अब्जावधीची संख्या सहज लिहिणारी जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी

जालन्यातील मंठा तालुक्यातील कानफोडीची जिल्हा परिषद शाळा. पहिली ते चौथी असणारी ही शाळा आहे छोटीशीच, पण त्याची दर्शनी कमान, आत सुंदर राखलेली बाग, मुलांना आणि झाडांना ऊन लागू नये म्हणून घातलेली ग्रीन नेटची शेड, नीटनेटक्या गणवेषातील विद्यार्थी पाहून प्रसन्न वाटते. आत जातो तर विद्यार्थी हातात खडू घेऊन तयारच असतात, अगदी पहिलीचा विद्यार्थीही अब्जांची संख्या फळ्यावर लिहून दाखवतो, एखादी चिमुरडी त्यातल्या कुठल्याही अंकाची स्थानिक किंमत सांगते. तीन शब्द दिले असता या शाळेतले विद्यार्थी त्यावरुन गोष्टही तयार करतात तेव्हा जाणवते- ये तो लंबी रेसका घोडा

अब्जावधीची संख्या सहज लिहिणारी विद्यार्थिनी 2017 साली अंतर्बाह्य देखणी दिसणारी ही शाळा खरं म्हणजे 2015 पासून बदलली. त्यापूर्वीची परिस्थिती अशी होती की शाळेला कंपाऊंड नव्हते, शाळेच्या आवारात लोक गुरंढोरं सोडायचे, शाळेतल्या फरशा उखडलेल्या असायच्या. शाळेत लावलेलं एखादं रोपसुद्धा टिकत नव्हतं. 2015 साली किशन जाधव सरांनी या शाळेच्या मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारला आणि शाळेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची खूणगाठ बांधली. 15 ऑगस्ट 2015 रोजी शाळेत ध्वजवंदनासोबतच त्यांनी एक पालकसभा बोलावली आणि शाळा गुणवत्ता आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण करण्याचा मानस बोलून दाखवला. त्यासाठी दोन्ही शिक्षक रात्रंदिवस मेहनत करायला तयार आहेत, असे आश्वासनही त्यांनी गावकऱ्यांना दिले.

सरांच्या या सभेनंतर गावकऱ्यांचे एकच म्हणणे होते, “आम्ही शाळेला आर्थिक मदत करायला तयार आहोत पण शाळा श्रीरामतांडा शाळेसारखी गुणवत्तेने परिपूर्ण करा”. कानफोडी शाळेपासून अगदी 20 मिनिटांच्या अंतरावर श्रीरामतांड्याची बहुचर्चित जिल्हा परिषद शाळा आहे, त्यामुळे त्या शाळेशी तुलना होणं साहजिकच होतं. श्रीरामतांडा शाळेच्या जगदीश कुडे सरांच्या मार्गदर्शनाखालीच आपण वाटचाल करु आणि कानफोडीची शाळाही श्रीरामतांड्याच्या तोडीस तोड बनवू असा विश्वास जाधव सरांनी दिला. पण आधी शाळेत मुलांना नियमित यावेसे वाटले पाहिजे यासाठी शाळा नेटकी आणि सुंदर हवी असा शिक्षकांचा आग्रह होता.

त्यासाठी सर्वात आधी शाळेला कंपाऊंडची गरज असल्याचे मुख्याध्यापक जाधव सरांनी सांगितले. या सभेला जिल्हा परिषद सदस्य नरसिंगमामा राठोडही हजर होते. त्यांनी चार महिन्यात शाळेच्या कंपाऊंडचे काम करुन देण्याचे आश्वासन दिले. पण तरी शाळेच्या इमारतीची इतर दुरुस्ती, रंगरंगोटी यासाठी आणखी पैसे लागणारच होते. जाधव सर सांगतात, “15 ऑगस्टच्या त्या सभेत केवळ आमच्या बोलण्यावर विश्वास टाकत त्याच दिवशी लोकांनी 15 हजार रुपये जमा केले आणि पुढच्या आठवड्याभरात गावकऱ्यांनी 35 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा केली. ते सुद्धा गावातले बहुसंख्य नागरिक हे शेतकरी आणि बंजारा समाजाचे असताना, लोकांनी उदारहस्ते देणगी दिली. देणगी देणाऱ्या अनेकांची तर मुले शाळेतही नाहीत, तरीही त्यांनी गावाच्या शाळेसाठी देणगी दिली.”

त्यानंतर राठोड यांनी दिलेल्या आश्वासनानुसार सहा महिन्यात सुमारे तीन लाखांचे मजबूत कंपाऊंड शाळेभोवती बांधून झाले. शाळेच्या आवारातली फरशी दुरुस्त केली गेली, शाळेचे स्वच्छतागृह मोडकळीस आले आहे, ते दुरुस्त करावे असे कुडे सरांनी सुचविले. त्यातून शाळेचे स्वच्छतागृह दुरुस्त केले गेले. अपंग मुलांच्या सोयीसाठी रॅम्प तयार केला गेला. शाळेच्या भोवती बाग करावी आणि शाळेच्या नावाची लोखंडी कमानही करावी असे दुसरे शिक्षक शाहूराव नेवरे सरांनी सुचविले. त्यातून शाळेच्या आवारात माती टाकली गेली. जि.प. सदस्य नरसिंगमामा राठोड यांनी 50-60 रोपं आणून दिली ती विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून लावली. महत्त्वाचे म्हणजे ही बांधकामाची कामं करताना खर्च वाचवण्यासाठी या शाळेचे जाधव सर आणि नेवरे सर दोघांनीही प्रसंगी विटा, सिमेंट वाहून मिस्त्रिकामसुद्धा केले आहे.

शाळेच्या आजूबाजूला दोन्ही शिक्षकांनी मेहनत करुन सुंदर बाग बनवली. पण त्याला उन लागून रोपं जळायला नकोत, असेही वाटत होते. त्यावर उपाय म्हणून जाधव सरांनी स्वत: पाच हजार रुपये खर्चून शाळेच्या आवारात ग्रीन नेट बसवून घेतली. लोखंडी कमानीसाठीही सुमारे सोळा हजारांचे साहित्य जाधव सरांनीच स्वत:च्या पैशातून आणले. झाडे जगवण्यासाठी शाळेत पुरेसे पाणी उपलब्ध नव्हते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंदराव काळे यांनी आपल्या घरातील पाणी शाळेला द्यायची तयारी दाखविली. त्यासाठी दोन हजार रुपयांची पाईपलाईन आणि चार हजार रुपयांची टाकी मुख्याध्यापक जाधव सरांनी बसवून घेतली. शाळेची रंगरंगोटी, एलईडी टीव्ही असे खर्चही जाधव सरांनीच केलेले आहेत. मुख्याध्यापक जाधव सरांनी अशाप्रकारे सुमारे 70 हजार रुपयांचा खर्च कानफोडी शाळेसाठी आजवर केलेला आहे.

बघता-बघता शाळेचे रुप पालटले. शाळेच्या मागच्या बाजूला मात्र काट्यांचे रान माजले होते. ती जमीन गावातले ज्येष्ठ शेतकरी पुंडलिकराव काळे यांच्या मालकीची होती. शाळा सुंदर करण्याची शिक्षकांची धडपड पाहून काळे आजोबांनी 120 बाय 100 ची जागा शाळेला देऊन टाकली. त्यानंतर लगेचच तिथे जेसीबी फिरवून जमिन सपाट करुन, काळी माती टाकून शिक्षकांनी तिथेही वृक्षारोपण केले आहे. शाळेचा भवताल सुंदर बनवत असतानाच शिक्षकांनी गुणवत्तेकडेही दुर्लक्ष केले नाही. शाळेची वेळ खरंतर सकाळी 9.30 – दुपारी 4.30 अशी आहे. पण कानफोडीच्या शाळेत शिक्षक सकाळी 7.30 वाजताच हजर असतात. शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतरही एखादा तास मुलांचा जादा अभ्यास घेतला जातो.

याची माहिती देताना मुख्याध्यापक जाधव सर सांगतात, “आम्ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा पाया पक्का करण्याच्या प्रयत्न करतो. त्यामुळे मुळाक्षरे, 1 ते 100 अंक, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रियांचा जास्तीत जास्त सराव करुन घेतला जातो. वाचन, वाक्यविस्तार, गोष्ट तयार करणे अशा भाषेशी संबंधित खेळांचाही आम्ही वापर करुन घेतो. शाळेव्यतिरिक्तच्या वेळातही अभ्यासात मागे असणाऱ्या काही मुलांसाठी आम्ही हे जादा तास घेतो. याचा परिणाम म्हणून आमच्या शाळेतला पहिलीतला विद्यार्थी सुद्धा दीड महिन्यात वाचायला लागतो. शाळेतील प्रत्येक विद्यार्थी वजाबाकी आणि भागाकारासारख्या अवघड गणिती क्रियांमध्ये तरबेज आहे. इतकेच नव्हे तर कोणताही विद्यार्थी अब्जापर्यतची संख्या लिहून त्याची स्थानिक किंमतही सांगू शकतो.”

कानफोडी शाळेत जमलेल्या पालक माता भगिनी

आणि खरोखरच आमच्या समोर पहिली- दुसरीच्या विद्यार्थ्यांनी अब्जाच्या आपण सांगू त्या संख्या लिहून दाखवल्या, हातच्याची वजाबाकी करुन दाखवली. एवढ्या लहान मुलांना अब्जाची संख्या येण्यामागची गंमत आम्हाला जाधव सरांनी सांगितली, “आम्ही मुलांना ‘अक्कलहशेदोन’ हा शब्द लक्षात ठेवायला सांगितला आहे. या शब्दाच्या आद्याक्षरांनुसार मुलं अब्ज, कोटी, हजार, शेकडा, दशक, एकक यांचा क्रम लक्षात ठेवतात आणि त्यावरुन कोणतीही संख्या लिहून दाखवितात. तसेच त्यांची स्थानिक किंमतही सांगू शकतात.”

2016 सालापासून कानफोडीची शाळा एबीएल (Activity Based Learning) शाळा झाली आहे. त्यामुळे इथे कृतियुक्त शिक्षणावर भर दिला जातो. मुलांचा स्तर निवडून त्यांच्या शैक्षणिक स्तरानुसार अभ्यास घेतला जातो. कानफोडी शाळेतले विद्यार्थी आता इतके तयार झालेले आहेत की अगदी पहिलीचा विद्यार्थीसुद्धा तिसरीच्या स्तराचा अभ्यास करुन दाखवतो. याचाच परिणाम म्हणून की काय गावात माध्यमिक शाळेत जाणारे अभ्यासात मागे राहिलेले काही विद्यार्थी सुद्धा कानफोडी शाळेच्या जादा तासांना अभ्यासासाठी येतात. आणि जाधव सर, नेवरे सर ही अधिकची कटकट, असे न म्हणता ज्ञानरचनावादी पद्धतीने त्यांच्याही समस्या सोडवून त्यांना अभ्यासाची गोडी लावत आहेत.

ब्लॉग आणि छायाचित्रे: स्नेहल बनसोडे-शेलुडकर
माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
समशानात सोने घडविणारा शिक्षक…. अवश्य वाचा

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *