कुस्तीच्या मैदानावर स्वखर्चाने जाऊन तिथल्या संयोजकाला फेटा बांधणारा कुस्ती प्रेमी माणूस आपणास माहिती आहे का?

ग्रामीण महाराष्ट्रात कुस्तीला मोठे वलय आहे, मोठी परंपरा आहे. आजकाल कुस्तीला अनेक खेळांचा पर्याय समोर येत असल्याने लाल मातीतील या परंपरेला प्रोत्साहन देणे खूप गरजेचे झाले आहे. कुस्ती या खेळाला प्रोत्साहन द्यावे म्हणून बरीच मंडळी पुढे आलीही आहेत. मगराचं निमगाव (ता. माळशिरस, जि. सोलापुर) येथील रावसाहेब मगर हे त्यातलेच एक कुस्तीसंघटक.रावसाहेब मगर हे एकेकाळचे गाजलेले पैलवान आणि वस्ताद. मगरांचं निमगाव हे गाव त्यांच्या तालमीमूळ चर्चेत आलं होतं. चला आज खासरेवर बघूया कथा एका कुस्तीप्रेमीची

कुस्तीला प्रोत्साहन देण्याची मगर यांची पद्धत जरा न्यारी आहे. त्यांनी आजवर महाराष्ट्रभर कुस्ती मैदानाचे आयोजन करणार्‍या २३४२ आयोजकांना फेटे बांधून त्यांचे कौतुक केले आहे. कुस्ती मैदानाची माहिती मिळताच मगर स्वखर्चाने त्या गावी जातात आणि तिथल्या संयोजकांना फेटा बांधून त्यांचा सत्कार करतात. गेली २० वर्षे हा उपक्रम सुरू आहे. कुस्तीच्या मैदानाचे निवेदन करणारे निवेदक या फेट्याला मानाचा फेटा म्हणतात. मगर आणि त्यांच्या मानाच्या फेट्याची माहिती कुस्ती क्षेत्रात सगळ्यांना आहे. रावसाहेब मगर मूळचे पैलवान आणि नामांकित वस्तादही. सोलापुर जिल्ह्यातील माळशिरसजवळ असणार्‍या मगरांचं निमगावात त्यांनी तालीम उभारून अनेक पैलवानांना कुस्तीचे धडे दिले. महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर (छोटे) यांनाही मोठ्या रावसाहेबांनी मार्गदर्शन केले. काही वर्षापूर्वी मगराचं निमगाव येथील तालमीतून राज्य पातळीवर खेळणारे मल्ल तयार झाले.

कुस्ती मैदानात जाऊन तिथल्या संयोजकांना फेटे बांधण्याच्या उपक्रमाबाबत रावसाहेब म्हणतात, ‘मी एकदा खूपच आजारी पडलो. माझ्या मणक्याला मार लागला. त्या काळात मी दिवसभर घरीच असायचो. त्याअगोदर मी कुस्तीसाठी सर्वत्र फिरायचो पण आजाराने मला घरी बसवलं होते. या कालावधीत मला भेटायला दूरवरून लोक यायचे. ज्यांना कळेल ते लगेच यायचे. माझ्यावरील लोकांचं प्रेम पाहून मला गहिवरून यायचं. लोकांच्या या प्रेमातून उतराई कसं व्हायचं याचा मी विचार करत होतो. मी आजारातून बरा झाल्यावर ठरवलं आता गावोगावी कुस्ती मैदानाला प्रोत्साहन द्यायचं. मग मी गावोगावी होणार्‍या कुस्ती मैदानावर जाऊन तिथल्या कुस्ती संयोजकांना फेटे बांधू लागलो. यात माझा एकमेव हेतू होता. कुस्ती टिकवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या लोकांचं कौतुक करायचं. मी महाराष्ट्र केसरीच्या मैदानापासून ते अगदी छोट्या खेड्यात भरणार्‍या मैदानापर्यंत सगळीकडं गेलो आहे. आजवर २३४२फेटे बांधले आहेत. मला यातून कुस्तीवर प्रेम करणार्‍याचं कौतुक करायची इच्छा आहे.’

रावसाहेब मगर अप्पा या नावाने कुस्तीच्या आखाड्यात प्रसिद्ध आहेत. ते मैदानात फेटा घेऊन आले की टाळ्यांचा कडकडाट होतो. अप्पा कुस्ती शौकिनांत सर्वपरिचित आहेत पण प्रसिद्धीपासून ते दूर आहेत.आप्पांना कोणतीही प्रसिद्धी नको आहे. त्याना एकच माहिती आहे,कुस्तीची पत्रिका आली की गावातील आणि परिसरातील मित्रांसोबत कुस्त्या बघायला जायचं. तिथं गेल्यावर संयोजकांना बोलावून त्यांचा सन्मान करायचा. मैदान छोटं असो अथवा मोठं रावसाहेब आप्पा हजर. अनेकदा लोक आप्पांना शोधत येतात आणि कुस्तीची पत्रिका देतात.’आप्पा आलंच पाहिजे ‘,असा आग्रह करतात. आज कुस्ती मैदानात आप्पांच नाव पुकारलं की लगेच कुस्तीशौकीन आप्पांचा शोध घेतात. आप्पा फेटा घेऊन आखाड्यात आले की टाळ्या वाजतात. अस चित्र कितीतरी दिवसापासून सुरू आहे.

साभार संपत मोरे 9422742925

माहिती आवडलयास नक्की शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
भारताला ऑलम्पिकसहित पाच अंतराष्ट्रीय किताब मिळवून देणारा “गुंगा पहलवान”