“गडकिल्ले महाराष्ट्राचे” या ग्रंथराजावरचं मान्यवरांचं निरपेक्ष-परखड भाष्य. हा ग्रंथराज का घ्यावा याचा जणू परिपाठच.

श्री प्रमोद मांडे हे एक कलंदर माणूस. महाराष्ट्रातल्या किंबहुना भारतातील सर्व गडदुर्ग पाहण्याच्या वेडाने त्यांस झपाटले आहे. असे वेड डोक्यात घेतलेली माणसेच इतिहास घडवतात. “गडकिल्ले महाराष्ट्राचे” हा ग्रंथ रचून प्रमोद मांडे यांनी इतिहास घडवला आहे. या ग्रंथात एकूण ३९१ गडकिल्ल्यांची माहिती आली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सर्व दुर्ग स्वतः पाहून आल्यावरच श्री मांडे यांनी पुस्तकरूपात मांडले आहेत. श्री प्रमोद मांडे हे एक मोठे दुर्गपंडित आहेत. महाराष्ट्राच्या भूमीवर, सह्याद्रीवर, छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर, महाराष्ट्राच्या इतिहासावर त्यांचे नितांत प्रेम आहे. या प्रेमापोटी त्यांनाही अवघा महाराष्ट्र धांडोळला. श्री मांडे यांनी दुर्गविषयक हे फार मोठे काम केले आहे आणि प्रामाणिकपणे जनतेसमोर ठेवले आहे. या ग्रंथात कदाचित प्रथमच महाराष्ट्रातील दुर्गांची एकूण मोजदाद आली असावी. हा (गडकिल्ले महाराष्ट्राचे) ग्रंथराज वाचकप्रिय होईल यात काहीच शंका नाही. त्यासाठी श्री प्रमोद मांडे यांनी जी मेहनत, कष्ट घेतले आहेत आणि आर्थिक झाले सोसली आहे, त्याबद्दल ते कौतुकास पात्र ठरले आहेत.
जेष्ठ इतिहास तज्ञ :- निनाद बेडेकर

दुर्गमहर्षी मांडे सर
मांडे सरांचे फिरणे एखाद्या झंझावातासारखे असते. एकदा एक डोंगररांग धरली की त्या भागातली मंदिरे, लेणी, ऐतिहासिक वाडे, विहिरी, गडकिल्ले या साऱ्या गोष्टी सर एका मागोमाग एक अशी झाडून पाहतात. १९६७ पासून किल्ले पाहायला सुरुवात केलेल्या मांडे सरांनी आज अखेर शेकडो किल्ले कधी पायी तर कधी गाडीवरून फिरून पाहिले आहेत. त्यांचं “गडकिल्ले महाराष्ट्राचे” हे पुस्तक म्हणजे शंभर नंबरी अस्सल सोनं आहे. या भल्या मोठ्या दणदणीत वजनदार पुस्तकाने महाराष्ट्रात नक्की किल्ले किती ही चर्चाच जणू थांबविली. मांडे सरांचे दुसरे वैशिष्टय म्हणजे त्यांची तल्लख स्मरणशक्ती. त्यांना कधीही- कुठूनही व कोणत्याही वेळेला फोन केला व एखाद्या किल्ल्याजवळील गावाची माहिती त्यांना विचारली की पटकन ते त्या गावाचे नाव जिभेवर खेळत असल्यासारखे सांगतात. कुठला किल्ला कुठे वसला आहे, तेथे पाण्याची व मुक्कामाची सोय काय, शेजारील पाहण्यालायक ठिकाणे कोणती या साऱ्या साऱ्या गोष्टी त्यांच्या तल्लख मेंदूत फिट असतात. दुर्गांवर या माणसाचे किती जीवापाड प्रेम आहे याचा अनुभव त्यांच्या घरी गेल्याशिवाय कोणालाही येणार नाही. त्यांच्या कॉम्पुटरवरील त्यांनी स्वतः काढलेले गडांचे हजारो फोटो, त्यांचा पुस्तकांचा संग्रह व त्यांचे लाखमोलाचे अनुभव ऐकताना वेळ कसा गेला याचे भान आपणास राहत नाही.
साक्षेपी दुर्ग अभ्यासक:- श्री भगवानराव चिले

भारतीय दुर्गांचा जिवलग: प्रमोद मांडे
प्रमोदने महाराष्ट्रातले अवघे दुर्ग, कोट स्वतः बघून त्यांना पुस्तकरूपाने जिवंत केलेच, पण सोबत महाराष्ट्राशिवाय कर्नाटक- तामिळनाडू, गोवा, केरळ, आंध्र, गुजराथ, राजस्थान, मध्यप्रदेश, दिल्ली या सर्व प्रांतात दुर्गनिरीक्षणे करून तेथीलही महत्वाचे दुर्ग-कोट यांची नोंद केली. त्याचे काम ” यासम हेच” असे आहे. “प्रमोद मांडे !! खरे म्हणजे भारतभ्रमण केलेला एखादा दुर्गप्रेमी फारतर व्याख्याने देत सपाटीवर फिरत असता. पण प्रमोदने दुर्ग पुरंदर जणू दत्तकच घेऊन तिथे साफसफाईची कामे सातत्याने घडवून आणली आणि वेगळी तटरचना शोधूनही काढली. ” प्रमोद भाऊ दुर्गांचा अभिमान जागृत करतात आणि त्याबरोबर या देशाबद्दलची आत्मीयता निर्माण करतात.
जेष्ठ दुर्गतज्ञ:- आनंद पाळंदे

एके दिवशी मांडेसाहेब माझ्या घरी आले असताना त्यांनी त्यांच्या संकल्पित “गडकिल्ले महाराष्ट्राचे” ग्रंथाबद्दल सांगितलं. मी लगेचच त्यांच्या प्रसिद्धीपूर्व नोंदणीत माझी प्रत नोंदवून टाकली. कारण त्या प्रसिद्धीपूर्व सवलतीपेक्षा माझ्या एका गडमित्राचं पुस्तक येत आहे त्याला प्रोत्साहन मिळावं हा त्यामागचा उद्देश होता. सरतेशेवटी तब्बल ४३२ पानांचा हा दणदणीत ग्रंथराज जेंव्हा माझ्या हातात आला तेंव्हाच त्यांच्या आजवर किल्ल्यांबद्दल न लिहिण्यामागचं इंगित माझ्या लक्षात आलं. माझ्यासारखं फुटकळ न लिहिता त्यांनी हा “गडकोश” निर्माण केला. त्यांबद्दल त्यांचं खरोखर अभिनंदनच करायला हवं. आपल्याला एखादी शंका आली आणि ती ह्या हसतमुख डोंगरभावाला विचारली की डोंगराएवढ्या मनाच्या मित्राकडून लगेचच शंकासमाधान होतं हा माझा अनेक वर्षापासूनचा स्वानुभव आहे. त्यांच्या दुर्गविषयक कामांमुळे त्यांना श्री. उद्धवराव ठाकरे यांच्या हस्ते “दुर्गज्ञानी” आणि श्रीमंत शाहू महाराजांच्या हस्ते “दुर्गमहर्षी” अश्या पदव्या देण्यात आल्या आहेत. “योग्य माणसाला योग्य असाच बहुमान मिळाला.” अशी सगळ्यांची भावना झाली होती.
जेष्ठ दुर्ग अभ्यासक:- श्री प्र. के. घाणेकर

छत्रपती शिवबांच्या गडकोटांची साद परत महाराष्ट्राच्या कानीकपाळी दृग्गोचर होणार, दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांच्या ४० वर्षाच्या गडकोट साधनेचं गोमटं फळ गडकोट पाईकांच्या भेटली येणार, मुरलेल्या गडकोट पंडितांनी-इतिहासकारांनी ज्या ग्रंथराजावर मनभरून शब्दसुमनं उधळली, ज्याची महती पहाडी बुलंद आवाजात जागोजागी गायिली, ज्या ग्रंथराजानं महाराष्ट्रदेशीच्या एकूण-एक गडकोटांना आपल्या कवेत सामावून घेतलंय, तो ग्रंथराज पुन्हा परततोय..
दुर्गनिष्ठांनो-दुर्गबांधवांनो, पायघड्या तयार ठेवा, पायघड्या तयार ठेवा, पायघड्या तयार ठेवा !!!!

“गडकिल्ले महाराष्ट्राचे ( दुसरी आवृत्ती ) ( फक्त हजार प्रती )” लेखक:- दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे प्रकाशन:- दुर्गमहर्षी प्रमोद मारुती मांडे विचार मंच । मराठी देशा प्रकाशन ४५० पानं । संपूर्ण आर्ट पेपर । संपूर्ण फोर कलर प्रिंटींग । पुठ्ठा बाइंडिंग ( hardbound binding ) ।किंमत ९९५ मात्र । प्रकाशनपूर्व सवलत ६५०-/- ( पोस्टेज खर्च वेगळा ) ( ग्रंथ डिसेंबर १८ ला उपलब्ध होईल. )
“”तब्बल दहा वर्षांनी दुसरी आवृत्ती प्रकाशित होत असूनही ग्रंथाच्या किमतीत अगदी माफक बदल करण्यात आला आहे. गेल्या १० वर्षात सर्व गोष्टींचे दाम दसपटीनं वाढलेले आहेत, तरी ही आवृत्ती जन-आवृत्ती व्हावी ही दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांची इच्छा असल्याकारणे ग्रंथाची किंमत आटोक्यात ठेवली आहे.
प्रकाशनपूर्व बुकिंगसाठी संपर्क:- 95 79 40 78 00 ( राहुल ) 99 70 42 96 56 ( कुलदीप ) 92 09 20 99 70 ( वैभव ) 94 21 05 18 89 ( मगदूम सर )

ऑनलाईन बुकिंगसाठी खाते क्रमांक:- Account name: Marathidesha Foundation Account Number: 051620110000425 IFSC code: BKID0000516 Bank of India, Pashan Road, Abhimanshree Socity ,Pune-411008
( पुस्तकासाठी खात्यावर पैसे भरल्यावर त्याची रिसीट marathidesha@gmail.com या ID वर मेल करावी. त्या मेलमध्ये संपूर्ण नाव- संपूर्ण पत्ता आणि मोबाईल नंबर दिलेला असावा. वर दिलेल्या मोबाईल पैकी कोणत्याही एका नंबरवर फोन करून पैसे ट्रान्सफरबद्दल अपडेट द्यावा. )

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *