कुस्ती मधील कोहिनूर हिरा हरपला “हिंदकेसरी पै.गणपतराव आंदळकर वस्ताद”

आज कुस्तीमधील कोहिनूर हिरा हरपला. कुस्ती मध्ये द्रोणाचार्य ची भूमिका निभावणार्या आंदळकर वस्ताद यांचे निधन झाले. लाखो कुस्ती शौकिनाच्या मनाला चटका लावणारी गोष्ट काल संध्याकाळी सर्व न्युज चॅनल वरती झळकत होती. 1935 ते 2018 पर्यंत चा कुस्ती बरोबर चा अविरत पणे चालु असलेला प्रवास आज थांबला.
कोल्हापूर ची मोतीबाग तालीम म्हटले कि एक आवर्जून नाव घावे लागते ते म्हणजे अर्जुन पुरस्कार विजेते हिंद केसरी पै.गणपतराव आंदळक ( वस्ताद) . त्यांचा जन्म १९३५ साली एका शेतकरी कुटूंबात झाला . तर कोल्हापूरच्या मोतीबाग तालमी बरोबरचा प्रवास १९५० पासून अविरत पणे चालू होता. प्रथम एक चांगला कुस्ती पट्टू म्हणून घडण्यासाठी तर अनेक दशके वर्षा पासून अस्सल नामवंत कुस्तीपट्टू घडवण्यासाठीचा थक्क करणारा प्रवास. ज्याच्या कार्याबद्दल माझ्या लेखनातील शब्दही कमी पडतील. ज्यांनी उभं आयुष्य ” कुस्ती हेच जीवन” म्हणून कुस्ती मल्लविदेला समर्पित केलं.

आंदळकर वस्ताद १९६०-७० साली त्यावेळचे अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पैलवानाशी दोन हात करत कुस्ती शौकिनांच्या हृदया वरती राज्य केले. कुस्ती शौकिनांना पै. आंदाळकराची खरी ओळख झाली ती म्हणजे १९५८ साली खासबाग मैदान मध्ये पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याच्या बरोबर झालेल्या कुस्ती मुळे. ज्यांनी हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने पाकिस्तान च्या मल्लास धूळ चारली आणि आपल्यातील कुस्तीची एक चुणूक दाखवली. त्या नंतर त्यांनी मोती पंजाब, मंगल पैलवान, हनीफ अहमद ,श्रीपाद खांचाळे (पहिले हिंद केसरी ), श्रीरंग जाधव, बनातसिंग पंजाबी या सारख्या ख्यातनाम मल्लांशी झुंज दिली.

कुस्तीतील वाढता दबदबा पाहून आंदळकर वस्तादाची १९६० साली मुंबई येथे होणाऱ्या हिंद केसरी स्पर्धे साठी निवड करण्यात आली. हि स्पर्धा सरदार वल्लभ भाई पटेल मैदान मध्ये घेण्यात आली होती. आंदळकर वस्तादांनी ह्या स्पर्धे मध्ये अनेक धक्कादायक निकालाची नोंद करत अनेक मल्लाना धूळ चारली. त्यामध्ये उपांत्य लढतीत बंतासिंह ला आस्मान दाखवत अंतिम फेरीत धडक मारली. आणि अंतिम लढतीत त्यांना पंजाबचा कसलेला पैलवान खडकसिंग बरोबर दोन हात करायचे होते. हि कुस्ती प्रथम ४० मिटिते चितपट करण्यासाठी साठी दिली होती आणि जर का ४० मिनिटामध्ये चितपट कुस्ती झाली नाही तर त्या ४० मिनिटात घेतलेल्या गुणावरती कुस्तीचा निकाल लागणार होता. ७ फेबुरवारी १९६० साली कोल्हापूर विरुद्ध पंजाब, महाराष्ट्र विरुद्ध पंजाब अशा अंतिम लढतीला सुरवात झाली होती. अटीतटीच्या लढतीमध्ये ४० मिनिटात कुस्ती निकाली होऊ न शकल्यामुळे १० विरुद्ध ५ अशा गुण फरकाने पै. गणपती आंदळकर यांना विजयी घोषित करण्यात आले. आणि आपल्या कोल्हापूरच्या पैलवानाने सलग दुसऱ्या वर्षी हिंद केसरीच्या गदे वरती नाव कोरले. संपूर्ण भारतात कोल्हापूरच्या लालमातीला नावलौकिक मिळून दिले.

पुढे १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावले ,तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य मिळवले. कुस्तीच्या दोन्ही प्रकार मध्ये पदक मिळवणे हि खूपच दुर्मिळ घटना आहे आणि त्यावेळी जास्त करून आपले खेळाडू मातीमध्येच सराव करत होते. मॅट वरील खेळाचा अनुभव आपल्याकडील खेळाडूंना कमीच होता . तरीही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आंदाळकरांनी ऑलिम्पिक पर्यंत मजल मारत भारताचे नेतृत्व केले. पै.गणपतराव आंदळकर यांनी संपूर्ण कुस्ती कारकिर्दीत शेकडो कुस्त्या नामवंत मल्लांन बरोबर केल्या त्यामध्येही ४० कुस्त्या पाकिस्तान च्या मल्लाना धूळ चारत चितपट केल्या व कोल्हापूरच्या लाल मातीचा जगभर डंका वाजवला. महाराष्ट्र व केंद सरकारने त्याच्या कार्याची दखल घेत याना 1962 चा अर्जुन पुरस्कार, 1982 साली शिव छत्रपती पुरस्कार, 1990 ला महाराष्ट्र गौरव आणि कोल्हापूर भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

पै.गणपतराव आंदळकर यांनी चांगला कुस्तीपट्टू म्हणून नाव कमावले नंतर आयुष्यातील दुसरे पर्व मोतीबाग तालमीतील पैलवानास कुस्तीमल्लविदेचे धडे द्यायला सुरवात केली. पारंपरिक कुस्तीतील डावा बरोबर आधुनिकतेची जोड देत गेल्या अनेक दशका पासून ते कुस्तीचे प्रशिक्षण देत आहेत. आज वयाची 85 गाठली तरीही वस्ताद रोज तालमीत येऊन मल्ल तयार करण्यात आपले योगदान देत होते. डब्बल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहास पाटील, उपमहाराष्ट्र केसरी पै. नंदू आबदार,चम्बा मुत्नाळ, विष्णू जोशीलकर , राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते पै. राम सारंग सर यासारख्या अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय मल्लास त्यांनी घडवले आहेत. अशा या महान मल्लास “कुस्ती हेच जीवन” परिवार व तमाम कुस्ती शौकिन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .

शोकाकुल
कुस्ती हेच जीवन परिवार
पै. रामदास देसाई
शाहू आखाडा, सोनगे
Whatsapp – 8308845872

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *