सोडल्यावर ते द्यायचं कुणाकडं?’’ त्यानं लगेच उत्तर दिलं ः ‘‘संघामध्ये आदराचं स्थान असलेला खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. तुम्ही सांगितलं तर सचिन ही जबाबदारी घेईल.’’ आणि निवड समितीच्या अध्यक्षांनी लगेचच सचिनला बोलावून घेतलं आणि राहुलचा प्रस्ताव त्याच्यासमोर ठेवला.

सचिननं स्वच्छ उत्तर दिलं ‘‘पूर्वी मी कप्तानपदावर होतो; परंतु माझ्याही बाबतीत राहुलसारखाच अनुभव आहे. कप्तानपदी असताना माझ्या खेळण्यावर नक्कीच परिणाम होतो आणि ही जबाबदारी मला स्वीकारता येणं शक्‍य नाही.’’ आमच्यापुढं प्रश्न होता ‘दोन-तीन महिन्यांतच वर्ल्डकपसाठी जाताना कप्तान कुणाला करायचं?’ आणि त्याबाबतची चुकीची माहिती जर प्रसारमाध्यमांकडून प्रसारित झाली, तर त्याचा चुकीचा परिणाम खेळावर होण्याची शक्‍यता होती. आम्ही सचिनला विचारलं ः ‘‘तुम्ही दोघं नाही म्हटल्यावर आता हे पद द्यायचं तरी कुणाकडं?’’ सचिननं क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं ः ‘‘कदाचित तुम्हाला माझी मतं पटणार नाहीत. निवड समिती त्याबद्दल काय म्हणेल, ते मला माहीत नाही; पण सध्या संघात मला तसा एकच खेळाडू दिसतो, जो ही जबाबदारी चांगल्या प्रकारे निभावू शकेल… आणि त्या खेळाडूचं नाव आहे एम. एस. धोनी!’’

माझ्या मनात विचार आला, ‘झारखंडसारख्या छोट्या प्रांतातून आलेला हा खेळाडू ही जबाबदारी कशी पार पाडेल? शिवाय त्याला फार मोठा अनुभवही नाही.’ सचिननंच पुढं मला सांगितलं ः ‘‘पवारसाहेब, आमच्या संघात त्याच्याबद्दलची भावना खूप चांगल्या प्रकारची आहे. निवड समितीनं विचार करून संघाचं नेतृत्व धोनीकडं दिलं, तर मी खात्रीनं सांगतो, की देशाच्या क्रिकेटच्या यशामध्ये जास्तीत जास्त यश मिळवणारा, टीमला नेहमी बरोबर ठेवणारा आणि मैदानामध्ये संघ अडचणीत आला, तर उत्तम खेळ करून दाखवणारा असा हा खेळाडू आहे. त्याच्या तुलनेत दुसरा कुणीही खेळाडू नाही. अर्थात निर्णय निवड समितीनं घ्यायचा आहे; पण मी माझं मत मांडलं आहे.’’ त्यानंतर दिलीप वेंगसरकर, बिंद्रा आणि अन्य सहकाऱ्यांच्या कानावर मी ही सगळी बातमी घातली आणि यथावकाश धोनीची कप्तान म्हणून निवड झाली. त्यानंतरचा सगळा इतिहास, हा निर्णय कसा बरोबर होता, ते दाखवणाराच आहे.

राहुल काय… सचिन काय… सौरव गांगुली काय… हे आपापल्या परीनं उत्तम खेळाडू तर होतेच; पण त्यांची दृष्टी सबंध देशाचं प्रतिनिधित्व करत असताना किती व्यापक होती, याचाच प्रत्यय आला. या सर्वांनी प्राधान्यानं भारतीय संघाचा विचार केला. स्वतःपलीकडं देशाचं मोठेपण जपणारे हे सर्व खेळाडू म्हणजे भारतीय क्रिकेटचा मौल्यवान ठेवा होय!
-शरद पवार साहेब

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *