…अन गावाकडचा मित्र मुख्यमंत्र्यांना भेटला, लोकनेता असावा तर असा

आजच गतिमान राजकारण पाहून जुन्या जाणत्या लोकांनी सांगितलेल्या नेत्यांच्या गोष्टी आठवत राहतात. आमच्या गावातील एका पुढाऱ्याने सांगितलेली ही गोष्ट आहे. ही वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाल्यानंरची एक घटना आहे.

रस्त्यावरून एक ट्रक चाललेला. ट्रकमधले लोक वसंतदादा पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देत निघाले होते. रानातून घरी चाललेल्या एकान त्या ट्रकला हात करत विचारलं.

काय झालय ? ट्रक मधल्या माणसानं सांगितल आर , आपलं दादा मुख्यमंत्री झाल्याती. आपल वसंतदादा ? ट्रकवाला हो बोलला. तो माणूस बोलला मग चला मीबी येतो ” ट्रकवाला बोलला “आर पण तुझ्या अंगावर ही रानातली कापड हायती” “त्येला काय हुतंय. आपुन दादास्नीच भेटायचं हाय. दादा आपलच हायती.” अस म्हणत तो माणूस अंगावर असणाऱ्या फाटक्या बंडीवर आणि मळक्या धोतरावर मुंबईला निघाला.

शेकडो मैलाचा प्रवास करून ही गावाकडची माणस दादांच्या बंगल्यावर पोहचली. दादा अजून येणार होते म्हणून वाट पाहत बैठकीच्या खोलीत बसली. काही वेळानं दादा आले. आल्या आल्या त्यांचे लक्ष या नुसत्या बंडीवर आलेल्या कार्यकर्त्याकडे गेले. दादांनी त्याला विचारलं,

“हरिबा असा कसा आलायस? शर्ट कुठ आहे ?”
“दादा , तुम्ही मुख्यमंत्री झालेलं रस्त्यात कळलं .आता घरी कवा जावू आणि कापड कवा घालू ? तवर ही माणस निघून आली असती. म्हणून तसाच आलू.”

ते ऐकून दादा हेलावले . त्यांनी लगेच त्याच ठिकाणी आपल्या अंगातील शर्ट काढला आणि त्या हरीबाला घालायला दिला. दादा आत गेले दुसरा शर्ट घालून आले. आपल्या कार्यकर्त्याचे भोळे भाबडे प्रेम पाहून त्याला आपल्या अंगातील शर्ट काढून देणाऱ्या वसंतदादा हे लोकांना आठवत राहतात आणि त्यांच्या साधेपणाच्या कथा आजही घराघरातून सांगितल्या जातात.

आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नांला फारसे महत्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदर नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेकसतात, म्हणतात”हे काम सायेबांना सांगतोयस?काय किमंत घालवतोय काय आमच्या सायेबांची”हे अनेकांनी अनुभवलेलं असतं. साहेब आणि त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणार काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं. अशा साहेबांच्यासाठी आणि त्याच्या भोवतीच्या लोकांसाठी वसंतदादा पाटील यांचा एक किस्सा आवर्जून सांगितला पाहिजे.

एकदा काय झालं दादांचा एक बालमित्राला विहिरीवर बसवायचं इंजिन घ्यायच होत. तो पैसे फेट्यात बांधून थेट मुंबईला गेला. चौकशी करत करत त्यांच्या बंगल्याच्याजवळ गेला.त्याला पोलीस आत सोडत नव्हते. तो तिथंच उभा राहिला. योगायोगानं दादा कुठेतरी बाहेर निघालेले. या मित्रानं त्यांना जोरानं हाक मारली

“वसंता है….”

ती गावाकडच्या माणसाची हाक ऐकून दादांनी मागे वळून पाहिले. दादा त्याच्याकडे आले. कडकडून मिठी मारली. ज्या पोलिसांनी त्याला अडवले होते. ते हा प्रसंग पाहून चकित झाले. अधिकारीही अवाक झालेले. राज्याचे मुख्यमंत्री एका शेतकऱ्याची गळाभेट घेत होते.

त्यांनी विचारलं “अस अचानक कसा आलास?”

“वसंता, गेल्यासाली हिर पाडली. पाणी लागलंय चांगल.औंदा इंजन बसवायचं हाय. तुझ्या ओळखीन म्हटलं चांगलं इंजेन मिळलं,म्हणून आलूया” असं म्हणत त्यांनी फटक्यातलं नोटांचा पुडका दादांच्या हातात दिला.दादा त्याला म्हणाले,” राहूदे ठेव तुझ्याजवळ. आता आलास तर दोन दिवस रहा”

त्या गावाकडच्या मित्राला आपण इंजिन खरेदी करायचं काम मुख्यमंत्र्यांना सांगतोय याच काहीही वाटत नव्हतं.कारण दादा त्याला आपले वाटत होते. आणि दादानाही त्यानं हे काम सांगितलं यात कसलाही कमीपणा वाटत नव्हता. दादा हे दादाच होते. दादांनी त्याच इंजिन घेऊन त्याच्या घरी पाठवलं.आणि सांगलीला जाताना त्याला सोबत घेऊन गेले.विशेष म्हणजे दादांनी ही गोष्ट जाहीर सभेत कधी सांगितली नाही. प्रचारात सांगितली नाही ,या घटनेची जाहिरात केली नाही.कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सागण्यासारख्या.कोणत्या गोष्टी सांगायच्या?आजचे नेते असे वागत नाहीत आणि चुकून कोणी वागले तर त्याची बातमी होते. दादांच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या. पण त्याच्या बातम्या झाल्या नाहीत. पण त्या सगळ्या आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या आहेत.
संपत मोरे ९४२२७४२९२५

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

1 comment

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *