हमालाच्या मुलाची गरुडझेप, वयाच्या २४व्या वर्षी न्यायाधीशपदाला गवसणी..

ग्रामीण भागात शिक्षण, योग्य मार्गदर्शन अशा विविध समस्या असताना प्रतिकूल परिस्थितीस तोंड देत चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील सचिन न्याहारकर यांनी स्पर्धा परीक्षेत यश मिळवत न्यायाधीशपदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी आणि श्रम करण्याची तयारी असल्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळवू शकतो हे न्याहारकर यांनी दाखवून दिले आहे. आज खासरेवर सचिनचा हा प्रवास बघूया..

लासलगावमधील कांद्याच्या खळ्यावर हमाली करणाऱ्या एका बापाच्या कष्टाचं आज चीज झालं आहे. परिस्थितीचं भांडवल न करता मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर मात करत सचिन न्याहारकर हा हमालाचा मुलगा आता न्यायाधीश झाला आहे. चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ इथे उत्तमराव न्याहारकर यांची एक एकर शेती आहे. मात्र हंमातच पिक घेता येत असल्याने उत्तमराव हे लासलगाव येथे माथाडी कामगार म्हणून काम करतात. सचिनने दहावीपर्यंतचं शिक्षण गावातच घेऊन बारावीपर्यंतच शिक्षण लासलगाव घेतलं. बारावीत चांगले मार्क मिळाल्याने सचिनने पुण्यातील लॉ कॉलेज प्रवेश घेतला. घरातील परिस्थिती नाजूक, आई-वडिलांनी पोटाला चिमटा काढत मुलांच्या शिक्षणात कुठलीच कसूर ठेवली नाही. अभ्यासात सातत्य व प्रचंड मेहनत घेऊन २०१२ मध्ये प्रथम श्रेणी मिळवत पदवी प्राप्र्त केली. घरी जिरायती शेती असल्याने तसेच वडील हमाली करून उदरनिर्वाह करत असल्याने घरची परिस्थिती बेताची होती. परंतु वडिलांनी कधीही अडचण येऊ दिली नाही. दरम्यानच्या काळात न्याहारकर यांच्या मोठय़ा बंधुस लष्करात संधी मिळाल्याने कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा झाली. त्यामुळे शिक्षण घेताना मोठा आधार मिळाला. नातेवाईकांच्या मदतीने पुण्यात पोहोचला आणि तेथे शिकत असतानाच त्याने न्यायाधीशाची परीक्षा दिली.

शालेय शिक्षण घेत असतानाच न्यायाधीश होण्याचे स्वप्न बाळगले होते. त्यासाठी अभ्यासात सातत्य ठेवून जास्तीत जास्त वेळ देत अभ्यास केला. त्यासाठी वडील व भावाची वेळोवेळी योग्य मदत मिळाल्याने कमीतकमी कालावधीत यश मिळविता आले, असे न्याहारकर यांनी नमूद केले. सचिन लहानपणापासूनच हुशार होता. स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने जास्तीत जास्त वेळ अभ्यासाला दिला. अभ्यासात नेहमी सातत्य ठेवले. त्यामुळे एवढय़ा कमी वेळात तो न्यायाधीश पदापर्यंत पोहचू शकला, अशी प्रतिक्रिया सचिन यांचे वडील उत्तमराव न्याहारकर यांनी दिली. वयाच्या २४ व्या वर्षी न्यायााधीश होणारे न्याहारकर हे तालुक्यातील पहिलेच विद्यार्थी होय.
खासरेचा सचिनच्या जिद्द व परिश्रमास सलाम आणि भावी आयुष्याकरिताशुभेच्छा…
ज्या कोर्टात वडील होते चपराशी, मुलगी तिथेच बनणार जज, पण…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *