कॅन्सरने तिची दृष्टी नेली परंतु तिचे IAS व्हायचे स्वप्न नाही…

२१ वर्षीय नागपूर येथील भक्ती घाटोळे हिचा जीवन प्रवास एका सिनेमातील कथानका सारखा आहे. वयाच्या ९व्या वर्षी तिची कॅन्सरमुळे दृष्टी गेली. परंतु तिचे स्वप्न साकार करण्यास तिला कोणी रोखू शकले नाही. आज तिचा हा प्रवास आपण खासरेवर बघूया..

अंधत्व हे केवळ शारीरिक व्यंग असून, त्याचा बुद्धीशी आणि जिद्दीशी कुठलाही संबंध नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. धनंजय आणि सुषमा घाटोळे यांचं भक्ती हे दुसरं अपत्य. सुदृढ, सशक्त अन् सुंदर अशी मुलगी लहान असतानाच आईला भक्तीच्या डोळ्यांत एक काळा डाग दिसला. सुंदर जग दिसण्यापूर्वीच भक्तीने ऑपरेशन थिएटर अनुभवलं तेव्हा भक्ती होती अवघ्या सहा महिन्यांची अन् भक्तीच्या डोळ्यात होता रेटिनोब्लासटोमा अर्थात डोळ्यांचा कर्करोग. इथूनच सुरुवात झाली एका संघर्षांला!

ती दवाखान्याच्या दुष्टचक्रात अडकली. भक्तीचा उजवा डोळाही याच रोगाने ग्रासला. आईवडिलांचे अथक परिश्रम तिच्या डोळ्यासाठी खर्ची पडू लागले. किमो आणि रेडिओथेरपीच्या असह्य़ वेदना इवलीशी भक्ती सहन करत होती. एवढं करूनही डॉक्टरांना डोळा वाचविण्यात यश येत नव्हतं. शेवटी डोळा गमावण्याचा तो दिवस क्रूर काळाने उभा केला. ‘‘मला ऑपरेशन थिएटरकडे डॉक्टर घेऊन जाताना मी आईजवळ खूप रडले,’’ ती सांगते. १ एप्रिल २००४ चा तो दिवस भक्तीच्या आयुष्यात कायम अंधकार पसरवून गेला.

‘‘It is better to light candle than to blame the darkness’’ दृष्टी देणारे दोन डोळे तर आता सोबत नव्हते परंतु बुद्धिमत्तेचा तिसरा डोळा ज्याचा प्रकाश प्रज्ञाचक्षू म्हणून विकसित करायला काय हरकत आहे ? १० वर्षांच्या भक्तीने आपलं आयुष्य स्वीकारलं. दहावीत भक्तीने ९३.४५ टक्के घेऊन अपंगांमधून पहिला क्रमांक मिळविला. बोलक्या संगणकाच्या साहाय्यानं भक्ती पुस्तक वाचते, टीव्ही बघते. (ऐकते) भक्ती इतर संकटांवर मात करीत सामान्य आयुष्य व्यतीत करते, नव्हे तर ११ वीला लॉजिक आणि फ्रेंच भाषा घेऊन आपलं करिअर घडविण्याचा प्रयत्न करीत आहे.

एलएडी महाविद्यालयातील भक्ती घाटोळे हिने याच जिद्दीच्या बळावर ८७.७ टक्‍क्‍यांसह नागपूर विभागातून दुसरा क्रमांक पटकाविला. आणि आता भक्तीने नागपूर विद्यापीठात पहिला येण्याचा मान मिळविला आहे. घातोळे परिवाराकरिता हा अभिमानाचा क्षण होता जेव्हा भक्ती अतिशय आत्मविश्वासाने स्टेजवर गेली आणि तिने नागपूर विद्यापीठातून पहिला येण्याचा मान मिळविला. तिला समाज शास्त्रात सुवर्ण पदक मिळाले.

भक्तीला भविष्यात मानोसपचार तज्ञ व्हायचे आहे आणि त्यानंतर तिला IAS अधिकारी बनायचे आहे. आणि ती होणार यात कुठलीही शंका नाही कारण तिची इच्छाशक्ती प्रबळ आहे. पुढे तिचा संघर्षाचा काळ आणखी कठीण आहे परंतु ती या सर्वावर मात करणार यात शंका नाही. खासरे परिवारा कडून भक्तीला भरपूर शुभेच्छा…

आपल्याला हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…
वाचा २ खोलीच्या घरात राहून पूर्ण केले आई वडिलाचे स्वप्न, चारही बहीण भाऊ बनले IAS-IPS…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *