नाना पाटेकर यांना एका मुंबईकरांचे पत्र…

प्रिया नाना पाटेकर,
आपण एक उत्तम कलावंत आहात, महाराष्ट्रासाठी दुष्काळात देव बनून उभे राहिलात यात शंका नाही, आम्ही तुमचा आदर करतो, आम्ही तुम्हाला एक कलाकार आणि आता एक समाजसेवक म्हणून डोक्यावर घेतलंय,आज तुम्ही एक वक्तव्य करू शकलात, ते प्रेक्षकांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं असल्यामुळेच, कारण तुमच्या जागी दुसऱ्या तिसऱ्या कलाकाराने असं वक्तव्य केलं असतं, तर त्याला फारशी किंमत मिळाली नसती किंवा त्यानं हिम्मत केली जरी असती तरी त्याला तुमच्या एवढं महत्व मिळालं नसतं, पण तुम्ही जे वक्तव्य केलंत त्याबद्दल थोडसं तुम्हाला थांबवावंसं वाटतं…

nana-patekar

29 सप्टेंबरला पोटभर भाकरीसाठीच अवघ्या 19 वर्षांचा मयुरेश घरातून बाहेर पडला होता, घरातला एकुलता एक आधार होता नाना..पण एल्फिस्टनच्या दुर्घटनेत गेला हो! काय दोष होता त्या मयुरेशचा पण गेला बिचारा,एकूण 23 निष्पाप बळी गेले या दुर्घटनेत! पण नाना, या दुर्घटनेविषयी खंत व्यक्त करताना तुमचा जराही आवाज ऐकू आला नाही…नाना कुठे होतात तेव्हा? एकदातरी त्यांच्या कुटुंबियांना भेट द्या नाना आजही मयुरेशच्या आई वडिलांच्या डोळ्यातल्या अश्रूची धार संपत नाहीय. ज्या वडीलांचा मयुरेश आधार होता, त्याच वडिलांना आपल्या मुलाच्या तिरडीला खांदा देण्याची वेळ आली. बघवलं नाही नाना, आजही ते चित्र डोळ्यासमोर ताजंय.

stampede-at-elphinston

काही दिवसांपूर्वी मुंबई तुंबली होती नाना, याची कल्पना असेल तुम्हाला, सगळेच मुंबईकर भाकरीसाठी बाहेर पडले होते, डॉक्टर अमरापूरकरसुद्धा, गेले ना, नाना ते, कुठे होता तेव्हा? त्यादिवशीही भाकरी कमवण्यासाठी मुंबईकर बाहेर पडला होता, भाकरी तर नशीबी आली नाही पण छातीभर पाणी मात्र पियायला मिळालं होतं, त्या दिवशी भाकरी तर नशीबी आलीच नाही पण पावसाच्या पाण्यानं पोटाची भूक भागवली होती नाना, स्वतःच्या हाताने लोकं, लोकांना मदत करत होती. मुंबई जागच्या जागी थांबली होती, कोणाची आई, तर कोणाचे वडील तर कोन्ह्या कामावर जाणाऱ्या आईचं तान्हं बाळ घरी वाट बघत होतं, सर्व जण भाकरी कमावण्यासाठीच घराबाहेर पडले होते, नाना, मग मला सांगा दोष कोणाचा होता?,भाकरी कमवण्यासाठी बाहेर पडलेल्या मुंबईकरांचा?, पावसाचा? का मुंबई महानगरपालिकेचा?

mumbai local

स्पिरिट नावाची मजबुरी घेऊन मुंबईकर जीव मुठीत घेऊन जगतोय. नाना या मुंबईकरांसाठी तुमचा ना मदतीचा हात मिळाला, ना तुमचा कधी आवाज ऐकू आला, कुठे होतात नाना?

rainfall-disrupts

वाहतूक पोलिस कॉस्टेबल विलास शिंदे, नुसतं भाकरीसाठी नव्हे तर वर्षभरापूर्वी आपलं कर्तव्य बजावत होते, ड्युटीवर असताना हेल्मेट न घातलेल्या एका बाइक तरुणाला हटकले म्हणून त्या तरुणानं शिंदेंची डोक्यात बांबू घालून हत्या केली, सरकारचा दबाव असल्यामुळे खात्याकडून विषय दाबण्यात येत होता, पण माध्यमांनी तो पुढे आणला म्हणून कमीत कमी वाहतूक पोलिस कॉस्टेबल विलास शिंदे यांच्यावर हल्ला झाला ते तरी महाराष्ट्राच्या जनतेला कळालं.नाना काय चूक होती त्या कॉन्स्टेबलची…कर्त्यव बजावलं म्हणून विलास शिंदेही पोटभर भाकरी कमावण्यासाठीच बाहेर पडले होते ना? या घटनेनंतर तुमचा आवाज ऐकू आला नाही. महाराष्ट्रातला पोलीस एक दडपणाखाली जगतोय याची पुसटची कल्पना आहे का..?नाना, विलास शिंदेंची हत्या झाली कुठे होतात तेव्हा?

vilas-shinde

घाटकोपर आणि पायधुनीची इमारत अचानक पत्यासारखी कोसळते, कोणाचं बाळ मरतं, कोणाची आई तर कोणाचे वडील या दोन्ही दुर्गघटनेत गेले. सगळेच तर भाकरीसाठी धपडतात ना नाना, कोणाला मरायची हौस आलीय..पण जेव्हा या दुर्घटना घडल्या तेव्हा पोटभर भाकरीसाठी कमावणारे हात दिसले नाही का? मुंबईत आज कसंबसं जगावं लागतंय, सकाळी घरातून बाहेर पडलेला माणूस घरी सुखरूप आला तर घरातल्यांचा जीव जीवात येतो,

ghatkopar building

नवी मुंबईत सिडकोच्या खराब रस्त्यामुळे एक महिलेला आपला जीव गमवावा लागला, माहीत आहे का नाना आपल्याला? घरातून बाईक घेऊन निघालेला पोरगा रस्त्यावरच्या खड्यानं बळी पडतो, ही सर्व लेकरं भाकरी कमवण्यासाठीच बाहेर पडतात ना?मग त्यांच्यासाठी कधी बोलला नाहीत? तुम्ही फेरीवाल्यांच्या बाजूनं बोलू नका असं तुम्हाला कोण कधी बोलणार नाही पण मुंबईत काय घडतंय याची किमान माहिती तरी घ्या…

Feriwale

नाना, पोटभर भाकरी मिळावी यासाठी तर तुम्ही आम्ही सर्वजण काम करतो, तुम्ही सिनेमात काम करता पोटभर भाकरीसाठीच, आम्ही कामाला जातो पोटभर भाकरीसाठी, फेरीवालेही काम करतात तेही पोटभर भाकरीसाठीच…पण एक लक्षात घ्या तुमच्या आमच्या भाकरीसाठी झगडण्यात आणि फेरीवाल्यांनी भाकरीसाठी झगडण्यात यात फरक आहे, जमिन आस्मानचा फरक आहे. तुम्ही शासनाच्या नियमाने काम करतात आणि फेरीवाले शासनाचे नियम पायाखाली चिरडून, चिंचोळ्या रस्त्यावरून जाताना दुतर्फा फेरीवाले असतात, कसातरी रस्ता काढावा लागतो, महिलावर्ग मोठ्यासंख्येने असतो एकदा कोणीतरी गर्दीचा फायदा घेत आपल्या आई-बहिणीला स्पर्श करायचा फायदा उचलतो, तर एकदा मुद्दाम धक्का मारतो, सॉरी बोलतो आणि पुढे जाऊन दात काढतो, कधीतरी अशा महिलांशी बोला त्यांच्या समस्या समजून घ्या मगच बोला..

mumbai-rain

तुम्ही चित्रपट आणि शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करताय आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण राजकारणातली वक्तव्य तुम्हाला शोभत नाही, तुम्ही आणि तुमचं कार्य खुप काही बोलून जातं पण शक्यतो अशी वक्तव्य करणं, मागे तुम्ही उद्धव-राज यांच्या एकत्र येण्यावर तुम्ही बोलला होतात, काय झालं? आले का?आता फेरीवाल्यांच्या मुद्दा तापला आहे, यामध्ये मराठी, अमराठी सर्वच फेरीवाले होरपळले आहेत, योग्य निर्णय देण्यासाठी शासन आहेच, आम्हाला तुम्हाला एक कलाकार आणि शेतकऱ्यांसाठी झटणारा नाना बघायची सवय झालीय, त्यामुळे राजकीय गरमा गर्मी सुरू असताना नको ती वक्तव्य करणं टाळा, आणि जर वक्तव्य करायची ठरवली तरी सर्वच विषयांवर बोला आणि तोलून मापून बोला, नाहीतर ज्या चाहत्यांनी तुम्हाला डोक्यावर उचललं आहे ती जनता जमिनीवर आपटल्याशिवाय राहणार नाही…
वैभव परब

लेख आवडल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका…
मुंबईच्या पुरात या टॅक्सी चालकाने दिला मानवतेचा संदेश वाचविला तरुणीचा जीव.

1 comment

  1. I feel, we all , individually can & would always take the stripe of MR patekar….As u all can’t deny ultimate truth for the individual to be physically present @all crisis/situations….Why can’t any one of us take a proactivw lead….Together we stand & divided we fall….Unity won’t any day overtake technology/HUMANITY

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *