सलग ११ वेळा विधानसभेत निवडून येऊन गिनीज बुक मध्ये नोंद असलेले महाराष्ट्रातील एकमेव राजकारणी

भारत हा लोकशाही देश आहे. इथे जनता राजा आहे आणि या लोकशाहीस आदर्श असणारे महाराष्ट्रातील एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख हे आहे.पांढरा शर्ट, हातात बॅग जुन्या काळातील गुरुजीशी साधर्म्य असलेले गणपतराव देशमुख आहे. विधानसभेतील सर्वात जेष्ठ आमदार म्हणजे गणपतराव देशमुख. वयाच्या ९१ व्या वर्षी तोच कामाचा जोश तरुणांना देखील लाजवेल. एकच झेंडा एक पक्ष आणि एक मतदारसंघ सतत चार पिढ्याचे नेतृत्व करीत विधानसभेमध्ये ११ वेळेस जाणारे गणपतराव देशमुख यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेले आमदार गणपतराव देशमुख सर्वाना माहिती आहे आज त्यांच्या विषयी काही खासरे गोष्टी बघूया…

गणपतराव देशमुख यांचा जन्म स्वतंत्रपूर्व काळातील १० ऑगस्ट १९२६ साली सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे झाला. गणपतरावांचा स्वभावच चळवळीतला त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाकडे ते वळले आणि आजही त्यांच्या सोबत आहे. पहिल्या वेळेस १९६२ साली वयाच्या ३४व्या वर्षी ते आमदार म्हणून निवडून आले. आणि तेव्हापासून सतत ११ वेळेस गणपतराव देशमुख सांगोल्याचे प्रतिनिधित्व करीत आहे. या वर्षी त्यांनी ५५ वर्षापेक्षा अधिक विधानसभेत कारकीर्द गाजवली या करिता त्यांचा सन्मान करण्यात आला. या अगोदर सलग १० निवडणुका निवडून येणारे तामिळनाडूचे एम. करुणानिधी यांची बरोबरी त्यांनी २००९ साली केली होती आणि २०१४ मध्ये त्यांनी ११ वी निवडणूक जिंकून हा विक्रम मोडला.

गणपतराव तसे मुल मोहोळचे पेणूर तालुक्यातील हे गाव परंतु वकिली व्यवसायामुळे ते सांगोल्यात आले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ त्यावेळेस जोरात होती. त्यांनी यामध्ये सक्रीय सहभाग नोंदवला. त्याकाळात संपूर्ण सांगोला तालुक्यात कॉंग्रेसचे वर्चस्व होते कोणीही उभे राहायला तयार नव्हते. परंतु वयाच्या ३४व्या वर्षी गणपतराव देशमुख यांनी १९६२ साली बाहेरच्या तालुक्यातील असून विजय मिळवला व विधानसभेत प्रवेश केला.

गणपतराव हे विधीमंडळाचा चालता फिरता इतिहास आहे. १९७८ मध्ये पुलोद व १९९९ मध्ये आघाडी सरकारमध्ये काही वर्ष मंत्रीपद वगळता ते नेहमी विरोधी बाकावर बसत आलेले आहे. त्यांना पराभव फक्त १९७२ व १९९५ मध्ये पत्करावा लागला. परंतु या काळात खचून न जाता त्यांनी जनसंपर्क वाढविला आणि आपले स्थान अधिक मजबूत केले.

विशेष म्हणजे आजपर्यंत त्यांच्यावर एकही भ्रष्टाचाराचा आरोप लागला नाही आहे. एवढेच काय तर ते ज्या सूतगिरणीचे संचालक आहे त्याकरिता स्वतः घरून डब्बा घेऊन जातात. जेव्हा संपूर्ण सहकार पडत्या काळात होते तेव्हा सांगोल्या सारख्या दुष्काळी पट्ट्यात त्यांनी आदर्श सूतगिरणीचे उदाहरण सर्वापुढे ठेवले. आशिया खंडातील नंबर एकची सूतगिरणी म्हणून सांगोल्याच्या सूतगिरणीची ओळख आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस सर्वाचे (जोशी व राणे वगळता) कामकाज पाहणारे एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख हे आहे. या वर्षी झालेले नागपूरचे हिवाळी अधिवेशन त्यांच्या करिता ५३वे हिवाळी अधिवेशन होते.

गणपतराव देशमुख इतके साधे जीवन जगतात की अनेकांना त्यांच्याबाबत माहितीच नसते. असाच एक अनुभव त्यांना आला होता. साताऱ्याहून पुण्याला येण्यासाठी एसटी बसमध्ये बसले. कंडक्टरने तिकिट मागितल्यावर आमदार आहे म्हणून सांगितले. कंडक्टरला विश्वास बसेना. कारण त्याच्या कारकीर्दीत आमदाराला एसटीत बसलेले त्याने पाहिले नव्हते. त्याने आगार व्यवस्थापकांना बोलावून आणले मग पुढचा प्रसंग टळला.

आ. गणपतराव देशमुख साहेबांची खुर्ची जिने तब्बल 50 पेक्षा जास्त वर्षे त्यांची साथ दिली आहे. घरात साध्या पत्र्याच्या तीन कॉट तीन गाद्या आणि एक किचनचे घर हेच त्यांचे निवास आणि कार्यालय आहे. अत्यंत साधी राहणी मुलांना आणि नातवंडांना माझे नाव न सांगता स्वतःच्या कष्टावर नाव कमावण्याचा सल्ला आणि दंडक घालून देणारे हेच ते भारतातील एकमेव आमदार म्हणजे गणपतराव देशमुख आहे.

थोर राजकारणी, राज्याचा चौफेर अभ्यास असणारे चालते बोलते विद्यापीठ, लोकशाहीच्या इतिहासाने दखल घेतलेले लोकप्रतिनिधी, पुरोगामित्वाचा आवाज बुलंद करणारे, सभागृहातील पेचप्रसंगाची कोंडी फोडणारे, आयुष्याला चळवळ समजून जगणारे, नव्वदीतही तरुणाला लाजविणारे अभ्यासपूर्ण नेतृत्व करत सभागृहाला स्तब्ध करणारे एकमेव आमदार गणपतराव देशमुख वयाच्या 91 व्या वर्षीही फिट अॅंड फाईन आहेत. निष्ठा, चारित्र्य, सचोटी या बाबी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच परंतु मतदारांवरही त्याचे संस्कार केले. म्हणूनच मतदारसंघातील तिसरी पिढी त्यांना मतदान करते आहे.

गणपतराव देशमुख यांना खासरेच्या वतीने मानाचा मुजरा ! लेख आवडल्यास नक्की शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका

तीन वेळा अपक्ष निवडून येणार्‍या आमदार बच्चू कडू यांच्याबद्दल या गोष्टी माहीत आहेत का ?

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *