साहसकथा महाराष्ट्रातील दोन ध्येयवेड्या युवतींच्या काश्मीर ते कन्याकुमारी सायकलस्वारीची

सायकल चालवण्याचा चस्का एकदा का लागला की सायकलच त्याला कुठेकुठे घेऊन जाते. अगदी काश्मीर ते कन्याकुमारीसुद्धा ! ही साहसकथा आहे महाराष्ट्रातील दोन ध्येयवेड्या युवतींची.

कधी शून्य तापमान तर कधी ४५ डिग्री सेल्सिअस तापमान… या अशा प्रतिकूल परिस्थितीतही न थकता, न डगमगता महाराष्ट्रातील सायली महाराव आणि पूजा बुधावले या दोन तरुणींनी काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकलप्रवास यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे.

मुंबईच्या सायली महाराव आणि पुण्याच्या पूजा बुधावले या दोन युवतींनी तब्बल ३५ दिवसांचा काश्मीर ते कन्याकुमारी हा सायकल प्रवास ३ जानेवारी रोजी पूर्ण केला आहे. ३० नोव्हेंबरपासून सायली आणि पूजाचा हा प्रवास सुरु झाला होता. दिवसाला १२० ते १५० किलोमीटरचा पल्ला गाठत या २ तरुणींनी ३८६८ किलोमीटरचा एकूण प्रवास पूर्ण केला आहे.

या संपूर्ण सायकलस्वारीचे ‘प्रदूषणमुक्त भारत’ व ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हे दोन मूळ उद्देश होते. त्यामुळे सायली आणि पूजाच्या या प्रवासाला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. एवढा खंडप्राय प्रवास करणाऱ्या सायली आणि पूजा इथवरच न थांबता, या वर्षात सायकलवरून हिमालयीन प्रवासदेखील करणार आहेत.

रोजचा दिनक्रम

दरदिवशी साधारण १२० -१५० किलोमीटरचा पल्ला या दोघी पार करत होत्या. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासात विविध राज्यातील बाईक रायडर्स व सायकल रायडर्सच्या क्लब्सनी खूप मदत केली. अनेक लोकांनी होमस्टेची सोयसुद्धा करून दिली. त्याचसोबत विविध राज्यातील लोकांच्या आपुलकीसोबत तिथल्या पदार्थांच्या चवीसुद्धा चाखता येत होत्या.

मोहिमेसाठी केलेली तयारी

या मोहिमेआधी रोज ६० किलोमीटरची सायकल सफर या दोघी नियमित करत होत्या. त्याचसोबत पुणे ते सातारा, पुणे ते जेजुरी, पुणे-लोणावळा, कोल्हापूर ते पुणे असे छोटे प्रवास करण्याचा प्रयत्न सायली आणि पूजाने केले. ज्यामुळे या मोहिमेची पक्की तयारी झाली.

मोहिमेतून मिळालेली शिकवण

पहाटे लवकर उठून, सर्व आवरून वेळेत निघायची सवय लागली. आयुष्यात पुढेही त्यांना या सवयीचा नक्कीच मदत होईल असं त्या म्हणतात. त्याचसोबत स्वावलंबी होऊन निर्णय घेण्याची क्षमता वाढली आहे, असं दोघींचं मत आहे.

महिलांना संदेश

हव्या त्या क्षेत्रात, हव्या त्या गोष्टी… एक महिला म्हणून तुम्ही मिळवू शकता. त्यामुळे महिलांनी आपल्या कुटुंबियांना त्यांची स्वप्न पटवून देऊन ध्येय गाठण्याचा प्रयत्न करायला हवा.

सायली महाराव आणि पूजा बुधावले या दोन तरुणींच्या कामगिरीला खासरे कडून सलाम आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *