अट्टल दरोडेखोर लाल्या मांग ! का आहे या दरोडेखोराबद्द्ल लोकांच्या मनात अजूनही आदर..

अट्टल चोर लाल्या मांग..!
औरंगाबादहुन नाशिकच्या दिशेनं पुढं निघालं की माळीवाडा या गावापासून डाव्या हाताला रेल्वे फाटक लागतं ते ओलांडून थोडं पुढं आलं की रस्त्याच्या कडेची एक पाटी तुमचं लक्ष वेधून घेते ती पाटी आहे लाल्या मांगाच्या समाधीची..! पाटीपासून काही अंतरावरच जवळ शेतात लाल्या मांग याची समाधी आहे. मी गाडी थांबवून समाधी पहिली खरी पण आसपास कुणीच नसल्यामुळे हा लाल्या मांग गडी कोण होता याची उत्सुकता दाटून अली… शेजारी काही अंतरावर पूर्वीचं निझामपूर आणि आताचं असेगाव हे गाव आहे. या गावात जाऊन थेट त्याच्या भावालाच भिका मांग याला गाठून चौकशी केली तेंव्हा समजलं की हा लाल्या एक अट्टल दरोडेखोर होता… साधारण 1960 – 70 च्या दशकात औरंगाबाद जिल्ह्यात आणि खास करून गंगापूर तालुक्यात याची दहशत होती…

लाल्या मांगाचं मूळ आडनाव आव्हाड होतं पण विकृत जातीय मानसिकतेन लाला आव्हाडचा लाल्या मांग केला होता. लाल्याच्या गावापासून जवळ असलेल्या रेल्वे फाटक परिसरात एक मोठा बंगला होता… बंगल्याच्या मालकाने या लाल्याचा जातीवर अपमान केला… भूक सहन करेल पण जातीय अपमान शक्य नाही… तो काळही तोच होता ज्या काळात अण्णाभाऊंचा डफ महाराष्ट्रात चांगला गाजत होता… लाल्यानं त्याच रात्री त्या बंगल्यावर दरोडा टाकला अपमान करणाऱ्या मालकाला बेदम झोडपलं आणि आता पळून जावं लागणार हे पक्क असल्यामुळ सगळं घरही साफ केलं… बस्स तिथून पुढं चोरी आणि दरोडा हे लाल्याच समीकरण बनलं… तिथून पुढे तब्बल दहा वर्षे लाल्या रोज चोऱ्या करत राहिला आणि जंगल शिवारात दिवस रात्र फिरत राहिला… त्याला भूक लागायची तेंव्हा तो कुण्याही शेतकऱ्याच्या शेतात जायचा… शेतात आयाबहिनी असायच्याच… हा लांब धुऱ्यावर उभा राहायचा लांबून आयाबहिणींना भूक लागल्याचा ईशारा करायचा… लाल्याला सगळेच ओळखत त्यामुळे लाल्या बांधावर आला की कुणीच आरडा ओरडा करायचं नाही गळ्यातले मंगळसूत्र लपवायचे नाहीत… तर त्यांच्याकडे असलेल्या भाकरी हंडाभर पाणी झाडाखाली ठेऊन द्यायचे आणि या सगळ्या आयाबहिनी लांब जाऊन बसायच्या त्यानंतर हा लाल्या जेवण करायचा निघून यायचा…

त्यानं त्याच्या उभ्या हयातीत बाईला हात लावला नाही हे कुणीही सांगतं… पण त्याहून मोठी गोष्ट ही की एका गावात लाल्या चोरी करायला गेला… लाल्याला ज्या घरात चोरी करायची असत त्या घरात घुसायचा आतून दारं कड्या लावायचा आणि पैसे मागायचे नाही दिले तर मार मिळायचा वरून रडायची चोरी असायची… आशाच एका घरात लल्याच्या माराला घाबरून लहान लेकरू रडू लागलं… त्यावेळी त्या मुलाची आई त्या मुलाला समजवत म्हणाली की, “रडू नको बाळा हा तुझा मामा आहे.” बस्स त्या बाईचं एवढं एकच वाक्य ऐकलं आणि लाल्या त्या घरात चोरी न करताच निघूनही आला इतका हा इमोशनल माणूस…

लाल्या कधी कधी घरी पण यायचा आणि पोलीस मागावर असायचे तेंव्हा त्याने एक कुत्री ट्रेन केली होती. ती घराच्या वर बसलेली असायची, गावात कुणीही आलं तर ती भुंकायची नाही पण पोलीस लांबून येतानाच दिसले की ती जोरजोरात भुंकायची आणि लाल्या पसार व्हायचा… तिचा ठोका कधीच चुकला नाही आणि लाल्या घरात तरी पोलिसांच्या हाती कधीच लागला नाही… लाल्याचं ठरलेलं होतं मी पोलिसांच्या हाती कधी लागणार नाही आणि मेलो तर एक दोन पोलीस घेऊन मरेन बस्स तो जसं बोलत होता शेवटी तेच घडलं… गंगापूर तालुक्यातल्या आंबेगावत लाल्या पोलिसांच्या हाती लागलाच त्यावेळच्या जमादाराने लाल्याला माघून घट्ट मिठी मारली लाल्याला काही सुटता येईन… शेवट लाल्याने जांबिया काढला आणि जमादाराच्या पोटात खुपसला इतर पोलीस जखमी झाले लाल्या पाळायला लागला पण त्या गावात विकृत जातीय मानसिकता पेटून उठली आणि गावाने लाल्या मांग ठेचून मारला… वयाच्या 25 व्या वर्षी चोऱ्या करायला लागलेला हा लाल्या वयाच्या 35 शीत जग सोडून गेला आज त्याला इतिहास जमा होऊन 40 वर्षे उलटलीत पण त्याच्या नितीसंपन्न वागण्यामुळे आजही त्याचं नाव त्याच्या भागात कुतूहल आणि आदराने घेतलं जातं ही उपलब्धी लाल्यासाठी काही कमी नाही…

दत्ता कानवटे, औरंगाबाद.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *